Saturday, January 26, 2019

प्रियंका गांधी (आणि) काँग्रेसचे भवितव्य Priyanka Gandhi (And) Future of Congress Party

प्रियंका हेच आता काँग्रेस पक्षाचे भवितव्य आहे आणि त्या काँग्रेस पक्षाला तारून नेतील, अशी भविष्यवाणी अनेक राजकीय निरीक्षक, विश्लेषक करू लागले आहेत. याचा दुसरा अर्थ राहूल गांधी यांच्यात पक्षाला तारून नेण्याची क्षमता नव्हती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष २०१९ च्या निवडणुकीत यश मिळवू शकला नसता, असा घ्यायचा का? तसे नसेल तर प्रियंकाच्या आगमनामुळे अती प्रभावित होऊन हे विश्लेषक विश्लेषण करीत आहेत, असे म्हणावे लागेल.





प्रियंका यांचे व्यक्तिमत्व आहेच मुळी प्रभावित करणारे. एक तर त्या थेट इंदिरा गांधी यांच्या सारख्या दिसतात. बोलतातही तशाच. त्याचा परिणाम त्यांना पाहाणाऱ्या, ऐकणाऱ्यावर होतो. विशेषत: ज्यांनी इंदिरा गांधी यांना पाहिले आणि ऐकले आहे त्यांच्यावर तर हा प्रभाव चटकन पडतो. मतदारांवरही हा प्रभाव पडेल आणि त्याचा फायदा काँग्रेसला होईल, अशी अटकळ या विश्लेषकांची असते. त्यामुळे अती उत्साहात प्रियंकांना ते काँग्रेसचे तारणहार ठरवताना दिसतात. प्रियंकांनी पक्षात सक्रीय व्हावे, नेतृत्व करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून पक्ष कार्यकर्त्यांकडून होत होती. स्वाभाविकच, त्यांच्या सक्रीय होण्याच्या हर्षोल्हासित प्रतिक्रीया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. त्यामुळे प्रियंका पक्षासाठी ऊर्जा ठरतील, असा या निरीक्षकांचा होरा आहे. याच उत्साहात काही मंडळी त्यांना नरेंद्र मोदींसमोरचा तुल्यबळ ‘चेहरा’ देखील ठरवित आहेत. हे सारे पूर्णपणे चुकीचे आहे का? तर तसेही नाही. पण त्यांना थेट पक्षाच्या तारणहार ठरविण्याआधी आणखी काही बाबींचा विचार करण्याची गरज मात्र आहे.

कोणत्या आहेत या बाबी? सर्वात पहिली बाब म्हणजे प्रियंकांना जरी काँग्रेसच्या महासचिव करण्यात आले असले तरी त्यांना ठरवून दिलेले कार्यक्षेत्र आहे उत्तर प्रदेशातील पूर्व प्रांत. सोप्या भाषेत सांगायचे तर अर्धा उत्तर प्रदेश. उर्वरित अर्धा उत्तर प्रदेश दिला आहे ज्योतिरादित्य शिंदे (सिंदिया) यांच्याकडे. म्हणजे खुद्द राहूल गांधी यांनीच प्रियंका यांना ज्योतिरादित्य यांच्या रांगेत बसवले आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांच्यावर अर्ध्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला यश मिळवून देण्यापुरतीच जबाबदारी आहे हे लक्षात घ्यावे लागेल. याचा आणखी एक अर्थ काढता येतो. सोनिया आणि राहूल हे प्रियंकाच्या प्रभावाची चाचणी घेण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांना प्रियंकाच्या क्षमता आणि मर्यादा जितक्या माहिती असतील तितक्या त्या अन्य कोणाला माहिती असण्याची शक्यता नाही. तारणहार ठरविणाऱ्या राजकीय विश्लेषकांना तर नाहीच नाही. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला तारण्याचे किंवा मारण्याचे जे काही श्रेय जायचे असेल ते राहूल यांच्याच खात्यात टाकावे लागणार आहे. प्रियंकांना त्यासाठी घोड्यावर बसलेले पाहाणे हा राजकीय विश्लेषकांना होणारा भास आहे.

