Sunday, November 29, 2015

तुझे आहे तुजपाशी....



तुझे आहे तुजपाशी परि तू जागा भुललाशी... हे वाक्य आठवण्याचं कारण नुकतीच केलेली तीन दिवसांची ट्रीप. खरं तर आम्ही या दिवाळीत केरळला जायचं ठरवत होतो; पण सुटी मिळण्याची चिन्हे स्पष्ट नसल्याने त्या बुकींगची रिस्क घेतली नाही. मग मुंबईहून आलेल्या पाहुण्यांसमवेत कुठे जायचं हा प्रश्न समोर आल्यावर काही मित्रांशी, सहकार्यांशी चर्चा केली आणि एक तीन दिवसांची ट्रीप आखली. या तीन दिवसांत आम्ही होतो औरंगाबादला लागून असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात. आपल्या अवती भोवती काय काय आहे आणि आपल्याला त्याची असायला हवी तशी कल्पनाच नव्हती याची जाणीव या तीन दिवसांत सतत होत राहीली. संदीप खरेच्या एका गाण्यातलं वाक्य आहे....दूरचं पाहाता पाहाता जवळ पाहायचंच राहीलं...तसच काही तरी वाटत होतं. तुम्हालाही तसं वाटू द्यायचं नसेल तर एक वेळ तुम्हीही अशी ट्रीप अवश्य अनुभवा. या ट्रीपचे अनुभव त्यासाठीच शेअर करतो आहे. आवडले तर प्रतिक्रीया तर द्याच, पण अवश्य ट्रीपलाही जा.

.. तर आमची ट्रीप सुरू झाली औरंगाबादहून सकाळी ७.२५ वाजता. पहिला टप्पा होता कायगावचा. म्हणजे अहमदनगर रस्त्यावर मराठवाड्याची हद्द संपते ते गाव. प्रवरा आणि गोदेच्या संगमाचं गाव. नगरकडे जाताना आपल्या डाव्या हाताला एक रस्ता जातो तो रामेश्वर मंदिराकडे. खरं तर एका दैनिकात माहिती आलेली असल्याने आमच्या मुंबइंच्या पाहुण्यांना टोके गावात असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर पाहायचं होतं. पण आम्ही घुसलो कायगावला. म्हणजे नदीच्या अलिकडच्या गावाला. त्या मंदिराचाच फोटा इंटरनेटवर सिद्धश्वर मंदिराचा म्हणून आम्हाला आढळला ही वेगळी गोष्ट. प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्षाने पावन झालेलं हे ठिकाण आहे, असं सांगण्यात येतं. उत्तम दगडी कोरीव काम हे त्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. ज्यांना अशा वास्तू पाहाण्यात, अभ्यासण्यात रस आहे त्यांनी अवश्य या मंदिराला भेट द्यायला हवी.
हे आहे रामेश्वर मंदिर.
मंदिराच्या सभामंडपाचा एक कोपरा बाहेरच्या बाजूने.
प्रवेशद्वाराच्या खांबावरची नक्षी.
त्यानंतर आम्ही सिद्धेश्वर मंदिरात जायचा निर्णय रद्द केला. कारण ते मंदिरही असच आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. हा थांबा नियोजित कार्यक्रमात नसल्याने पुढे वेळ जाईल, असे वाटले म्हणून आम्ही पुढे निघालो. पुढे देवगडलाही आम्हाला जाता आलं असतं. ते दत्ताचं मंदिर आहे. अत्यंत उत्तम देवस्थान. राहायची आणि जेवणाची कमी किमतीत उत्तम सोयही इथे होते. देखणं आणि प्रसन्न ठिकाण म्हणून तुम्ही अवश्य तुमच्या ट्रीपमध्ये या ठिकाणाचा समावेश करावा अशी आमची शिफारस राहील.
नेवासे फाट्याहून आम्ही नेवासे गावाकडे वळालो. तिथे अर्थातच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहीली तो जगप्रसिद्ध खांब आहे आणि म्हाळसा माेहिनीराज मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणांबद्दल बऱ्यापैकी माहिती असल्याने ती इथे नोंदवत नाही. दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही संगमनेरकडे प्रवासाला सुरूवात केली. संगमनेरला उत्तम व्हेज जेवण केल्यावर आम्ही पेमगिरीकडे निघालो. संगमनेर तालुक्यातले हे गाव म्हणजे महावटवृक्षाचे गाव. आडवळणाला असलेला हा महावटवृक्ष मोठ्या क्षेत्रात पसरलेला आहे. त्या बद्दल तिथे माहिती देणारे फलक असायला हवे असे वाटत होते. पण एकही फलक नाही. ती गरज काही प्रमाणात तिथेच एक छोटे हाॅटेल सुरू केलेले व्ही.बी. कोल्हे भागवतात. त्यांच्या मोबाइंलमध्ये या वृक्षाबद्दलची एक आख्यायिका आहे. दंतकथेसारखी असल्याने जिज्ञासूंची भूक त्याने भागत नाही. पण काही तरी ऐकायला मिळाल्याचे तेवढेच समाधान.  खालचा व्हीडीओ पहा. तुम्हाला या वटवृक्षाची थोडी कल्पना यायला हरकत नाही.



