Sunday, March 3, 2019

सिस्टर्स Nurses/Sisters


(नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून माझी आई औरंगाबादमधल्या युनायटेड सिग्मा रुग्णालयात दाखल होती. साधारण महिनाभर तिच्या सोबतीने रुग्णालयात काढला. त्या महिनाभरातल्या एका सकाळी तुकड्या तुकड्याने केलेल्या या नोंदी.)

सकाळी ६ वाजताच रुग्णालय जागं व्हायला लागतं. जानेवारी महिना असल्याने रुग्णालयाबाहेर अजून अंधारच असतो. त्यामुळे घड्याळ पाहिलं नाही तर सकाळ झाली हे कळायला सिस्टरच्या राऊंडशिवाय दुसरा पर्याय नसतो. तिच्या त्या हसतमुख फेरीनेच खरं तर रुग्णालय जागं होतं. पूर्वी असं जागं करायला वासुदेव यायचा. त्याच्या हातातल्या चिपळ्या आणि गाण्याचा खणखणीत आवाज ही आमच्या लहानपणी प्रसन्न करणारी लहर असायची. मधली खूप वर्षे या प्रसन्न लहरीला मुकायला झालं होतं. पण अलिकडे असाच भल्या सकाळी (त्या वेळेला पहाट म्हणता येणार नाही ) एक रामदासी येतो. अर्थात, आठवड्यातून एखाद्या दिवशीच. खणखणीत आवाजात त्याच्या तोंडून मनाचे श्लोक ऐकताना तोच जुना आनंद आणि प्रसन्नपणा अनुभवता येतो. रुग्णालयातली सिस्टर मला त्या वासुदेवासारखी वाटते. अंथरुणातून उठवताना मन प्रसन्न करणारा वासुदेव.

रुग्णालय ही खरं तर प्रसन्न वाटावी अशी जागा नाही. ज्या रुग्णासोबत आपण थांबलेले असू त्याला रात्री व्यवस्थित झाेप लागली तर आपल्याला लागणार. आपला रुग्ण व्यवस्थित झोपला तरी शेजारचा झोपेलच याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत सकाळी सहा वाजता येणारी (खरं तर आणली जाणारी ) जाग त्राग्याची, अनैच्छीकच असण्याची शक्यता जास्त. पण हसतमुखाने वावरणाऱ्या या सिस्टर्स तो त्रागा कुठल्या कुठे गायब करतात.

२०-२२ वर्षे वयाच्या, पाच फूट किंवा त्यापेक्षाही कमी उंचीच्या (मोजका अपवाद) या अत्यंत सर्वसामान्य दिसणाऱ्या मुली. त्यातल्या बहुतांश तर सावळ्याच. केरळी असण्याची ती एक दृश्य खूण. आपापसात बोलतात त्या वेळी त्यांच्या उच्चारांनी, बोलण्याच्या लकबीने आपल्याला गंमत वाटते. त्यातल्या काही अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आलेल्या तर काहींना दोन-चार महिनेच झालेले. या कालावधीनुसार त्यांच्या हिन्दी बोलण्यातला प्रवाहीपणा, उच्चार अधिक सफाईदार होत गेलेला. एकमेकींशी आपल्या मातृभाषेतच बोलणाऱ्या या केरळच्या मुली रुग्णांशी, त्यांच्या सोबत्यांशी आपल्या खास शैलीत हिन्दी बोलण्याचा प्रयत्न करतात. 'मावशी', 'मामा' हे रुग्णालयातले परवलीचे शब्द मराठी असूनही त्यांच्या तोंडून मराठी माणसाइतकेच स्पष्टपणे बाहेर पडतात. एरवी कोणी रुग्ण किंवा नातेवाईक त्यांच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी मात्र त्यांचा अवघडलेपणा पाहाण्यासारखा असतो. त्यांच्या त्या अवघडलेपणाला, गोंधळाला गमतीचा विषय बनवून त्यांची टिंगल करणारेही रुग्ण आणि त्यांचे सोबती इथे भेटतात. त्यावेळी दुसरी केरळी सिस्टर तिच्या मदतीला धावून येते आणि दोघी मग मल्याळम भाषेत काही तरी बोलत एकमेकींकडे पाहात हसतात. आता या दोघी या मराठी माणसांची आपल्या भाषेत खिल्ली उडवताहेत, हे आपल्याला कळतं.


