Tuesday, April 7, 2020

लोकांनी टाळ्या वाजवल्या, दिवे पेटवले… यात मोदींचे श्रेय किती?

 



रात्री घरातील दिवे बंद करून जनतेला पणत्या आणि मेणबत्त्या पेटवायला सांगणाऱ्या भारताच्या पंतप्रधानांनी आधी स्वत: कोरोना महामारीच्या नियंत्रणाचे दिवे लावायला हवेत, असे मोदींचे टीकाकार म्हणतात. भारतातल्या २० टक्के जनतेलाही या म्हणण्यात तथ्य वाटलेले नाही, हे ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता समोर आले. कारण ८० टक्क्यांपेक्षा जास्त घरात जे मोदींनी सांगितले ते घडले. २२ मार्चलाही असेच घडले होते. कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या देश बांधवांना टाळ्या आणि थाळ्या वाजवून सलामी द्या, हे मोदींचे आवाहन ८०/८५ टक्के जनतेने अत्यंत उत्साहाने पाळले होते. तरीही “मोदींनी हे ‘तमाशे’ आता तरी बंद करावेत आणि साथ नियंंत्रणासाठी ते काय करताहेत हे देशाला सांगावे,” असे मोदी विरोधक म्हणताहेत. ते मोदींचे विरोधक आहेत म्हणून तसे म्हणताहेत का? मुळात, असे म्हणणारे सगळेच मोदींचे विरोधक आहेत का? त्यांचे म्हणणे योग्य असेल तर मग भारतातली ८०/९० टक्के जनता मोदींना प्रतिसाद द्यायला वेडी आहे का? पाहूया या प्रश्नांची उत्तरे काय सांगताहेत ते. 


१७ मार्चच्या रात्रीचे संबाेधन, २९ मार्चच्या सकाळची मन की बात आणि २ एप्रिलच्या सकाळचा व्हीडीओ संदेश यात कुठेच पंतप्रधान मोदी यांनी भारत कोरोनाशी कसा लढा देतो आहे, हे देशवासियांना सांगितले नाही. पुढे काय होऊ शकते हेही सांगितले नाही. या देशात पुरेसे मास्क, पुरेसे सेनिटायझर, पुरेसे हाॅस्पिटल्स, पुरेसे व्हेंटिलेटर्स आहेत की नाहीत, नसतील तर आपण ते कसे निर्माण करतो आहोत या विषयी त्यांनी चकार शब्दही काढला नाही. पंतप्रधानांसारख्या पदावरच्या माणसाने देशवासियांना संबोधित करताना अशी माहिती देऊन नागरिकांना आश्वस्त करायला हवे, अशी अपेक्षा टीका करणारे व्यक्त करतात. ती अपेक्षा चुकीची आहे, असे म्हणता येत नाही. कारण आतापर्यंत देशाच्या नेत्याचे देशासाठीचे संबोधन तसेच राहिलेले आहे. खरी मेख आहे ती इथेच. 
आपण जे काही करतो आहोत ते देशाच्या आणि देशबांधवांच्या हिताचेच करतो आहोत यावर या देशातल्या बहुसंख्य जनतेचा विश्वास आहे, यावर नरेंद्र मोदी यांचा ठाम विश्वास आहे. देशातल्या नागरिकांनी प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा निवडून देऊन आपल्या कार्यपद्धतीवर आणि क्षमतांवर पूर्ण विश्वास दाखवला आहे आणि कोरोना विरुद्धच्या लढाईतही तो विश्वास कायम राहील, अशी त्यांची खात्री आहे. म्हणून आपण काय करीत आहोत हे जनतेला सांगत बसायची त्यांना गरज वाटत नसावी. हा फाजिल आत्मविश्वास आहे का? तर असू शकतो. पण तो तसा आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक निकालांशिवाय आपल्याकडे आज तरी दुसरी काही फूटपट्टी नाही. 