पारंब्यांचे झाड, त्याच्या पुन्हा पारंब्याा आणि त्यांचे पुन्हा झाड अशा प्रकारे हा वटवृक्ष महावटवृत्र झाला आहे. त्याचे मोजमाप, इतिहास वैज्ञाानिक पद्धतीने शोधण्याचे काम, त्याचे संवर्धन याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ती जबाबदारी सध्या कोणाकडे आहे याचा काहीही थांगपत्ता तिथे गेलेल्यांना लागत नाही.
या झाडाच्या विस्तारीत फांद्या आणि लोंबणाऱ्या पारंब्या मुलांना आणि आपल्यालाही आनंद देण्याचे काम इमाने इतबारे करतात. पहा काही फोटो.
या महावटवृक्षाच्या सानिध्यात काही वेळ घालवल्यावर आमचा प्रवास भंडारदराकडे सुरू झाला.  रात्री ८ वाजेच्या सुमाराला आम्ही तिथल्या विश्रामगृहात पाहोचलो. तिथून जवळच समाधान नावाचे हाॅटेल आहे. घरगुती पण स्वच्छ, टापटीपेचे आणि उत्तम अन्नाचा दर्जा राखणारे राजूभाऊ पवार यांना त्यासाठी आम्ही बिलाच्या रकमेबरोबरच मनापासून धन्यवादही दिले. त्यांच्याकडे राहाण्याची देखील सोय आहे असे त्यांनी सांगितले. त्यांचे संपर्क क्रमांक  9421961196, 8698765252 असे आहेत.
भंडारदरा विश्रामगृहातून निघाल्यावर बाहेर असलेला रस्ता हा रिंगरोड आहे. काॅलनी बसस्टाॅपासून डाव्या बाजुला थोड्या अंतरावर एक रस्ता वरच्या दिशेने जातो. त्या रस्त्याने निघालो की आपण सर्व प्रेक्षणीय स्थळांना जाऊन पुन्हा या बसस्टाॅपजवळ पोहोचतो. साधारण तीन तास त्यासाठी  लागतात.
पहिले ठिकाण आहे रतनगड. तिथे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्यामंदिरातील पिंड वेगळ्याच आकाराची आहे आणि ती बहुतांश काळ पाण्यात असते. फोटो पहा.
मंदिराच्या आतील दगडी काम अत्यंत देखणे आणि रेखीव आहे. त्याची ही झलक.

चारही बाजूने उच डोंगर आणि मध्ये हे मंदिर. अत्यंत रमणीय असा हा नजारा होता. या मंदिराकडे जाताना सृष्टीचे जे सौंदर्य दृष्टीस पडले ते अद्वितीय असेच होते. पहा फोटो.

रस्त्यातच एक उंच मचाण लागले. त्यावर चढून आजूबाजूचे जे काही दृश्य पाहायला मिळते तेही अप्रतिम. आमच्या समवेत ८४ वर्षे वयाचे पद्माकर जहागिरदार हे सौ. मुक्ताचे मामाही होते. तेही अत्यंत उत्साहाने या मचाणावर चढले.
नंतर आम्ही गेलो ती आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची दरी अशी जिची ख्याती आहे त्या सांदण व्हॅलीकडे. जाताना काही किमी अंतर पायीच जावे लागते. घनदाट जंगल म्हणजे काय हे आम्हाला तिथे अनुभवायला आले. पाहा फोटो.
सांदण दरी अत्यंत खाेल आहे. तिथे खाली खाली जाताना वरचे उंच कडे अंगावर कोसळतील की काय अशी भीती वाटत राहाते. तिथे दगडांतून वाहाणारे पाणी म्हणजे अमृतच. आम्ही सर्वांनी मनसोक्त ते जलपान करून घेतले. या दरीकडे जातानाही ना रस्ते दाखवणारे फलक आहेत ना काही सूचना. त्या तिथे उभारण्याची गरज पदोपदी जाणवत होती. तिथे पर्यटन विभागाने मुक्कामाचीही सोय केली आहे असे आम्हाला सांगण्यात आले., पण आम्हाला तशी काही व्यवस्था तिथे आढळून आली नाही. दरीत खाली जाण्याचा आनंद मात्र अफलातूनच. धोका नसताना तिथे अवश्य जायला हवे.
या दरीचा आनंद घेतल्यानंतर आम्ही कोकणकडा पाहायला गेलो. घाटधरला तो आहे मात्र, फलक सहजपणे दिसत नसल्याने आम्ही गावात निघून गेलो. विचारल्यावर परत काही किमी उलटे येऊन आम्ही कोकणकड्याकडे वरच्या बाजूला गेलाे. एका केटी वेअरचे दरवाजे ही माहितीसाठी वळण्याची खूण म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही. उंच कड्यावर तिथे व्ह्यू पाॅइंट केला आहे. खाली धरण आणि सुंदर रस्ता तर बाजूला उंचच उंच डोंगर दिसतात.
तिथून पुढे हा रस्ता शेंडी गावाकडे येतो. शेंडी गावातून घोटीकडे जाणाऱ्या रस्त्याने गेल्यानंतर कळसूबाई या डोंगरमाथ्याचा पायथा लागतो. तिथे देवीचे एक पुरातन मंदिरही आहे. आमच्या गाडीचा टेन्शन राॅड अचानक तुटल्यामुळे तिकडे आम्हाला जाता आले नाही. त्याच रात्री निघून आम्ही शिर्डीत पाहोचलो.
शिर्डीला साईबाबांचे दर्शन तर झालेच पण नवनाथ दिघे यांच्या ओळखीमुळे आम्हाला साई प्रसादालयाचे स्वयंपाकगृहही पाहाता आले. हे स्वयंपाकगृह सोलर एनर्जिवर चालवले जाते. एकाचवेळी प्रत्येकी ४० किलो तांदळाचा भात बनवणारे प्रेशर कुकर आणि एका तासात प्रत्येकी ४ हजार पोळ्या बनवणारे रोटी मेकर्स, भांडी स्वच्छ करणारे यंत्र हे आमच्या कुटुंबियांना जास्त आवडले. तिथली स्वच्छता आणि यंत्रणा मनात भरणारी आहे.
शिर्डीला आम्ही वेट एन जाॅय नावाच्या वाॅटरपार्कचाही अानंद घेतला. आतापर्यंत महाराष्ट्रातले बरेच वाॅटरपार्क पाहिले आणि अनुभवले आहेत. त्यात मला व्यवस्थेच्या, सोयी सुविधांच्या दृष्टीने हा वाॅटरपार्क अत्यंत चांगला वाटला.
रात्री आम्ही औरंगाबादला परतलो.
जमलं तर तुम्ही अवश्य अशा ट्रीपचा अानंद घ्या.






Friday, October 23, 2015

मी घेतलेला समुद्र नाटकाचा रसास्वाद...



