Sunday, November 29, 2015

तुझे आहे तुजपाशी....



तुझे आहे तुजपाशी परि तू जागा भुललाशी... हे वाक्य आठवण्याचं कारण नुकतीच केलेली तीन दिवसांची ट्रीप. खरं तर आम्ही या दिवाळीत केरळला जायचं ठरवत होतो; पण सुटी मिळण्याची चिन्हे स्पष्ट नसल्याने त्या बुकींगची रिस्क घेतली नाही. मग मुंबईहून आलेल्या पाहुण्यांसमवेत कुठे जायचं हा प्रश्न समोर आल्यावर काही मित्रांशी, सहकार्यांशी चर्चा केली आणि एक तीन दिवसांची ट्रीप आखली. या तीन दिवसांत आम्ही होतो औरंगाबादला लागून असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात. आपल्या अवती भोवती काय काय आहे आणि आपल्याला त्याची असायला हवी तशी कल्पनाच नव्हती याची जाणीव या तीन दिवसांत सतत होत राहीली. संदीप खरेच्या एका गाण्यातलं वाक्य आहे....दूरचं पाहाता पाहाता जवळ पाहायचंच राहीलं...तसच काही तरी वाटत होतं. तुम्हालाही तसं वाटू द्यायचं नसेल तर एक वेळ तुम्हीही अशी ट्रीप अवश्य अनुभवा. या ट्रीपचे अनुभव त्यासाठीच शेअर करतो आहे. आवडले तर प्रतिक्रीया तर द्याच, पण अवश्य ट्रीपलाही जा.

.. तर आमची ट्रीप सुरू झाली औरंगाबादहून सकाळी ७.२५ वाजता. पहिला टप्पा होता कायगावचा. म्हणजे अहमदनगर रस्त्यावर मराठवाड्याची हद्द संपते ते गाव. प्रवरा आणि गोदेच्या संगमाचं गाव. नगरकडे जाताना आपल्या डाव्या हाताला एक रस्ता जातो तो रामेश्वर मंदिराकडे. खरं तर एका दैनिकात माहिती आलेली असल्याने आमच्या मुंबइंच्या पाहुण्यांना टोके गावात असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर पाहायचं होतं. पण आम्ही घुसलो कायगावला. म्हणजे नदीच्या अलिकडच्या गावाला. त्या मंदिराचाच फोटा इंटरनेटवर सिद्धश्वर मंदिराचा म्हणून आम्हाला आढळला ही वेगळी गोष्ट. प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्षाने पावन झालेलं हे ठिकाण आहे, असं सांगण्यात येतं. उत्तम दगडी कोरीव काम हे त्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. ज्यांना अशा वास्तू पाहाण्यात, अभ्यासण्यात रस आहे त्यांनी अवश्य या मंदिराला भेट द्यायला हवी.
हे आहे रामेश्वर मंदिर.
मंदिराच्या सभामंडपाचा एक कोपरा बाहेरच्या बाजूने.
प्रवेशद्वाराच्या खांबावरची नक्षी.
त्यानंतर आम्ही सिद्धेश्वर मंदिरात जायचा निर्णय रद्द केला. कारण ते मंदिरही असच आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. हा थांबा नियोजित कार्यक्रमात नसल्याने पुढे वेळ जाईल, असे वाटले म्हणून आम्ही पुढे निघालो. पुढे देवगडलाही आम्हाला जाता आलं असतं. ते दत्ताचं मंदिर आहे. अत्यंत उत्तम देवस्थान. राहायची आणि जेवणाची कमी किमतीत उत्तम सोयही इथे होते. देखणं आणि प्रसन्न ठिकाण म्हणून तुम्ही अवश्य तुमच्या ट्रीपमध्ये या ठिकाणाचा समावेश करावा अशी आमची शिफारस राहील.
नेवासे फाट्याहून आम्ही नेवासे गावाकडे वळालो. तिथे अर्थातच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहीली तो जगप्रसिद्ध खांब आहे आणि म्हाळसा माेहिनीराज मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणांबद्दल बऱ्यापैकी माहिती असल्याने ती इथे नोंदवत नाही. दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही संगमनेरकडे प्रवासाला सुरूवात केली. संगमनेरला उत्तम व्हेज जेवण केल्यावर आम्ही पेमगिरीकडे निघालो. संगमनेर तालुक्यातले हे गाव म्हणजे महावटवृक्षाचे गाव. आडवळणाला असलेला हा महावटवृक्ष मोठ्या क्षेत्रात पसरलेला आहे. त्या बद्दल तिथे माहिती देणारे फलक असायला हवे असे वाटत होते. पण एकही फलक नाही. ती गरज काही प्रमाणात तिथेच एक छोटे हाॅटेल सुरू केलेले व्ही.बी. कोल्हे भागवतात. त्यांच्या मोबाइंलमध्ये या वृक्षाबद्दलची एक आख्यायिका आहे. दंतकथेसारखी असल्याने जिज्ञासूंची भूक त्याने भागत नाही. पण काही तरी ऐकायला मिळाल्याचे तेवढेच समाधान.  खालचा व्हीडीओ पहा. तुम्हाला या वटवृक्षाची थोडी कल्पना यायला हरकत नाही.