पूर्वीच्या नेत्यांनी अमूक एक असे केले म्हणून सर्वांनी तसेच केले पाहिजे, असे मानणाऱ्यांपैकी नरेंद्र मोदी नाहीत. आपल्या धक्का तंत्राने त्यांनी नेहमीच ते सिद्ध करून दिले आहे. कोरोनाच्या बाबतीतही ते त्यांच्या पूर्वाधिकाऱ्यांची वाट चोखळणार नाहीत हे उघड आहे. चूक झाली तर ती थेट जनतेशी संवाद साधून मान्य करायची, त्यासाठी जनतेची माफीही मागायची. अशावेळी जनता माफ करते ही त्यांची धारणा आहे. तसे नोटबंदीनंतर घडले आहे आणि आताही गरिबांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागितली आहेच. हा थेट संवाद आहे. जनतेला तो आवडतो हे मोदींना चांगले माहिती आहे. त्यामुळे बहुसंख्य जनता आणि ते स्वत: यांच्यामध्ये ते अन्य कोणाला थारा देत नाहीत. ना पत्रकार, ना विरोधी पक्ष, ना राजकीय सल्लागार. असा थारा मिळत नाही म्हणून बहुतांश जण चिडतात आणि टीका करतात, अशी जनतेचीही धारणा झाली आहे. पण त्याच जनतेचा कथित कैवार घेणाऱ्यांना मात्र ती बाब लक्षात येत नाही. गडबड होते ती तिथे. 

टाळ्या, थाळ्या वाजविण्याच्या आणि विद्युत दिवे बंद करून पणत्या, मेणबत्त्या पेटवण्याच्या त्यांच्या आवाहनाकडे पाहू. असे केल्याने कोरोना नियंत्रणात येणार आहे का? मुळीच नाही. म्हणजे टीका करणारे खरे तेच बोलताहेत. फक्त जे त्यांना कळते आहे ते मोदींनाही कळत असते आणि या देशातल्या सर्वसामान्य जनतेलाही कळत असते हे त्यांना कळत नाही. किंवा कळूनही वळत नाही. म्हणून बहुसंख्य जनता त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. ही बाब मोदींना कळते म्हणून मग तेही या मंडळींकडे दुर्लक्ष करतात, हे वास्तव आहे. यात ज्या काही १५/२० टक्के लोकांना सत्य जाणून घ्यायचे असते त्यांना महत्वच राहात नाही. पण वर नमूद केलेल्या परिस्थितीचे परिणाम असेच असतात. अशा परिस्थितीत दोष द्यायचा तर तो बहुमताला महत्व असलेल्या लोकशाही व्यवस्थेला आणि समूहाच्या मानसिकतेला द्यायला हवा. मोदींना समूहाची मानसिकता कळते आणि त्यांच्या टीकाकारांना ती तितकीशी कळत नाही, हे वास्तव नाकारून कसे चालेल? 

टाळ्या, थाळ्या वाजवणे आणि पणत्या पेटवणे यात समूहाचे मानसशास्त्र काय आहे, हे नीट समजून घ्यायला हवे. २२ मार्चपासून संपूर्ण देश लाॅकडाऊनमुळे ठप्प झाला आहे. जे अत्यावश्यक सेवेत आहेत, ते आपल्या कामात व्यग्र आहेत; पण बहुसंख्य नागरिक, अत्यावश्यक सेवेत नाहीत म्हणून इतक्या दिवसांपासून कामाशिवाय घरी बसून आहेत. रिकामे डोके भुताचे घर बनते, अशी एक इंग्रजी म्हण आहे. त्यामुळे त्यांना काही तरी काम किंवा कार्यक्रम देत राहाण्याची गरज आहे. या मंडळींना वृत्तपत्रे, दूरदर्शन आणि इंटरनेट त्यांच्या गल्लीपासून व्हाईट हाऊसपर्यंतच्या सर्व बातम्या प्रत्येक मिनिटाला अपडेट करून देत आहेत. भरभरून अनुशंगिक माहितीही देत आहेत. पण ही माध्यमे या मंडळींना कार्यक्रम किंवा काम देऊ शकत नाहीत आणि त्यांच्यात सहभागीही करून घेत नाहीत ही त्यांची मर्यादा आहे. वाचन करणे हेही काम आहेच, असे कोणी म्हणेल. पण भारतात किती टक्के लोकांना वाचनाची, तेही अशा माध्यमांवर वाचनाची सवय आहे याची आकडेवारी तपासली तर त्याच्या मर्यादा लक्षात येतील. ज्यांना खरोखर काही जाणून घ्यायचे असते तेच अशा माध्यमांचा प्रयत्नपूर्वक वापर करतात हे लक्षात घ्यायला हवे. 