विवाहबाह्य संबंध हा विषय दूरचित्रवाणी वाहिन्यांनी घराघरात नेल्याच्या आजच्या काळात 'समूद्र' हे भद्रकाली प्राेडक्शनने रंगमंचावर आणलेलं त्या विषयावरच नाटक 'बोल्ड' वाटतच नाही. उलट टीव्ही मालिकांमधील अशा संबंधांचा आणि त्यांच्या मांडणीतला उथळपणा या नाटकातील प्रगल्भ वैचारिक मंथनामुळे अधोरेखीत होतो. खर तर विवाहबाह्य संबंधांपेक्षाही एकट्या पडलेल्या विवाहीत स्त्रीच्या गरजांवर हे नाटक अधिक प्रखर प्रकाश टाकत आणि म्हणूनच पातिव्रत्याची चौकट मोडूनही यातली नायिका प्रेक्षकांच्या मनात सहानुभूतीचे घर करू शकते. नाटकातील हे वैचारिक मंथन सर्वच प्रेक्षकांना पटेल अस नाही; पण अशा विषयावर विचार करायला नक्की लावत, हे कादंबरीकार मिलींद बोकील यांच आणि नाटककार चिन्मय मांडलेकरांचही यश म्हणायला हव.

एखादी कादंबरी नाटकाच्या चौकटीत बसवण हे सोप काम नाही. उत्तम लेखक असलेल्या चिन्मय मांडलेकरांनी मात्र ते काम प्रभावीपणे केल आहे. जोडीदाराच्या वागण्यामुळे निर्माण झालेली नायकाच्या मनातील अस्वस्थता, संशयाची मनात घोंगावणारी भुतं, नाियकेच्या मनातील भावनांची वादळं यांना व्यक्त करण्यासाठी कादंबरीकाराला सविस्तर वर्णनाचा कॅनव्हाॅस िमळू शकतो. नाटकात ते तितक्याच परिणामकारकपणे आणण्यासाठी पात्रांचे संवाद आणि स्वगत याला पर्याय नसतो. मांडलेकरांनी त्यासाठी नाटकाच्या रचनेत आणि दिग्दर्शनात शोधलेल्या जागा चपखल आहेत. समुद्राच्या काजेचा पार्श्वसंगितासाठी केलेला प्रभावी उपयोग, मोजकेच पण वातावरण निर्मिती करू शकणारे नेपथ्य, समुद्राच्या काठची रेती दाखवण्यासाठी रंगमंचावर टाकलेले कापड आणि त्याचाच डोंगर बनवण्यासाठी केलेला कल्पक वापर ही दिग्दर्शनाची अंगेही एकूण परिणामकारकतेत मोठीच भर घालतात.
नायकाच्या मनात पत्नीच्या चारित्र्याविषयी असलेली शंका खरी ठरणे आणि त्यातही नाियकेकडूनच तिच्या विवाहबाह्य संबंधांची कबुली िदली जाणे ही एकमेव घटना या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. या एका घटनेशिवाय या नाटकात दुसरे काहीही घडत नाही. शिवाय नाियका ही कबुली नाटकाच्या पहिल्या अंकातच देऊन टाकते. त्यामुळे आता नायक काय करणार, हा एकमेव प्रश्न उत्तरार्धात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी वापरला गेला आहे. पण हे कथानक आणि औत्सुक्याचा हा प्रश्नही काही नवा नाही. तरीही नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवते ते केवळ आणि केवळ नाियकेच्या युक्तीवादामुळे. या युक्तीवादाचे श्रेय मिलींद बोकील यांना द्यायचे की चिन्मय मांडलेकरांना हे कादंबरी वाचलेल्या आणि नाटकही पाहिलेल्या वाचक प्रेक्षकांनीच ठरवायला हवे.
नाियकेचे विवाहबाह्य संबंध या नाटकाच्या केंद्रस्थानी असले तरी हे नाटक म्हणजे त्या संबंधांची कथा नाही. त्यामुळे अशा संबंधांच्या अनुशंगाने होणारी नाटकाची चर्चा हा या कलाकृतीवरचा अन्याय ठरू शकतो. नाटकात विवाहबाह्य संबंधांचे तुष्टीकरण केले आहे असे अनेकांना वाटण्याची शक्यता आहेच; पण त्याही पेक्षा उच्च मध्यमवर्गातील बुद्धीजीवी महिलेच्या तरल मनाची गरज तितक्याच तरलपणे चितारण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यावर चर्चा होण्याची अधिक गरज आहे. शुन्यातून विश्व निर्माण करण्याच्या नादात त्याच विश्वात गुरफटून गेलेल्या नायकाला पत्नीच्या काही भावनिक गरजाही असतात याचे झालेले विस्मरण चितारताना लेखकाने काॅर्पोरेट जगतात पैशाच्या पाठी धावणाऱ्या तसल्याच असंख्य नायकांचे डोळे उघडण्याचाच प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न विवाहबाह्य संबंधांच्या चर्चेत दुर्लक्षिला जात असेल तर त्या पायरीवर ते लेखक आणि दिग्दर्शक म्हणून चिन्मय मांडलेकरांचेच अपयश म्हणावे लागेल. नाटकातील नायक म्हणून त्यांनी केलेला अभिनय आणि तरल मनाच्या बुद्धीवादी नायिकेच्या भूमिकेला न्याय देताना स्पृहा जोशींनी जिवंत केलेेले पात्र मात्र बिनतोड आहे.
तुझ्या जागी मी असतो तर, म्हणजेच माझे विवाहबाह्य संबंध उघड झाले असते तर तू काय केले असते, या नायकाच्या प्रश्नाला नाियकेने दिलेले उत्तर हे उच्च मध्यमवर्गीय बदलत्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारे आहे. त्या उत्तरातच नाटकाचा सार सामावलेला आहे. म्हणूनच विवाहबाह्य संबंध नव्हे, स्त्री-पुरूषांनी एकमेकांकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा खरं तर या नाटकाचा विषय आहे. एकमेकांना समजून घेण्याचा संदेश देणारे हे नाटक आहे. पण नाटकाची चर्चा विवाहबाह्य संबंधाच्याच अनुशंगाने होताना िदसते. असो. त्या निमित्ताने का असेना, मध्यम आणि उच्च मध्यमवर्गाने हे नाटक पाहिले पाहिजे हे महत्वाचे.

