Saturday, September 15, 2012

ह. मो. मराठे, तुम्ही खुजे झालात 


ह. मो. मराठे यांनी साहित्य संमेलानानिमित्त प्रचाराचे पत्रक काढून जो नवा वाद जन्माला घातला तो समस्त विचारवंतांसाठी केविलवानाच म्हणायला हवा. खर तर पत्रक काढणे ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांनी घालून दिलेली एक जुनी प्रथा आहे. त्यामुळे ह.मो.नी प्रचाराचे पत्रक काढले हा वादाचा मुद्दाच नाही. त्या पत्रकात त्यांनी जे काही जुने मुद्दे उकरून काढले ते काढायची या पदासाठी आवश्यकता होती का ? हा खरा प्रश्न आहे.
ह.मो. आपल्या पत्रकात लिहितात 'अगदी थोडक्यात का होईना, पण मला इथे सांगितले पाहिजे. तो विषय म्हणजे मी ब्राम्हण समजाविषयी हाती घेतलेले काम. जर लिहिले नाही तर गैरसमजातून माझ्याविरोधी विपर्यस्त प्रचारासाठी त्याचा वापर करून घेण्यात येईल, अशी मला शंका येते.' ब्राह्मण समाजाविषयी आपण करीत असलेल्या कामाचा प्रचार करण्यासाठीच ह. मो.नी हा मुद्दा मुद्दाम उपस्थित केला आहे हे सहज लक्षात येते. आपल्या या कामाचा आणि भूमिकेचा विपर्यस्त प्रचारासाठी वापर केला जाण्याची शंका मराठेंना का यावी? स्पर्धक उमेदवारांपैकी कोणी तसा मुद्दा तोपर्यंत तरी उपस्थित केलेला नव्हता. ज्यावेळी तो प्रचारात आला असता त्यावेळी ह.मो.नी त्यावर जाहीर भाषण करून खुलासा केला असता तरी समजू शकले असते. पण तोपर्यंत थांबण्याची त्यांची तयारी नसावी. त्यांच्याच भाषेत लिहायचे तर 'विपर्यस्त प्रचारासाठी' त्या मुद्याचा वापरच झाला नाही किंवा उशिरा वापर झाला तर या कळीच्या मुद्यावर प्रचार करायला पुरेसा वेळ  आणि संधी मिळेल कि नाही? अशीच शंका त्यांना असावी. कदाचित, वाद निर्माण व्हावा हाच त्यांचा हेतू असावा आणि त्यासाठी पत्रकातला हा मुद्दा माध्यमांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवला गेला असावा अशी शंका आता येऊ लागली आहे. जर त्यात तथ्य असेल तर हे उपद्व्याप करून ह.मो.नी स्वत:ला मोठे करण्याऐवजी खुजे करून घेतले आहे.
पुरुषोत्तम खेडकरांनी ब्राह्मण समाजाविषयी काय लिहिले आणि मराठा सेवा संघाने जे काही केले ते योग्य होते कि अयोग्य? हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. त्या अनुषंगाने ह.मो.मराठे यांनी काही भूमिका घेतली असेल, आवाज उठवला असेल किंवा लेखन केले असेल तर त्यांची ती भूमिका ब्राम्हण जातीतील व्यक्ती म्हणून  असलेली भूमिका होती. तिचा उल्लेख प्रचार पत्रकात कारण नसताना करून आपण ब्राह्मण जातीचे आहोत, हे विसरायला आपण तयार नाही हेच ह.मो.नी दाखून दिले आहे. किती ब्राह्मण मतदार (साहित्यिक असा उल्लेख मुद्दाम करत नाही. कारण या निवदनुकीतले किती मतदार खरोखरच साहित्यिक असतात या प्रश्नाचे उत्तर मला तरी खात्रीने देता येणार नाही )  त्यांना ते केवळ ब्राह्मण समाजासाठी काही ठोस भूमिका घेऊन पुढे आले म्हणून मतदान करणार आहेत आणि किती ब्राम्हणेतर मतदार त्यांची पत्रकातली भूमिका वाचून ती योग्य ठरवीत  त्यांना मतदान करणार आहेत? ज्या अर्थी त्यांनी हा मुद्दा पत्रकात मांडला आहे, त्या अर्थी त्यांच्याकडे हे गणितही तयार असावे आणि ते तसे गणित करीत असतील तर एकूणच सामाजिक मानसिकतेविषयी ह.मो.च्या जाणीवा अजून पुरेशा पक्व झालेल्या नाहीत, असेच म्हणायला हवे.
ह,.मो. केवळ साहित्यिकच नाहीत तर पत्रकार देखील आहेत. पत्रकार असलेला साहित्यिक अधिक वास्तववादी, सामाजिक मानसिकतेशी परिचित आणि पुरोगामी असतो अशी माझी धारणा आहे. तशी अपेक्षा आहे. पत्रकार म्हणून त्यांना ब्राह्मण समाजाला असलेला कथित संभाव्य धोका दिसला असेल हे एकवेळ समजू शकते. त्यासाठी त्यांनी आवश्यक तो आवाजही उठवला असेल तर पत्रकार म्हणून त्यांच्या त्या कृतीवर आक्षेप घेण्याचे कारण नाही; पण साहित्यिक म्हणून निवडणूक  लढताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी जर ते त्या मुद्याच भाडवल करू इच्छित असतील तर पुरोगामी महाराष्ट्रात ते खपणार नाही. महाराष्ट्रात अजूनही जातीवर आधारितच उमेदवार सर्वच निवडणुकांना उभे केले जातात, असा युक्तिवाद कोणी या मुद्यावर करेल, अशीही शक्यता आहे. तो मुद्दा खोडून काढण्यासाठी मी स्वतंत्र पुस्तकच लिहिले आहे. लवकरच राजहंस प्रकाशन ते बाजारात आणणार आहे. त्यामुळे इथे त्या मुद्द्यावर अधिक चर्चा करीत नाही. ह.मो. सारख्या पत्रकार लेखकाने मात्र या निमित्ताने माझ्यासारख्या रसिक वाचकाचा भ्रमनिरास केला आहे, हे नक्की.