चांगला वक्ता/ संवादक (कम्युनिकेटर) काय करतो? तर ज्यांच्याशी तो संवाद साधू इच्छीतो त्यांना मधून मधून प्रश्न विचारतो, टाळ्या वाजवायला सांगतो, घोषणा द्यायला सांगतो किंवा मधून मधून त्यांना हसविण्याचा प्रयत्न करतो. तरच श्रोते किंवा प्रेक्षक त्या वक्त्याशी मनाने जुळून राहातात. हेच तत्व पंतप्रधानांनी १५ दिवसांत दोन वेळा दिलेल्या कार्यक्रमाच्या बाबतीत आहे. ‘साथ रोग निर्मूलनाच्या राष्ट्रीय कामात माझाही काही तरी सहभाग आहे’ असा वैयक्तिक विचार सामूहिकरित्या त्यामुळे केला गेला. अशी वैयक्तिक विचार/कृती सामूहिकपणे करण्याची संज्ञा समूहाच्या मानस‘शास्त्रात’ सांगितली आहे की नाही माहिती नाही. पण ती अत्यंत महत्वाची बाब आहे. टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यात किंवा दिवे लावण्यात कसला आलाय राष्ट्रीय सहभाग? असा प्रश्न वाजवी नक्कीच आहे; पण वैयक्तिक विवेकासाठी, समूहाच्या मानसिकतेसाठी नाही. वैयक्तिक विवेकाला समूहात स्थान असत नाही. तो पूर्णपणे भावनांवर चालणारा खेळ आहे. विशेषत: छुप्या, दाबून ठेवलेल्या भावनांना साद घातली की समूहाला पटकन उद्दीपित करता येते. व्यक्तिला वैयक्तिकरित्या जे करायचे असते पण समाजाच्या लाजेखातर किंवा कायद्याच्या भीतीने, स्वत:च्या दृश्य प्रतिमेला जपण्याच्या गरजेतून किंवा अगदीच पर्याय नसतो म्हणून ती ते करू शकत नाही, अशा बाबी ती समूहाचा भाग होऊन पटकन करते. टाळ्या, थाळ्या वाजवण्यात आणि दिवे लावण्यात हे तत्व कुठे लागू पडते, ते पाहू.