Wednesday, October 21, 2015

आता जबाबदारी पालकमंत्री कदमांचीच

औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त  प्रकाश महाजन यांच्या विरुद्ध महापालिकेत अविश्वास ठराव करवून घेण्यात पालकमंत्री रामदास कदम यशस्वी झाल्यानंतर २१ आॅक्टोबरच्या दिव्य मराठीच्या अंकात लिहिलेले भाष्य..
महापािलकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्या विरूद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर होणे हा पालकमंत्री रामदास कदम यांचा राजकीय विजय आहे. ज्या एमआयएमची भीती दाखवून शिवसेनेने महापािलका जिंकली त्याच एमआयएमला ऐनवेळी बरोबर घेण्यात कदम यांना यश आले. भारतीय जनता पक्षालाही त्यामुळे ठरावाच्या बाजूने राहावे लागले. शिवाय, खासदार चंद्रकांत खैरे यांचेही आपल्या निश्चयापुढे काही चालत नाही, हे ते प्रस्थापित करू शकले. परिणामी त्यांचे राजकीय वजन वाढले आहे. अर्थात, औरंगाबाद महापािलकेसाठी कार्यक्षम आणि धाडसी अधि
कारी तातडीने मिळवण्याची जबाबदारीही  या यशामुळे त्यांच्यावर आली आहे. जिथे काम करायला बहुतांश अधिकारी इच्छूक नसतात, अशा िठकाणांमध्ये औरंगाबाद महापालिकाही आता गणली जाते. या अविश्वास ठरावामुळे नोकरशाही आणखीनच सावध झाली असेल. त्यामुळे राज्यातील कार्यक्षम अधिकाऱ्यांपैकी एखाद्याला महापािलकेसाठी आयुक्त म्हणून आणणे हे यापुढचे कौशल्य असेल. नव्हे, अाता पालकमंत्री कदम यांची ती जबबादारी आहे. एकीकडे या शहराला स्मार्ट हाेण्याची स्वप्ने पडू लागली आहेत आणि दुसरीकडे प्राथमिक गरजांच्या पूर्ततेचा खड्डा मोठा होत चालला आहे. महापािलकेचा अर्थसंकल्प अजून रितसर मंजूर होऊ शकलेला नाही. उत्पन्नाची साधनेही घटली आहेत. अशा परिस्थितीत चांगले अधिकारी यायला धजावणार नाहीत. म्हणूनच पालकमंत्री आणि त्यांना साथ देणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनाही प्रामाणिक आणि कार्यक्षम आयुक्त लवकरात लवकर महापािलकेसाठी आणण्याचे आव्हान पेलावे लागेल. अन्यथा, हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागल्याचा दोष त्यांना पत्करावाच लागेल.

Sunday, August 30, 2015

संकटाच्या हवाली होण्याची अपराधी वाट

औरंगाबादजवळ असलेल्या सुंदरवाडी गावाजवळ गुरूवारी अर्थात, २७ आॅगस्टच्या रात्री एका नोकरदार तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. त्या निमित्ताने माहिती घेत असताना या आधीही तिथे असेच प्रकार घडले असल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्या संदर्भात रविवारच्या दिव्य मराठीच्या सिटी पूल आऊटमध्ये भाष्य लिहीले. ते असे..

औरंगाबादजवळच्या सुंदरवाडीला गुरुवारी रात्री आणि त्याआधीही झालेले अत्यंत घृणास्पद प्रकार घडायला नकोच होते; पण असल्या प्रकारांसाठी पोिलसांना दोष देण्यात आणि हे शहर महिलांसाठी असुरक्षित झाले अाहे असा डांगोरा पिटण्यात मुळीच अर्थ नाही. िनर्जन आणि अंधाऱ्या जागी पोिलसांनी पहारा करीत बसावे, अशी अपेक्षा कोणी कशी करू शकतो? अशा निर्जन जागी एकांत शोधत गेलेल्या जोडप्यांबाबत असे प्रकार घडणारे हे काही एकमेव शहर नाही. ही गुन्हेगारांची पाठराखण नाही आणि समर्थन तर मुळीच नाही; पण वस्तुस्थितीपासून आपल्याला दूरही जाता येणार नाही. अशा निर्जन आणि अंधाऱ्या िठकाणी आपल्याला धोका होऊ शकतो असा साधा विचारही या एकांताच्या पाठी लागलेल्या जोडप्यांच्या मनाला शिवू नये? समाजाला अंधारात ठेवण्यासाठी आपण स्वत:ला अंधाराच्या आणि पर्यायाने संकटाच्या हवाली करीत आहोत, याचे भानही त्यांना राहू नये? याच परिसरात मारहाण, लूट आणि विनयभंग होऊनही आधी अनेकांनी तक्रारी केल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. घडलेला अत्याचारही अंधारात ठेवण्याची ही धडपड ज्या अपराधी भावनेतून केली जाते तोच अपराध अशा कृत्यांना खतपाणी घालतो आहे. सुंदरवाडीतील ही निर्जन जागा अशा बाबतीतली शहराजवळची एकमेव जागा नसावी. शहरातील अन्य जागीही एकांत शोधायला जोडपी जात असतील आणि तिथेही असे अंधारातच ठेवलेले प्रकार घडलेही असतील. आपल्याला लागलेली ठेच कोणी सांगत नाही म्हणून मागचा पुन्हा ठेचाळतो आणि त्यानंतरचाही. गुरुवारी रात्री झालेला प्रकारही त्या जोडप्याने अंधारात ठेवला असता तर पुढेही कदाचित असे प्रकार घडत राहिले असते. त्यामुळे फिर्याद देण्याची हिंमत दाखवल्याबद्दल त्या पीडित जोडप्याला औरंगाबादकरांनी मनोमन धन्यवादच द्यायला हवेत. पोिलसांनी पहारा करावा, अशी अपेक्षा नसली तरी पोिलसांचे खबरे, गुप्तवार्ता देणारी यंत्रणा अलीकडे मोडकळीस निघाली असावी, अशी शंका असल्या प्रकारांमुळे येते. अन्यथा असे घृणास्पद गुन्हे बंद करण्यासाठी पोिलसांना फिर्याद येण्याची वाट पाहावी लागली नसती.