आपल्या घरापासून, गावापासून कोसो दूर आलेल्या या मुली. अनेक महिने त्या तिकडे फिरकलेल्याही नसतात. अलिकडे त्यांच्याकडे रुग्ण किंवा रुग्णांचे सोबती हमखास विचारणा करताना दिसतात ती केरळला येऊन गेलेल्या पुराची.
"हां. बहुत बडा बाड आया। बट हमारा घर सेफ", एक सिस्टर अशाच एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली.
"व्हेन देअर वाॅज हेवी रेन, यू वाॅज हिअर ओर देअर?"
" नही। मै इधर था।" ती म्हणाली आणि निघून गेली.
मधून मधून होणारी अशी प्रश्नोत्तरे काही दिवसांसाठी रुग्णालयात थांबलेल्या माझ्यासारख्याला सवयीची होत गेलेली. या मुलींंना तर महिनोन् महिने प्रत्येक खोलीत या प्रश्नांना सामोरे जावे लागत असेल. त्या प्रत्येक वेळी त्यांना घराची, घरच्यांची आठवण येत असेल का? की याचीही त्यांनी सवय करून घेतली असेल?

आमच्याच खोलीतल्या रुग्णाच्या नातलगाने एकदा दुपारी सिस्टरसाठी असलेली काॅलबेल दाबली. काही सेकंदात सिस्टर हजर झाली.
"सोयी थी क्या?" नातेवाईक महिलेने विचारले.
"मै? सोयी? कैसा पाॅसिबल?"
"नही। तुम्हारी आंखे ऐसी दिख रही है।"
"हाँ। आँखे?" एवढंच ती सिस्टर म्हणाली.
रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा दरारा पाहाता भर दुपारी या मुलींना झोपण्याची प्राज्ञा असण्याची कणभरही शक्यता नाही. मग डोळे काय सांगत होते? वाॅशरूममध्ये जाऊन रडता तर येते ना, एवढेच ते सांगत असावेत.

एकदा रात्री आमच्या शेजारच्या रुग्णाच्या नातलगाने काॅलबेल दाबल्यावर नेहमीची सिस्टर येण्याऐवजी वेगळीच महिला संपलेल्या सलाईनची नळी काढायला आली. अर्ध्यातासाने आमच्या रुग्णाची सलाईन संपली तेव्हा ती सिस्टर आली. शेजारच्या नातलग महिलेने विचारले, "आहे का तू? मला वाटलं घरी गेली."
"घरी सकाळी जाणार. मी नाईटला आहे"
"मघाशी दुसरीच बाई आलथी सलाईन काढाले. म्हनून म्हनलं, तू गेली की काय.."
"ते मला एना उलटी होत होती. तब्बेत बरी नाही ना माझी," मराठी असलेली ती सिस्टर म्हणाली.
"तब्बेत बरी नाही? मग जा की घरी. आराम कर जरा," त्या बाई काळजीने म्हणाल्या तशी ती २०-२२ वर्षांची मुलगी नुसतीच हासली. कशावर? त्या बाईंच्या बोलण्यावर? स्वत:वर? की परिस्थितीवर?

हासत राहाणं हा या मुलींच्या नोकरीचा भाग असावा का? नक्कीच असणार. रुग्णाचं अर्ध औषध तर त्यांचं हासतमुख असणंच असतं. काही दिवस रुग्णाचा सोबती म्हणून रुग्णालयात राहाणाऱ्या मी एकाही सिस्टरला रुग्णाजवळ येताना रागीट, त्रस्त किंवा चिंतीत चेहऱ्याची पाहिले नाही. हासतमुख हा त्यांच्या युनिफाॅर्मचाच भाग असावा जणू.

या सिस्टर मुलींपैकी केरळी मुली आणि मराठी मुली यातही थोडा फरक जाणवत राहातो. मराठी मुलींचा 'मराठी बाणा' मधून मधून अनुभवायला येत राहातो. फार नाही तरी, प्रतिउत्तर देतानाची भाषा, टोन आणि आवाज यात हा बाणा डोकावल्याशिवाय राहात नाही. मल्याळम भाषा बोलणाऱ्या मुली आणि मराठी बोलणाऱ्या मुली यांचं सख्यही फारसं अनुभवायला येत नाही. हे सख्य स्वभाषिकांशी मात्र, घट्ट असलेलं मला दिसत राहिलं.

डाॅक्टरांच्या राऊंडच्या वेळी डाॅक्टर आणि पेशंट दोघेही मराठी असतील तर त्यांच्यातला संवाद या केरळी मुलींना समजत नाही. मराठीत संवाद करताना डाॅक्टर अचानक काही सूचना मराठीतून देतात आणि या मुलींना ते कळत नाही. अशावेळी उडणारा या मुलींचा गोंधळ सावरायला डाॅक्टरांसोबत आलेले आरएमओ पुढे येतात आणि यांची सुटका करतात.

हाॅस्पिटलमधले रुग्ण, त्यांचे आजार, त्यांच्या वेदना, त्यामुळे आपल्याला होणारा त्रास हे सारे खरेच असते. तरीही आजुबाजूला वावरणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कृतीतून, हालचालींमधून ज्या काही कथा सांगत असतात त्याही शब्दांशिवाय आपल्याला ऐकू येऊ लागल्या तर रुग्णालयात मोठा काळ घालवणेही सुसह्य व्हायला लागते हे मी या निमित्ताने अनुभवले आहे.