२२ मार्चला ज्यांनी टाळ्या, थाळ्या, घंटा, शंख वाजवले ते आणि ५ एप्रिलला ज्यांनी दिवे लावले, फटाके फोडण्याचा वेडेपणा केला त्यांच्यातले ९५ टक्क्याहून अधिक लोक जे अत्यावश्यक सेवांमध्ये व्यग्र नाहीत आणि ‘वर्क फ्राॅम होम’ही करीत नाहीत असेच होते. मोदींना प्रतिसाद देणाऱ्या अशा समूहांना ज्यांनी जवळून पाहिले आहे त्यांनी त्या समूहांतील एकेक व्यक्ती डोळ्यासमोर आणून या नजरेने पहावी. या मंडळींना अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडणारी मोजकी मंडळी दिसत होती. गरिबांना धान्य, किराणा वाटप करणाऱ्या मंडळींचे फाेटो वृत्तपत्रातून प्रसिद्ध व्हायला लागले होते. आपल्यालाही ( समाजासाठी ) असे काही तरी करता यायला पाहिजे होते, असे वाटणारी ही मंडळी होती. असे काही तरी करताना त्यांना आपले फोटो सोशल मिडीयावर डीपी म्हणून, स्टेटस म्हणून ठेवायचे होते. त्यांची ती भावना आणि गरज मोदींनी ओळखली हे मोदींचे श्रेय आहे.  त्यांना अत्यंत सोपा आणि सहज करता येईल आणि आपण हे करीत आहोत हे इतरांना दाखवता येईल असा कार्यक्रम त्यांनी दिला म्हणून त्या आवाहनांना प्रतिसाद मिळाला हे लक्षात घ्यायला हवे. याच मंडळींना समजा घरात बसून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना कागदावर पत्र लिहा असा कार्यक्रम मोदींनीच दिला असता, अशा ओळखीच्या कोणत्याही व्यक्तीला एक फोन करून कृतज्ञता व्यक्त करा असे सांगितले असते तर असाच प्रतिसाद मिळाला असता का? अजिबात मिळाला नसता याची मला शंभर टक्के खात्री आहे. कारण भावना वैयक्तिक असली तरी कृती मात्र सामूहिक असावी लागते. तसे उपरोक्त कार्यक्रमात होत नाही. समाज कोरोनामूक्त व्हावा यासाठी आणि कोरोनाशी लढणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी प्रार्थना करा असे सांगितले असते तर कदाचित काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला असता. कारण त्यात कुटुंब म्हणून सामूहिक कृती करता येण्याची थोडी तरी शक्यता आहे. थोडक्यात काय, तर ८०/९० टक्के जनता वेडी आहे म्हणून हे कार्यक्रम यशस्वी झालेले नाहीत तर ती समाजातील मोठ्या वर्गाची गरज होती म्हणून यशस्वी झाले आहेत हे लक्षात घ्यायला हवे. यात मोठ्या समूहाची मानसिकता ओळखता येण्याचे श्रेय तेवढे मोदींचे आहे. 

विरोधी पक्षातील नेते या पद्धतीने विचार करताना कधी दिसत नाहीत. उलट या जनभावनेला, समाजाच्या मानसिकतेला वेडेपणा, तमाशा ठरविण्याची चूक ते अजूनही करीत आहेत. मोदींनी जो कार्यक्रम दिला तोच राहूल गांधींनी दिला असता तर यशस्वी झाला असता का? तर माझ्यामते झाला असता. कदाचित थोडा कमी; पण यशस्वी झाला असता. कारण ती घरात कामाशिवाय बसून असलेल्या, आपण समाजासाठी काहीच करीत नाही आहोत, अशा न्यूनगंडात जात असलेल्या समाजाची मानसिक गरज होती. पण समाजाची मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांना ओळखता आली असती (जी काँग्रेसच्याच महात्मा गांधींनी सर्वार्थाने ओळखली होती ) तर आज या पक्षाची इतकी वाताहत झालीच नसती. मोदींनी आश्वासन देऊनही जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये टाकलेच नाहीत, काळा पैसा विदेशातून आणलाच नाही, नोटाबंदीच्या काळात लोकांना प्राणाला मुकावे लागले, प्रचंड नोकऱ्या गेल्या, गुंतवणूक ठप्प झाली आणि तरीही लोकं मोदींनाच का निवडून देतात हे काँग्रेसच काय, बहुतांश विरोधी पक्षांच्या नेत्यांना कळत नाही त्यामागचे कारणही तेच आहे. त्यांना समूहाची मानसिकता ओळखता येत नाही. इंदिरा गांधी यांना ही कला बऱ्यापैकी अवगत होती. म्हणूनच इंदिरा गांधी इंदिरा गांधी होत्या. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व लाभूनही प्रियंका गांधी यांना इंदिरा गांधी होता येत नाही. कारण प्रियंकाना इंदिरा गांधींचे रूप मिळाले पण समाजाची मानसिकता ओळखण्याची कला सोबत मिळाली नाही. एकाच वेळी आंदोलन करीत असूनही अण्णा हजारेंना जेवढी लोकप्रियता २०१२-१३ मध्ये मिळाली होती त्याच्या १० टक्केही रामदेव बाबांना मिळाली नव्हती त्यामागेही समूहाच्या मानसिकता ओळखण्याचाच मुद्दा होता. अरविंद केजरीवाल यांना ती निवडणुकीच्या अंगाने मोदींपेक्षा कदाचित अधिक कळाली म्हणून मोदीही त्यांना पराभूत करू शकले नाहीत हे आपण पाहतोच आहोत.  