पारंब्यांचे झाड, त्याच्या पुन्हा पारंब्याा आणि त्यांचे पुन्हा झाड अशा प्रकारे हा वटवृक्ष महावटवृत्र झाला आहे. त्याचे मोजमाप, इतिहास वैज्ञाानिक पद्धतीने शोधण्याचे काम, त्याचे संवर्धन याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ती जबाबदारी सध्या कोणाकडे आहे याचा काहीही थांगपत्ता तिथे गेलेल्यांना लागत नाही.
या झाडाच्या विस्तारीत फांद्या आणि लोंबणाऱ्या पारंब्या मुलांना आणि आपल्यालाही आनंद देण्याचे काम इमाने इतबारे करतात. पहा काही फोटो.
या महावटवृक्षाच्या सानिध्यात काही वेळ घालवल्यावर आमचा प्रवास भंडारदराकडे सुरू झाला.  रात्री ८ वाजेच्या सुमाराला आम्ही तिथल्या विश्रामगृहात पाहोचलो. तिथून जवळच समाधान नावाचे हाॅटेल आहे. घरगुती पण स्वच्छ, टापटीपेचे आणि उत्तम अन्नाचा दर्जा राखणारे राजूभाऊ पवार यांना त्यासाठी आम्ही बिलाच्या रकमेबरोबरच मनापासून धन्यवादही दिले. त्यांच्याकडे राहाण्याची देखील सोय आहे असे त्यांनी सांगितले. त्यांचे संपर्क क्रमांक  9421961196, 8698765252 असे आहेत.
भंडारदरा विश्रामगृहातून निघाल्यावर बाहेर असलेला रस्ता हा रिंगरोड आहे. काॅलनी बसस्टाॅपासून डाव्या बाजुला थोड्या अंतरावर एक रस्ता वरच्या दिशेने जातो. त्या रस्त्याने निघालो की आपण सर्व प्रेक्षणीय स्थळांना जाऊन पुन्हा या बसस्टाॅपजवळ पोहोचतो. साधारण तीन तास त्यासाठी  लागतात.
पहिले ठिकाण आहे रतनगड. तिथे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्यामंदिरातील पिंड वेगळ्याच आकाराची आहे आणि ती बहुतांश काळ पाण्यात असते. फोटो पहा.
मंदिराच्या आतील दगडी काम अत्यंत देखणे आणि रेखीव आहे. त्याची ही झलक.

चारही बाजूने उच डोंगर आणि मध्ये हे मंदिर. अत्यंत रमणीय असा हा नजारा होता. या मंदिराकडे जाताना सृष्टीचे जे सौंदर्य दृष्टीस पडले ते अद्वितीय असेच होते. पहा फोटो.