सोनिया आणि राहूल यांनी प्रियंका यांना सध्या अर्ध्या उत्तर प्रदेशापुरतेच मर्यादित ठेवले असले तरी प्रियंकांसमोरचे आव्हान काही लहान नाही. त्यामुळे आई आणि भावाने त्यांना अगदीच ‘अंडर इस्टिमेट’ केले आहे, असेही समजण्याचे कारण नाही. साधारण महाराष्ट्रासारख्या राज्याइतके हे कार्यक्षेत्र आहे. एकूण उत्तर प्रदेशाचा आवाका आहेच असा अवाढव्य. या राज्यात लोकसभेच्या ७१ (महाराष्ट्रात ४८) तर विधानसभेच्या ४०३ (महाराष्ट्रात २८८) जागा आहेत. यापैकी काँग्रेसकडे सध्या लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या अवघ्या ७ जागा आहेत. यावरून या महाकाय राज्यात काँग्रेस समोरचे आव्हान किती मोठे आहे याची कल्पना यावी. प्रियंकांच्या बाबतीत विचार करायचा तर हे आव्हान आणखी मोठे होत जाते. कारण उत्तर प्रदेशाचा विचार केला तर पश्चिम उत्तर प्रदेशच्या तुलनेत पूर्व प्रांतात काँग्रेसला माेठे आव्हान असते. कारण हा प्रांत आहे यादवांच्या प्रभावाखालचा. त्यामुळे इथे सर्वात प्रभावी असतो समाजवादी पक्ष. प्रियंकांकडे हाच प्रांत सोपवण्यात आला आहे. पश्चिमी प्रांतात जाट बहूल लोकसंख्या आहे. त्यामुळे इथे काँग्रेस आणि भाजपला तुलनेने सोपे वातावरण असते. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचे लक्ष देखील याच प्रांताकडे अधिक असते. म्हणजे या दृष्टीने विचार केला तर काँग्रेस, भाजपा आणि बसपा यांचे मतदार साधारण एकाच प्रांतातले आहेत. मायावतींनी काँग्रेसला नाकारण्याचे तेही एक कारण आहे. पण हा मुद्दा नंतर सविस्तर पाहू. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर पूर्व उत्तर प्रदेश प्रांताची जबाबदारी स्वीकारलेल्या प्रियंकांसमोरचे आव्हान बऱ्यापैकी मोठे आहे, याची कल्पना येऊ शकते. हे आव्हान त्या कसे पेलतात, यावर त्यांच्या नेतृत्वाचे विश्लेषण अवलंबून असायला हवे. उगाच २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे ओझे त्यांच्या डोक्यावर थोपवणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल.