एकूणच काय, तर अशा कृतींकडे राजकीय नजरेतून पाहाण्याऐवजी समाजाच्या नजरेतून पाहिले पाहिजे. राजकीय मंडळींना त्यांची राजकीय गरज म्हणून कदाचित तसे करता येत नसेल किंवा तसे करूनही व्यक्त करता येत नसेल हे समजू शकते. पण पत्रकारांनी तरी समाजाशी संबंधित घटनांकडे मानसिकतेच्या अंगाने पाहायला काय हरकत आहे? अर्थात, त्यासाठी राजकीय भूमिकांची वस्त्रे उतरवून ठेवण्याची कला आधी पत्रकारांना आली पाहिजे असे मला वाटते.

12 comments:

  1. पंतप्रधानांनी कोरोणाविरुद्ध आपण पण कशी लढाई लढतोय, साधनसामुग्री काय आहे व पुढील परिणाम कसे कसे होणार या पैकी पहिला आणि तिसरा हे दोनच मुद्दे पुसटशे सांगितले होते.
    आपल्याकडे प्रगत राष्ट्रांनी एवढी अत्याधुनिक साधनसामुग्री तसेच लागणारी उपकरणे,वस्त्रे यांची वानवा आहे ही गोष्ट सर्वांना ज्ञात आहे. आता जर हीच गोष्ट पंतप्रधानांनी सांगितले असती तर भारतीय जनतेचे किती मोठे मानसिक खच्चीकरण झाले असते याचा विचारच न केलेला बरा. पंतप्रधानांनी अत्यंत सूचकपणे या गोष्टी मांडल्या व लागोलाग कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेल्या व्यक्तीशी संवाद साधून जनतेला आश्वस्त केले की अत्यंत समर्पण वृत्तीने काम चालू आहे. त्यामुळे त्यामुळे जनता एक प्रकारच्या आनंदप्रमोद भ्रमात जगतेय आणि या घडीला हेच आवश्यक आहे असं मानण्यास हरकत नाही.

    ReplyDelete
  2. हे आकलन बरोबर आहे पण जनतेस कोरोना पासुन लढन्यास उपकरणे आणी औषधे आहेत का नाही ते सान्गुण काय होणार नसेल तर त्यांची उपलब्धता कशी होइल हे काम सरकारचे आहे ते त्यांनी केले तर फार।
    जनतेत उत्पन्न नकारत्मकता दूर करण्या साठी केलेला हा एक उपाय आणि मिडिया द्वारे जमात प्रकरण ज्यास्त दाखवल्यानी जनता आणि विशेष तरुण पीढियाँच्या मना मधे ज्यास्त नकारत्मकता आणि ना दिसनारी हिंसात्मकता निर्माण होत आहे या साठी जर सरकारने आणि विपक्षी दलानी काही नाही केले तर कोरोना द्वारे झालेल्या हानि पेक्षा जास्त हानि होणार हे नक्की

    ReplyDelete
    Replies
    1. मीडिया बऱ्याचदा अतिरेक करते या मताशी मी सहमत आहे. पत्रकारिता ही समाजाची अभिव्यक्ती न राहता माध्यम प्रतिनिधींची किंवा मालकांची अभिव्यक्ती झाली की असे होणारच. व्यक्तीगत सद्सद्विवेक वाढवण्यासाठी कोणता समाज (व्यक्तींचा समूह या अर्थाने.जात, धर्म या अर्थाने नव्हे. सोप्या शब्दात देश, प्रदेश म्हणता येईल) पुढाकार घेतो त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असते हा इतिहास आहेच.