रस्त्यातच एक उंच मचाण लागले. त्यावर चढून आजूबाजूचे जे काही दृश्य पाहायला मिळते तेही अप्रतिम. आमच्या समवेत ८४ वर्षे वयाचे पद्माकर जहागिरदार हे सौ. मुक्ताचे मामाही होते. तेही अत्यंत उत्साहाने या मचाणावर चढले.
नंतर आम्ही गेलो ती आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची दरी अशी जिची ख्याती आहे त्या सांदण व्हॅलीकडे. जाताना काही किमी अंतर पायीच जावे लागते. घनदाट जंगल म्हणजे काय हे आम्हाला तिथे अनुभवायला आले. पाहा फोटो.
सांदण दरी अत्यंत खाेल आहे. तिथे खाली खाली जाताना वरचे उंच कडे अंगावर कोसळतील की काय अशी भीती वाटत राहाते. तिथे दगडांतून वाहाणारे पाणी म्हणजे अमृतच. आम्ही सर्वांनी मनसोक्त ते जलपान करून घेतले. या दरीकडे जातानाही ना रस्ते दाखवणारे फलक आहेत ना काही सूचना. त्या तिथे उभारण्याची गरज पदोपदी जाणवत होती. तिथे पर्यटन विभागाने मुक्कामाचीही सोय केली आहे असे आम्हाला सांगण्यात आले., पण आम्हाला तशी काही व्यवस्था तिथे आढळून आली नाही. दरीत खाली जाण्याचा आनंद मात्र अफलातूनच. धोका नसताना तिथे अवश्य जायला हवे.
या दरीचा आनंद घेतल्यानंतर आम्ही कोकणकडा पाहायला गेलो. घाटधरला तो आहे मात्र, फलक सहजपणे दिसत नसल्याने आम्ही गावात निघून गेलो. विचारल्यावर परत काही किमी उलटे येऊन आम्ही कोकणकड्याकडे वरच्या बाजूला गेलाे. एका केटी वेअरचे दरवाजे ही माहितीसाठी वळण्याची खूण म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही. उंच कड्यावर तिथे व्ह्यू पाॅइंट केला आहे. खाली धरण आणि सुंदर रस्ता तर बाजूला उंचच उंच डोंगर दिसतात.
तिथून पुढे हा रस्ता शेंडी गावाकडे येतो. शेंडी गावातून घोटीकडे जाणाऱ्या रस्त्याने गेल्यानंतर कळसूबाई या डोंगरमाथ्याचा पायथा लागतो. तिथे देवीचे एक पुरातन मंदिरही आहे. आमच्या गाडीचा टेन्शन राॅड अचानक तुटल्यामुळे तिकडे आम्हाला जाता आले नाही. त्याच रात्री निघून आम्ही शिर्डीत पाहोचलो.
शिर्डीला साईबाबांचे दर्शन तर झालेच पण नवनाथ दिघे यांच्या ओळखीमुळे आम्हाला साई प्रसादालयाचे स्वयंपाकगृहही पाहाता आले. हे स्वयंपाकगृह सोलर एनर्जिवर चालवले जाते. एकाचवेळी प्रत्येकी ४० किलो तांदळाचा भात बनवणारे प्रेशर कुकर आणि एका तासात प्रत्येकी ४ हजार पोळ्या बनवणारे रोटी मेकर्स, भांडी स्वच्छ करणारे यंत्र हे आमच्या कुटुंबियांना जास्त आवडले. तिथली स्वच्छता आणि यंत्रणा मनात भरणारी आहे.
शिर्डीला आम्ही वेट एन जाॅय नावाच्या वाॅटरपार्कचाही अानंद घेतला. आतापर्यंत महाराष्ट्रातले बरेच वाॅटरपार्क पाहिले आणि अनुभवले आहेत. त्यात मला व्यवस्थेच्या, सोयी सुविधांच्या दृष्टीने हा वाॅटरपार्क अत्यंत चांगला वाटला.
रात्री आम्ही औरंगाबादला परतलो.
जमलं तर तुम्ही अवश्य अशा ट्रीपचा अानंद घ्या.






5 comments:

  1. खरोखरच खूप उपयुक्त माहिती दिलीत , मी आभारी आहे. धुळ्याच्या जवळ देखील साल्हेर आणि मुल्हेर ही दोन रमणीय ठिकाणे एकदा भेट दिली पाहिजेच अशी आहेत.
    आपण दिलेल्या माहिती मुळे मला महाराष्ट्रातील अजुन काही ठिकाणांची माहिती मिळाली ती माझ्यासारख्या निसर्ग प्रेमींना आकर्षित केल्या शिवाय राहणार नाही. पुनश्च धन्यवाद.

    ReplyDelete
  2. अप्रतिम वर्णन केलय सर...या स्थळांना नक्कीच जावू. अशीच एक ट्रीप आपल्या सातपुड्यात व्हायला हरकत नाही

    ReplyDelete
  3. सर, तुम्ही पेमगिरीला वटवृक्ष पाहिलात पण किल्ल्यावर नाही गेलात. येथील किल्लाही इतिहासाची साक्ष देणारा आहे. शहाजीराजांनी जिजाईला काही दिवस सुरक्षित स्थळ म्हणुन या किल्ल्यावर ठेवले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना शिवनेरीवर नेले. जिजाई काही दिवस जर येथे राहिल्या असल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला असता. संगमनेरकरांच्या नशिबी तो भाग्याचा क्षण आला नाही. याशिवाय संगमनेरला निसर्ग सौदर्य लाभल्याने अनेक छोटी छोटी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. पुढील वेळी निश्चितच आपण या किल्ल्यावर जाल. संगमनेरची प्रसिध्द भेळ मात्र खाण्याचे राहुन गेले.

    ReplyDelete