Sunday, August 9, 2015

जागतिक बॅंक, पाकिस्तान आणि माधवराव चितळे

मित्रांनो,
दिनांक ९ आॅगस्ट २०१५ च्या दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचे मनोगत प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्याचे शब्दांकन करायची संधी मला मिळाली. जागेअभावी रसिकमध्ये हे मनोगत कापले गेले आहे. ते सविस्तर वाचता यावे यासाठी या ब्लाॅगवर देत आहे.
--------------------------------------------------------------------------------------

माधव चितळे

पाणी या विषयाकडे मी कसा आकर्षित झालो, याचा धांडोळा घेताना त्याची बिजं माझ्या बालपणात चाळीसगावला घालवलेल्या िदवसांत मला सापडतात. माझे वडील वकील होते आणि वेगवेगळ्या क्षेत्रीय पाहाणीसाठी जाताना ते मला सोबत घेऊन जात. त्यांचे बोट धरून चालताना शेती, कालवे, सिंचनाचे पाणी यांच्याशी माझा परिचय होत गेला. ब्रिटीशांच्या काळात जे पहिले बंधारे बांधले गेले त्यात चाळीसगावजवळच्या जामद्याला गिरणा नदीवर असलेल्या बंधाऱ्याचा समावेश होतो. १८६८ साली हा बंधारा बांधण्यात आला होता आणि त्याद्वारे होणारे सिंचन त्या वेळी फार महत्वाचे होते. चाळीसगाव त्यावेळी श्रीमंत गाव असण्याचे कारणच हा बंधारा होता. त्यावेळी चाळीसगावातले रस्ते सिमेंटचे होते. वस्ती कमी; पण गाव समृद्ध होतं. सिंचनाखालची शेती आणि कोरडवाहू शेती यातला फरक मला िदसत होता.
शालांत परीक्षेत मी महाराष्ट्रात दुसरा आलो होतो. त्यामुळे मी भारतीय प्रशासन सेवेत जावं, असं माझ्या बहुतांश नातलगांना वाटत होतं. माझ्या वडिलांचे विचार मात्र वेगळे होते. नुकतिच पहिली पंचवार्षिक योजना जाहीर झाली होती आणि त्यामुळे सगळीकडे विकासाची चर्चा सुरू होती. देश उभारणीची चर्चा होती. त्यामुळे येणाऱ्या काळात देशाला चांगले तंत्रज्ञ, अभियंते यांची आवश्यकता आहे, असे माझ्या वडिलांचे म्हणणे होते. स्वाभाविकच मी अभियांत्रिकीला जावं, असा त्यांचा सल्ला होता. मलाही तो पटला आणि मी स्थापत्त्य अभियांत्रिकीसाठी पुण्याला प्रवेश घेतला. त्यावेळी एक चांगलं होतं. सरकारी नोकरीतले अधिकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवायला येत. अमीन भावी हे त्यापैकीच एक. अत्यंत हुशार आणि दूरदर्शी. त्यांचे माझ्या आयुष्याला दिशा देण्यातले योगदान महत्वाचे राहीले आहे. बीईच्या शेवटच्या वर्षाला असताना मी स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज केले. केंद्रीय अभियांत्रिकी सेवेसाठी आणि राज्य सेवेसाठीही या परीक्षा होत होत्या. मी दोन्ही परीक्षा दिल्या आणि उत्तम गुणांनी उत्तीर्णही झालो. त्यामुळे एकाच वेळी मिलीटरी इंिजनिअरींग सर्व्हीसेस, सेंट्रल पीडब्ल्यूडी आणि रेल्वे इंिजनिअरींग सर्व्हीससाठी मी पात्र ठरलो तसाच राज्य सेवेसाठीही निवडला गेलो.

असा आत्मविश्वास निर्माण केला
मी राज्यातच सेवा द्यावी, असा सल्ला अमीन भावी यांनी मला दिला आणि तो मी स्वीकारलाही. पण परीक्षेचा अर्ज भरतानाचा एक प्रसंग आठवतो. विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण करणे म्हणजे काय, याचे हे उदाहरण आहे. राज्यात क्लास वन आणि क्लास टू पदांसाठी एकच परीक्षा होती. ‘बाॅम्बे सर्व्हीस आॅफ इंिजनियर्स क्लास वन अॅण्ड क्लास टू काॅम्पिटीटीव एक्झामिनेशन’असे तिचे नाव होते. मला अमीन भावींनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की या अर्जावर स्पष्टपणे लिही, ‘काॅम्पीटींग ओन्ली फाॅर क्लास वन पोस्ट’. मी तसं िलहीलं. लेखी परीक्षेत भरपूर गूण िमळाले. मुलाखतीच्या वेळी त्या ओळीवरूनच प्रश्न विचारले गेले. मी माझ्यातला आत्मविश्वास बोलण्यातूनही दाखवला. त्यामुळे तिथेही भरपूर गूण मिळाले. पुढे अनेक वर्ष त्या गुणांची बरोबरी कोणाला करता आली नव्हती.
माझ्यासाठी केंद्रात उत्तमोत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध असताना मला अमीन भावींनी मुद्दाम राज्यातली नोकरी स्वीकारायला सांगितली. केंद्रातल्या नोकरीपेक्षा त्यावेळी राज्यातल्या नाेकरीत ६५ टक्केच पगार िमळत होता. पण एक्झिक्युशन राज्यातच होत असल्याने त्यांचा सल्ला महत्वाचा ठरला. मी राज्याच्या सेवेत दाखल झालो. आधी सेट्रल डिझायनिंग आॅर्गनायझेशनमध्ये होतो. पहिली दोन वर्ष प्रोबेशनवर असताना राज्यभर िफरत होतो. त्यावेळी अमीन यांनीच मला कोयना प्रकल्पाचे अभियंता चाफेकर यांच्याकडे पाठवले. त्यांनी मुलभूत सुविधांचे महत्व मान्य करतानाच समृद्धीचेही महत्व सांगितले. ते म्हणाले, मूलभूत सुविधा तर असल्याच पाहिजेत; पण त्या असणं वेगळं आणि समृद्धी असणं वेगळं. आपल्याकडे समृद्धी येणे ही बाब आपण पाणी कसे हाताळतो यावर अवलंबून राहाणार आहे. आणि त्यांच्या आग्रहावरून मी पाण्यासाठीच्या कामांकडे वळालो.

