Sunday, July 5, 2015

आडनावाचा शोध



आमच्या वडिलांचं आणि लहान काकांचं आडनाव पटवे आहे आणि मधल्या दोन काकांचे आडनाव नेवासकर आहे. हे असं कसं? असा प्रश्न आम्हाला नेहमीच पडायचा. त्यावेळी कोणी सांगायचं की आपलं खरं आडनाव नेवासकर हेच आहे; पण एक ओळखीचे गृहस्थ माझ्या वडिलांना शाळेत दाखल करायला घेऊन गेले अाणि त्यांनी आडनाव सांगितलंच नाही. त्यावेळी गुरूजींनी त्यांचंच आडनाव वडिलांच्या नावासमोर लिहून टाकलं. पुढे लहान काका त्याच शाळेत दाखल झाले. मोठ्या भावाचं आडनाव तेच लहान भावाचं असं म्हणत गुरूजींनी त्यांचं आडनावही पटवे लिहून टाकलं. त्यामुळे दोन भाऊ पटवे झाले आणि मधले नेवासकर राहीले.

लहानपणी ही कारणमिमांसा पटणे न पटण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही त्यावर विश्वास ठेवला. पण पुढे आडनावाची ती तर्कसंगती पटेनाशी झाली. कधी तरी त्या विषयाच्या खोलात जाऊ, असं ठरवलं आणि विषय मागे पडला. कधी कोणी तरी विचारायचं (अजूनही विचारतात ) की, पटवे हे आडनाव तर मुस्लीमांमध्ये असतं. मग तुमचं आडनाव असं कसं? आतापर्यंत आम्ही काही तरी सांगून वेळ मारून न्यायचो. आता मात्र, पटवे आडनावाचा एक पटण्यासारखा इतिहास आमच्या कानावर आलाय. तो खरा आहे का, याचा शोध सुरू केलाय.

त्याचं झालं असं की, वर्षभरापूर्वी पटवे परिवाराचा एक मेळावा भुसावळच्या सुधीर पटवे आणि शिरीष नेवासकर या चुलत-चुलत भावांनी त्यांच्याच शहरात आयोजित केला होता. ज्यांना ज्यांना शक्य झालं ते मुंबई, पुणे, धुळे, जळगाव, खंडवा, नाशिक अशा शहरांतून या मेळाव्याला हजर राहीले. त्यात एक सर्वात वयस्क असलेल्या अामच्या काकूही होत्या. सर्वात वयस्क असल्याने त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा, चार गोष्टी उपयोगाच्या सांगाव्यात, कुळधर्म, कुळाचाराबाबत नव्या पिढीतल्या सुनांच्या काही शंकांचे निरसन करावे असा आग्रह आम्ही धरला. हो-नाही म्हणत त्या तयार झाल्या आणि बोलायला लागल्या. बाेलता बोलता त्यांनी आपण मूळचे पाठक आहोत, असं सांगितलं. ही माहिती नवी हाेती. त्यामुळे त्यावर त्यांना आम्ही प्रश्न विचारायला लागलो आणि त्यांच्या बोलण्यातून पटवे आडनावाची एक वेगळीच गोष्ट समोर आली. ती अशी होती....

नेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातलं औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीजवळचं गाव. तिथे म्हाळसा-मोहनीराज मंदिर आहे. तीच आमच्या परिवाराची कुलस्वामीनी. ( त्या मंदिराबद्दल आणि त्यातल्या प्रथांबद्दल कधी तरी लिहील. कारण त्यावरही चर्चा व्हायला हवी.) तेच आमच्या परिवाराचं मूळ गाव होतं म्हणे. त्या मंदिराच्या समोरच असलेल्या दोन गल्ल्यांमध्ये समोरासमोर पाठक आणि पटवे आडनावाची कुटुंब राहात होती. पाठक हे हिंदू तर पटवे हे मुसलमान. पण अनेक पिढ्यांपासून  ते गुण्यागोविंदाने राहात असत. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असत. पण एक दिवस असा उजाडला की नेवासा गावात हिंदू-मुसलमान अशी धार्मिक दंगल सुरू झाली. दोन्ही धर्मिय एकमेकांच्या जीवावर उठले. अनेकांना भोसकून ठार करण्यात आलं तर अनेक घरं जाळली गेली. त्या दंगलीत मंदिराच्या पुजाऱ्यांपैकी असलेल्या एका पाठक कुटुुंबाला एका मुस्लीम (पटवे) कुटुंबाने आपल्या घरी नेऊन लपवून ठेवलं. तिथे ते दोन दिवस बकरीच्या दुधावर हे कुटुंब राहीलं. तिसऱ्या दिवशी पटवे परिवारातल्या एका वयस्क गृहस्थांनी एक मोटार मागवली. त्यात ते स्वत: पुढे बसले आणि पाठक परिवाराच्या सदस्यांना बुरखे घालून गाडीत बसवलं. दंगल सुरूच होती. त्यामुळे मुस्लीमांकडून गाडी अडवली गेली. त्यावेळी त्यात आपल्या परिवारातील महिला आहेत असं सांगून त्या गृहस्थांनी वेळ मारून नेली. या पाठक परिवाराला दूरच्या एका शहरात नेऊन त्यांनी सुरक्षितपणे सोडलं. निरोप घेताना पाठक परिवारातले ज्येष्ठ सदस्य त्यांना म्हणाले, '' आम्ही तुमचे उपकार कसे फेडावे, हे कळत नाही.'' त्यावर ते मुस्लीम गृहस्थ म्हणाले की, यात उपकार कसले, ही तर माणुसकी आहे. आता तुम्ही नेवासा सोडलंच आहे; पण आम्हाला विसरू नका एवढीच अपेक्षा आहे. त्यावर पाठक म्हणाले की, आम्ही तर काय, पण आमच्या अनेक पिढ्या तुमचं नाव विसरणार नाही. कारण आजपासून आम्ही आमच्या नावातच तुमचं नाव सामावून घेत आहोत. त्यानंतर ते पाठक कुटुंब आपलं आडनाव पटवे असंच लावायला लागलं.

काकूंनी हा किस्सा सांगितला आणि सगळेच आवाक झाले. हे कोणीच ऐकलं नव्हतं. तिथे उपस्थित पटवे परिवारातील एक सदस्य लगेच उभे राहीले. म्हणाले, आम्हाला माहिती आहे की आम्ही पटवे परिवारातील आहोत. म्हणूनच इथे आलोय. पण आमचं आडनाव पाठक आहे. ते कसं? असा प्रश्न आम्हालाही पडत होता. त्याचं उत्तर आता मिळालं.

पटवे आडनावाची ही कथा काहीशी पटणारी आहे. आता गरज आहे ती तिची सत्यता पडताळून पाहाण्याची. तसंच घडलं असेल तर हा काळ कोणता होता? कोणत्या वर्षी तिथे दंगल झाली होती? ते कोण गृहस्थ होते ज्यांनी इतकी माणूसकी दाखवली? असे उपकार आणि त्यांची अशी पिढयान् पिढ्या होत राहाणारी परतफेड हे सारेच इतरांनी आदर्श घ्यावा असेच नाही का?  दंगल हा माझा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे आता मी नेवासातल्या त्या दंगलीच्या शोधात काम सुरू केलं आहे. कोणाकडे काही संदर्भ असतील तर अवश्य द्या, एवढीच विनंती आहे.

6 comments:

  1. सर....अाडनावाचा शाेध.....

    हा लेख फार अावडला.....

    ReplyDelete
  2. पटवे सर, तुमच्या एकंदर लिखाणाच्या बाजावरुन असचं काही झालं असावे, असं वाटत होतचं..... किंवा आपल्या मूळ स्वभाव धर्माला जागत तुम्ही स्वत:च ही काही तरी रंजक, कल्पक कथा जन्माला घातली असावी... असो... आता तर काय, तुमचा सर्वधर्मसमभाव अधिकच दृढ होईल... आता शोध घेताचं आहात तर हाही शोध घ्या की ते तुमचे नेवाशातील जुने घर आता कोणाच्या ताब्यात आहे, ते समजलं की सगळा समभाव तुमच्या लक्षात येईलच... अर्थात ते तुम्ही लक्षात घेतलं तरच....

    ReplyDelete
  3. ऑर्थर हेले यांची रुट्स नामे कादंबरी आहे. माणसाला त्याच्या इतिहासाबद्दल कुतूहल असतेच. गावकरीतले दिवस आठवतात...

    ReplyDelete
  4. पाठक, पटवे सर, खरंच तुमची अाडनावाची कथा एेकली की मलाही माझ्या अाडनावाची कथा अाठवली. अामचं मुळ नाव सरदेशपांडे, पण फलटणवरून अाले म्हणून पुढे फलटणकर रुढ झाले....

    ReplyDelete
  5. सुन्दर खूप आवडला

    ReplyDelete
  6. Sir tumhi lihilela aadnavacha shodh khup aavdla...

    ReplyDelete