नरेंद्र मोदींना म्हणजेच भाजपला रोखण्यासाठी राहूल गांधी यांनी खेळलेली ही खेळी आहे, हा काँग्रेसचा सर्वात मोठा आणि शेवटचा पत्ता आहे, असेही म्हटले जाते आहे. पण तसे ते नाही हे काँग्रेसची उत्तर प्रदेशातील स्थिती, तिथे झालेले सपा-बसपाचे गठबंधन आणि प्रियंकांकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी या बाबी पाहाता लक्षात येते. काँग्रेसला उत्तर प्रदेशात दोन पेक्षा जितक्या जास्त जागा मिळतील तितका काँग्रेसचा फायदाच आहे, हे उघड आहे. पण परिस्थिती उलटही होऊ शकते. म्हणजे  कशी? आज सपा आणि बसपाची युती झाली आहे. त्यांनी या युतीतून काँग्रेसला बाहेर ठेवले आहे. हे संकेत आधीपासूनच मिळत होते. विशेषत: मायावती काँग्रेस विषयी जाहीरपणे जे काही बोलत होत्या त्यावरून त्या काँग्रेसला सोबत घेणार नाहीत, ही शक्यता वाटत होतीच. तसे झाले आणि काँग्रेस सर्व जागा लढवायला, विशेषत: राज्यभर पसरायला मोकळी झाली. याचा परिणाम असा होणार आहे की, जिथे सपाचे उमेदवार असतील तिथेही काँग्रेसचा उमेदवार असेल आणि जिथे बसपाचे उमेदवार असतील तिथेही काँग्रेसचा उमेदवार असेल. त्या प्रत्येक मतदारसंघात भाजपचाही उमेदवार असेल. म्हणजे लढत तिरंगी होण्याची शक्यताच जास्त आहे. या लढतीत प्रियंका गांधी प्रभावी ठरल्या तर त्या सपा-बसपा युतीच्या उमेदवारांची मते काँग्रेसकडे वळवतील. म्हणजे प्रियंका सक्रीय होण्यापूर्वी काँग्रेसची जी मापं मायावती आणि अखिलेश यादव यांनी काढली असतील, ती मापं प्रियंकांच्या येण्यामुळे बदलतील. परिणामी ‘धर्मनिरपेक्ष’ म्हटल्या जाणाऱ्या मतांमध्ये विभागणी होण्याचीच शक्यता आता वाढली आहे. तसे झाले तर ज्या मोदींना रोखण्यासाठी प्रियंकाअस्त्र  असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते आहे, त्या मोदींनाच या अस्त्राचा फायदा होऊ शकतो. सपा-बसपाने काँग्रेसला सोबत घेतले असते तर कदाचित हे घडलेही नसते. म्हणजे कदाचित प्रियंका मैदानात अशा उतरल्याही नसत्या आणि मतविभाजन होऊन मोदींना फायदा झालाही नसता. या लढाईत प्रियंका कोणाच्या विरोधातच उतरल्या असतील तर त्या मायावतींच्या विरोधात उतरल्या असण्याची शक्यता अधिक आहे. त्याला कारणही आहे. काँग्रेसला २०१९ च्या निवडणुकीनंतर सर्वाधिक धोका दिसतो आहे तो मायावतींकडूनच. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मायावतींनी ऐनवेळी काँग्रेसबरोबर युती करायला नकार देऊन काँग्रेसची अडचण केली होती. आताही काँग्रेसप्रणीत महायुतीत येण्याचे त्यांनी टाळले आहे. अखिलेश यादवही मायावतींबरोबर वाहात गेले आहेत. पंतप्रधान होण्याच्या स्वप्नाने मायावतींना पछाडले आहे. त्यामुळे काँग्रेसला वगळून ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अजित सिंग आणि इतर काही पक्षांना एकत्र करून तिसरी आघाडी बनवायची आणि पंतप्रधान व्हायचे, असे मायावती यांचे प्रयत्न सुरू आहेत. हा उघड उघड काँग्रेसच्या स्वप्नांना सुरुंग आहे. तो सुरुंग उडण्याआधीच निष्क्रीय करायचा असेल तर मायावतींना रोखण्यासाठी प्रियंकाचे अस्त्र चालवावे लागेल, असे गणित राहूल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केलेले दिसते. त्यामुळे प्रियंका आल्यामुळे भाजप नव्हे, बसपा हादरली असण्याचीच शक्यता अधिक आहे. राहिला नेरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपचा प्रश्न, तर तो आधीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निकाली काढला आहे. या योगींना कार्यरत आणि बोलत ठेवले तरी मोदी विरोधात उत्तर प्रदेशात तरी फार काही करीत बसण्याची गरज काँग्रेसला भासणार नाही.

आता थोडं प्रियंकांच्या प्रभावाविषयी. त्या बहुतांशी इंदिरा गांधींसारख्या दिसतात आणि म्हणून मतदारांना त्या आकर्षित करतील या गृहितकाला काही अर्थ नाही. कारण इंदिरा गांधींनी ज्यांच्यावर प्रभाव पाडला होता, त्या पिढीपेक्षा नवी पिढी मतदार म्हणून अधिक आहे. शिवाय, केवळ सारखे दिसण्याने आजचा मतदार भुलतो, असेही नाही. तसे असते तर आज बाळासाहेबांसारखेच दिसणाऱ्या, बोलणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षाचा विधान सभेत केवळ एकच आमदार नसता. या पिढीला प्रियंका आकर्षित करू शकतील त्या केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे. एक तर त्या तरूण आहेत. भाषण शैलीवर इंदिरा गांधींचा प्रभाव असला तरी त्याला एक वेगळा लहेजा आहे. त्याचाही परिणाम मतदारांवर होऊ शकतो. पण आधी म्हटल्याप्रमाणे प्रियंका जितक्या प्रभावी ठरतील, तितक्या त्या सपा-बसपा आघाडीला त्रासदायक तर मोदींच्या भाजपला फायदेशीर ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.



22 comments:

  1. सखोल झाले आहे हे विश्लेषण

    ReplyDelete
  2. देशाच्या पुढच्या पंतप्रधान या बहन मायावती जीच आहेत

    ReplyDelete
  3. गणित अचूक समजावून सांगितले आहे. प्रभाव, धोका आणि मोदींचा फायदा तोटा स्पष्ट जाणवतो.