अभियांत्रिकीचा कस लागला
अभियंता म्हणून माझा पहिला कस लागला तो मुळा धरणाच्या उभारणीत. ब्रिटीशांनी त्यांच्या काळात घाटधर, भंडारदरा अशी काही मोठी धरणं बांधायला सुरूवात केली होती. त्याच यादीत अहमदनगर जिल्ह्यातले मुळा धरणही होते. पण ते सारखे लांबत राहिले होतं. घाटधर आणि भंडारदरा पूर्ण झाले; पण मुळाची गाडी अडली होती. कारण त्या धरणाच्या जागी नदीपात्रातला खडक ३० मीटर म्हणजे १०० फूट खाेल होता. त्यावेळी या खडकापर्यंत पाेहोचायचे तंत्र उपलब्ध नसल्याने धरण अडले होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर प्राधान्याने हे धरण हाती घेण्यात आले. युरोपमध्ये हे तंत्र उपलब्ध असल्याने एका स्वीस कंपनीला ठेका िदला गेला. फ्रान्सचे चीफ इंजिनियर कंसल्टंट होते. त्यांनी आपल्या तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी काही शासकीय अधिकाऱ्यांना तिकडे नेले. प्रक्षिक्षण िदले; पण त्यांना पाया अभेद्य करता येईना. हे काम कोण सांभाळेल, असा प्रश्न पडला तेव्हा तत्कालीन मंत्री शंकरराव चव्हाण यांनी माझे नाव सुचवले. त्यावेळी साॅईल मेकॅनिक्स हा विषय इंजिनियरिंगमध्ये शिकवला जात नव्हता आणि आपण एकदम खूप धरणं बांधायला घेतली होती. ती सगळी मातीची होती. त्यामुळे ते तंत्र शिकून ते काम उभे करणारी पिढी तयार करणे हे सरकार समोरचे पहिले आव्हान होते. ते आव्हान पेलणारा महाराष्ट्रात जो पहिला गट तयार झाला त्यात मी होतो. शंकररावांचे आमच्याकडे लक्ष होते आणि म्हणूनच त्यांनी मुळा धरणासाठी माझे नाव सुचवले.

मी जबाबदारी स्वीकारल्यावर एक बाब नव्याने लक्षात आली की या नदीची रचना वेगळी आहे. ती समजून घेण्यासाठी धरणाच्या जागेपासून तिच्या उगमापर्यंत चालत जाण्याचा निर्णय मी घेतला आणि सहकार्यांसह हरिश्चंद्र गडापर्यंत ८९ किलो मीटर्स चालत गेलो. परत आल्यावर कळालं की इथली जिओलाॅजी वेगळी आहे. युरोपातल्या पुस्तकांमध्ये ती सापडत नाही. मग पुन्हा काॅलेजला जाऊन जिओलाॅजीच्या प्राध्यापकांना भेटलो. त्यांच्यासाठीही ते नवीन होते. काॅलेजनेही मग आमच्याबरोबर काम सुरू केले. राहूरी परिसरातल्या शाळेत जाऊन गणित आणि विज्ञान विषयाची जाण असलेल्या ११ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून १२-१५ मुले निवडली. त्यांना मराठीतून आवश्यक तेवढे प्रशिक्षण िदले आणि मातीचे नमुने गोळा करायला पाठवले. भाषेचा प्रभाव मला तेव्हा पहिल्यांदा समजला. मराठीतून प्रशिक्षण िदल्यामुळे त्या मुलांना नीट समजले होते. त्यामुळेच या मुलांनी सिमेंट, बेंटाेनाईट, वाळू आणि लोकल क्ले यांचे असे िमश्रण शोधून काढले की पाण्याचा दाब ते सहन करू शकत होते आणि तडा गेला तरी सेल्फ सिलींग प्राॅपर्टीमुळे पुन्हा जुळत होते. पहिल्यांदाच भारतातील उपलब्ध मातीमधून असे मिश्रण शोधले गेले होते.
हा पाया मनुष्यशक्ती वापरूनच भरायचा, असे आम्ही ठरवले. महाराष्ट्र शासनानेही नंतर आदेश काढून या कामाचे चित्रिकरण करायचे ठरवले. केवळ मनुष्यशक्ती वापरूनही एकही अपघात न होता केवळ दीड मीटर रुंदीच्या चरामधले हे धोक्याचे अवघड काम पार पडले. या कामावर परिसरातलेच मजूर कामाला होते. आपण काही तरी वेगळे काम करीत आहोत याची त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळेच ज्या िदवशी धरणाचा पाया सपाटीपर्यंत आला त्या दिवशी संध्याकाळी त्या महिला आणि पुरुषांनी असे काही धूंद नृत्य केले की अशी धुंदी आणि नृत्य मी पुन्हा कधी पाहिले नाही. आजही मला ते आठवते आहे. समाजातली सुप्त शक्ती काय असते हे मला त्यावेळी समजले. मराठी भाषेतून विज्ञान शिकवत नसल्यामुळे आपल्याला क्षमतांचा विस्तार करता येत नाही, हे त्या निमित्ताने अधोरेखीत झाले आहे. नंतर पुढे हे धरण पूर्ण झाले.