      Delete
  3. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या मनात ‘आपण समाजासाठी काहीही करू शकत नाहीयेत’ ही न्यूनगंडाची भावना होतीच, पण त्यानंतरही वेडेपणाच्या लाटेत आपणही सहभागी झालो, मोजके बुद्धीवंत आपल्यावर हसत आहेत, यामुळे खजिलतेची भावनाही होती. देशात सध्या सुरु असलेले प्रयत्न स्पष्टपणे समोर येत नसले तरी इतर देशांच्या तुलनेत आपण कुठे आहोत, याचे आलेख वारंवार येत आहेेत. काही दिवसात हेही चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत त्यामुळे समाज म्हणून सकारात्मक मानसिकता जपत किमान अशा सामूहिक एकतेच्या भावनेला, कृतज्ञतेच्या भावनेला हातभार लावण्याचे काम आपण करू शकतो, हेच खरे.

    ReplyDelete
  4. दिपकजी सर्वप्रथम पीएम यांनी जनतेच्या भावनांशी न खेळता वैज्ञानीक पध्दतीने विचार करून आवश्यक ते साहीत्य उपलब्ध करून देण्यासाठी शक्ती वापरावी,त्यांचे वागणे पाहता त्यांचा विश्वास नेमका कोणावर ते कळत नाही,त्यांनी २ वेळा आवाहन करून आलेले परिणाम समोर आहेत

    ReplyDelete
  5. कुंदन पवार धुळे

    ReplyDelete
  6. समुह संवाद मानसशास्त्राचा पुरेपूर वापर आपल्या अभ्यासपुर्ण लेखनशैलीत जाणवला.दिपकजी आपण सक्षम आहातच सर. मॅक्झिम गाॅर्गी यांचे आई मी वाचलय त्यात आंदोलनात जनतेला छोट्या छोट्या गोष्टीत सहभागी करून आम्ही सहभागी असल्याची भावना व्यक्त केल्याचे संदर्भ आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. मी समूहाच्या मानसशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास केलेला नाही. पण त्या अनुषंगाने निरीक्षण करणे मला आवडते. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

      Delete
  7. समाज मनात 2013 पासूनच असुरक्षेची ( हिंदू धर्मात) भावना रुजविण्यात मोदीजी सफल झाले आणि आपले कर्तव्य व इमान गहाण ठेवलेला काही मीडिया हे काम सातत्याने रेटत आला आहे दिव्यात तेल संपण्या आधी तेल टाकण्या चे काम काही लोक सातत्याने करीत आहेत त्यामुळे जनमानसात मोदी एक सुपर हिरो किंवा देवदूत रुपात घर करून बसल्याने संमोहित झाल्या प्रमाणे जनता देखील स्वतःची सद्सद विवेक बुद्धी गहाण ठेऊन त्यात सामील होत आहे. हीच ट्रिक हिटलर वापरत होता

    ReplyDelete
  8. समाज मनात 2013 पासूनच असुरक्षेची ( हिंदू धर्मात) भावना रुजविण्यात मोदीजी सफल झाले आणि आपले कर्तव्य व इमान गहाण ठेवलेला काही मीडिया हे काम सातत्याने रेटत आला आहे दिव्यात तेल संपण्या आधी तेल टाकण्या चे काम काही लोक सातत्याने करीत आहेत त्यामुळे जनमानसात मोदी एक सुपर हिरो किंवा देवदूत रुपात घर करून बसल्याने संमोहित झाल्या प्रमाणे जनता देखील स्वतःची सद्सद विवेक बुद्धी गहाण ठेऊन त्यात सामील होत आहे. हीच ट्रिक हिटलर वापरत होता

    ReplyDelete