    ReplyDelete
  4. प्रियांका गांधी पहिल्यांच निवडणुकीत चमत्कार करतील,अशी अपेक्षा काॅंग्रसलाही नसेल.पुढच्या युपी विधानसभा निवडणुकीत त्या काॅंग्रेसचे ट्रम्पकार्ड असतील.त्यासाठी ही चाचणी आहे,असे मला वाटते.कारण राजकीय डावपेच आखताना इंन्संट रिझल्टचा विचार नसतो.त्यामुळे केवळ सपा-बसपाची मते कापणं आणि पूर्वपट्यात बेस तयार करणे शिवाय शक्य झाल्यास सीट मिळवणे अशी कांग्रेसची रणनिती असू शकते.राहुल गांधी यांच्याकडे वय हा मोठा फॅक्टर आहे ते २०२४मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील.तोपर्यंत मोदी लाट ओसरली असेल.
    मकरंद दंडवते

    ReplyDelete
  5. आपले विश्लेषण बरोबर आहे

    ReplyDelete
  6. ग्रेट। मस्तलिहिले आहेस दीपक.

    ReplyDelete
  7. छान झालाय लेख. केवळ हुबेहुब चेहऱ्यामुळे मते मिळणार नाहीत हे खरंय. आता काँग्रेससोबत उत्तर प्रदेशमध्ये मायावती अखिलेशने युती नाही केल्यास तर भाजपलाच फायदा होईल.

    ReplyDelete
  8. प्रियंका यांच्या आगमनामुळे राहुल यांचे हात बळकट होणार आहेत. 2014 मध्ये मोदी लाटेत सुपडा साफ झालेल्या काँग्रेस कडे यूपी मध्ये आता दोनच जागा आहेत. म्हणजे यापेक्षा जास्त गमावल्या सारखे पक्षाकडे काहीच राहिले नाही. मात्र 5 राज्याच्या निकालानंतर राहुल यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातच यूपी कडे लक्ष द्यायला घरची व्यक्ती असल्याने राहुल महारष्ट्र वा इतर बड्या राज्याकडे जास्त लक्ष देवु शकतील. त्यामुळे प्रियंका या राहुल यांना पर्याय नाही तर मदतगार जास्त ठरू शकतील. आत्ता मोदी लाट ओसरली आहे, त्यामुळे
    यूपी त काँग्रेस 2 पेक्षा जास्त जागा यंदा नक्कीच कमावेल, त्याचे श्रेय प्रियंका यांना देवुन त्याची राजकारणात एन्ट्री यशस्वी झाली हे ही सिद्ध हॉइल. मात्र त्यामुळे राहुल कमी ठरणार नाहीत. प्रियंका यांना राजकारणात आणण्याचा निर्णय त्यानीच घेतल्याने प्रियांकाचे यशाचे श्रेय टीम लीडर म्हणून राहुल यांच्या योग्य निर्णय क्षमतेला द्यावे लागेल.

    त्यामुळे तुम्ही माडलेले मुद्दे पटण्यासारखे आहेत.

    खरे तर प्रियंका अस्त्रा आगदी योग्य वेळी बाहेर काढण्याचा निर्णय घेणाऱ्या राहुल यांचेच यावेळी अभिनंदन करायला हवे. कदाचित 2014 मध्ये मोदी लाटेत प्रियंका अस्त्र ही उपयोगी ठरले नसते आणि पदार्पणातच त्यांच्या माथी अपयशाचा शिक्का बसला असता. त्यामुळे हीच वेळ प्रियंका यांच्या एन्ट्री ची योग्य आहे. असे मला वाटते....

    ReplyDelete
  9. भा ज पा के वोट स्थिर है वो नही बटेंगे नुकसान सपा बसपा का होने की संभावना है

    ReplyDelete
  10. Article chhan hota. Ajun vachayla awdel.

    ReplyDelete
  11. सर अगदी परफेक्ट विश्लेषण केलेय. समाजवादी आणि बसपाने कॉँग्रेसला सोबत न घेतल्याने मतविभाजाजन होणार हे कटू सत्य आहे. त्यामुळे बीजेपी लाच फायदा अधिक होण्याची शक्यता आहे.

    ReplyDelete
  12. सर अगदी परफेक्ट विश्लेषण केलेय. समाजवादी आणि बसपाने कॉँग्रेसला सोबत न घेतल्याने मतविभाजाजन होणार हे कटू सत्य आहे. त्यामुळे बीजेपी लाच फायदा अधिक होण्याची शक्यता आहे.

    ReplyDelete
  13. प्रियंका अस्र ..
    काँग्रेसला मोठा फायदा होईल, असे वाटते.

    ReplyDelete
  14. सर, विश्लेषण छान केलेत..... Tamboli G.B. P.I.....

    ReplyDelete