जागतिक बंॅकेशी घेतलेला वाईटपणा
जागतिक बंॅकेशी थेट वाईटपणा घेण्याचे प्रसंगही माझ्यावर पुढे अनेकदा आले. एवढेच काय एका दिवसासाठी जागतिक बंॅकेचा संचालकही मला होता आले. मुंबईला थेट पाणीपुरवठा करण्यासाठी भातसा नदीवर धरण प्रकल्प सरकारने हाती घेतला होता. त्याला पैसा जागतिक बंॅक पुरवणार होती. धरणातले पाणी जलवाहिनीतून मुंबईला नेण्यात येणार असल्याने एका जर्मन कंपनीने पाईप बनवण्याची फॅक्टरीही सुरू करण्याची तयारी दर्शवली होती. बंॅकेच्या सल्लागारांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एक कार्यालयही देण्यात आले होते. जागतिक बंॅकेचा संबंध असल्याने मला त्या प्रकल्पावर नेमण्यात आले. स्वाभाविकच माझी नियुक्तीही मंत्रालयात करण्यात आली. धरणाचे काम चांगले व्हावे असे वाटत असेल तर माझी नियुक्ती शहापूरला करा, अशी विनंती मी केली. शहापूर हे त्यावेळी ५ हजार लोकवस्तीचे गाव होते. जंगलाचा परिसर होता तो. त्यामुळे माझ्या विनंतीचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. तिथे गेल्यावर मी पहिल्यांदा तिथल्या टेकडीवर असलेल्या रेस्ट हाऊसमध्ये गेलो आणि तिथूनच मी रुजू झाल्याचे पत्र पोस्ट केले. हळूहळू त्या भागाची पाहाणी केली. नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या आणि जसा हा प्रकल्प होऊ घातला आहे तसा तो होता कामा नये, हे माझ्या मनाने घेतलं. हे धरण होईल; पण त्याचे पाणी थेट जलवाहिनीने नाही तर नदीपात्रातूनच मुंबईला जाईल अाणि त्या प्रवासात नदीकाढच्या गावांनाही त्या पाण्याचा लाभ होईल, नदीकाठी सिंचन होईल आणि धरणाच्या पायथ्याशी वीज िनर्मिती होईल अशी भूमिका घेणारा बहुद्देशीय प्रकल्पाचा प्रस्ताव मी सरकारकडे पाठवला. तिथेच जागतिक बॅंकेशी पहिला संघर्ष झाला.

वसंतराव नाईक त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांचा मोठेपणाही अनुभवायला आला. सरकारने ज्या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे, त्या आधारावर जागतिक बॅंकेशी पुढील सहकार्याचा करार केला आहे, त्या कराराप्रमाणे त्यांचे तांत्रिक सल्लागार आले आहेत, त्या प्रकल्पाच्या आधारे एका देशाने पाईप फॅक्टरीसाठी गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे, अशावेळी एक अधिकारी येतो आणि म्हणतो की दिलेली प्रशासकीय मंजुरी रद्द करा आणि मी दुसरा प्रकल्प अहवाल देतोय त्याला मान्यता द्या. प्रकल्प जागतिक बॅंकेपेक्षा आपल्याला अनुकूल असला पािहजे हे वसंतराव नाईकांना पटलं आणि त्यांनी मंजूर केलेला प्रकल्प अहवाल रद्द करून नव्या प्रस्तावाला मंजुरी िदली. जागतिक बॅंकेला ते खूप झोंबलं.

या प्रकल्पाच्या निमित्ताने आणखी एक बाब मला समजली. पर्यावरणवादी काहीही म्हणोत, इतकं मोठं जंगल असूनही फेब्रुवारी महिन्यात भातसा नदी कोरडी होत होती. जंगलात जी काही झाडे होती तिच पाण्याच्या बाबतीत आपली वाटेकरी होती. नदीचं पाणी तीच पिऊन जात होती. मला वाटतं, जे केवळ जंगलामुळे पाणी टिकून राहाते असे म्हणतात, त्यांनी जंगलात प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थिती समजूनच घेतलेली नाही.

जागतिक बॅंकेशी पुन्हा तणावाचा संबंध आला तो सरदार सरोवर या नर्मदेवरील प्रकल्पामुळे. त्यावेळी युरोपात ग्रीन पार्टीचं प्राबल्य वाढत होतं. त्यामुळे जागतिक बॅंकेने या प्रकल्पात सहभागी होताना अनेक अटी घातल्या होत्या. त्यामुळे अडचणी वाढल्या होत्या. त्यावेळी केंद्रीय जलआयोगाचा मी चेअरमन होतो. केंद्र सरकारने मला अाणि तत्कालिन सचिव नरेशचंद्र यांना जागतिक बॅंकेशी बोलण्यासाठी पाठवलं. नरेशचंद्र यांनी पहिल्यांदा बॅंकेच्या संचालक मंडळासमोर भूमिका मांडली. आम्ही पर्यावरणाची कशी काळजी घेत आहोत, हे त्यांनी सांगितलं. भारतातली या बाबतीतली पूर्व तयारी तांत्रिक उच्चाधिकारी असलेल्या केंद्रीय जलआयोगाचे अध्यक्ष अधिक सांगतील, असे सांगून त्यांनी माझ्याकडे सुत्रं दिली. मी बॅंकेच्या संचालकांना म्हणालो की, हा प्रकल्प करायचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. तुम्ही बरोबर आलात तर तुमच्यासह आणि नाही आलात तर तुमच्या शिवाय. तुम्ही सोबत असाल तर १० वर्षात प्रकल्प पूर्ण होईल आणि नसाल तर कदाचित १५ वर्ष लागतील एवढेच. त्यामुळे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की, या महान प्रकल्पाच्या निर्मितीच्या श्रेयाचे वाटेकरी व्हायचे की नाही ते. माझ्या या बोलण्याचा परिणाम जागतिक बॅंकेच्या संचालकांवर झाला आणि संचालक सकारात्मक झाले.

भारताच्यावतीने एक संचालक जागतिक बॅंकेवर असतात. हा विषय बॅंकेच्या संचालक मंडळासमोर मंजुरीसाठी येईल तेव्हा यातले वादग्रस्त तपशील नीट समजावून सांगणे मला तितक्या प्रभावीपणे जमणार नाही, अशी भूमिका तत्कालीन भारतीय संचालकांनी घेतली. त्यामुळे ज्या दिवशी हा विषय असेल त्या दिवसापुरते जागतिक बॅंकेचे भारतीय प्रतिनिधी संचालक म्हणून माधव चितळे असतील, असे सरकारने जागतिक बंॅकेला कळवले. त्यामुळे एक दिवस जागतिक बॅंकेचा संचालक म्हणून चर्चेत सहभागी होण्याची संधी मला िमळाली. नंतर याच बॅंकेच्या फायनान्सिंग युनिटसमोर भारताचे म्हणणे मांडण्यासाठी मला पॅरिसला बोलावण्यात आले. मी आणि बॅंकेचे व्हाईस चेअरमन तिथे बैठकीच्या कार्यालयात जात असताना कार्यालयासमोर ग्रीन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. पर्यावरणविनाशी सरदार सरोवर प्रकल्पाला मदत देण्याच्या बॅंकेच्या निर्णयाविरोधात ते आंदोलन करीत होते. व्हाईस चेअरमन म्हणाले की, आता काय करायचं? मी सांगितलं की, बॅंकेच्या िनयमांना थोडी मुरड घालून यांच्यापैकी एकाला आपल्या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित राहायची परवानगी दिली तर अनुकूल परिणाम होईल, असे मला वाटते. त्यांनी तसे केले. त्यामुळे एक तर निदर्शने थांबली आणि दुसरे म्हणजे बैठकीतली आमची चर्चा ऐकून त्यांचे मतपरिर्तन झाले. शांतपणे त्यांनी आपला विरोध मागे घेतला.

सॅन्ड्रा पोस्टेल ही जागतिक कीर्तीची पर्यावरणवादी लेखिका आहे. पिलर्स आॅफ सॅण्ड या पुस्तकातून सर्वात आधी तिने मोठ्या सिंचन प्रकल्पांना आणि धरणांना विरोध सुरू केला होता. तीने मान्ट्रीयल येथे जागतिक जलपरिसंवादात  ‘स्वयंसेवी संस्थांचा जलव्यवस्थापनातील सहभाग’ या विषयावरचे माझे भाषण ऐकले आणि माझ्या पत्नीला म्हणाली की, तुम्हाला तुमच्या पतीचा किती अभिमान वाटत असेल?. ती असं म्हणाली, कारण ती बुद्धी प्रामाण्यवादी होती. आपल्याकडच्या पर्यावरणवाद्यांच्या बाबतीत असा अनुभव फारसा कधी आला नाही. दुर्दैवाने आपल्याकडे तो विषय शास्त्रीय न राहाता भावनिक केला गेला आहे. केवळ चळवळीचा विषय म्हणून त्याकडे पाहिले जाते आहे. असे विषय हाताळण्यासाठी जो व्यापक व्यवहारी दृष्टिकोन असला पाहिजे तो आपण अजूनही वाढवू शकलेलो नाही.

पाणी करार आणि पाकिस्तानचे अनुभव
नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी मला शेजारच्या राष्ट्रांशी पाणी सामंजस्य घडवून आणण्यासाठी प्रोत्साहित केले. तुम्ही आवश्यक ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे असे ते म्हणत. त्यामुळेच नेपाळ, भूतान, बांगलादेश, पािकस्तान या देशांशी आपण पाणी वापरासाठी सामंजस्य निर्माण करू शकलो आणि म्हणूनच त्या बाबतीत आज या विषयावर फारसे तणाव नाहीत. बांगलादेशाबरोबर पाण्याची चर्चा करण्याची पूर्वपिठीका म्हणून मला बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष इर्शाद यांच्याशी एकट्यानेच चर्चा करण्यासाठी पाठवले गेले. अशाच प्रकारच्या एका चर्चेसाठी पाकिस्तानात जाताना लाहोर विमानतळावर आम्ही . उतरलो तर ‘िचतळे गो बॅक’ असे फलक दाखवण्यात आले आणि घोषणा िदल्या गेल्या. त्याला कारण होते. भारत हा फेडरल देश नसून युनियन आॅफ स्टेट्स आहे हे स्पष्ट करून मी जम्मू काश्मीरच्या जलसंधारण विभागाच्या सचिवांना साेबत नेण्याचा आग्रह धरला होता. माझे म्हणणे पटल्यामुळे त्यांनाही माझ्यासोबत नेण्यासाठी पाकिस्तानकडून स्वीकृती देण्यात आली. पािकस्तानमधील अनेकांना तसे नको होते आणि म्हणून पाकिस्तानमध्ये आमच्या शिष्टमंडळाला विरोध चालला होता. पण नंतर ही बोलणीही सहजपणे पूर्ण झाली.

पुढे तर पािकस्तानशी खूप चांगले संबंध वाढले.  िदल्लीहून कायम स्वरुपी राहायला येण्यासाठी म्हणून मी औरंगाबादला आलो होतो. त्यानंतर दोनच महिन्यांनी अचानक फोन आला की, ग्लोबल वाॅटर पार्टनरशीप या संस्थेची बैठक आहे आणि त्यासाठी तुम्ही काेलंबोला आलं पाहिजे. आग्रह केल्यामुळे मी त्या बैठकीला गेलो. ितथे त्या संस्थेच्या दक्षिण आशियाई विभागाचा अध्यक्ष निवडायचा होता. पाकिस्तानने बैठकीत भूमिका घेतली की, माधव चितळेंना अध्यक्ष केले तर आम्ही आशियाई व्यवस्थेत सहभागी होऊ.  त्यावेळी औरंगाबादला येऊन काही कामं मी ठरवली होती आणि तशा कमिटमेंट केल्या होत्या. त्यामुळे औरंगाबादला राहाणे मला आवश्यक होते. अशा परिस्थितीत हे अध्यक्षपद घ्यायला मी असमर्थता व्यक्त केली. खूपच आग्रह झाला तेव्हा अट टाकली की, हे दक्षिण आशियाई अध्यक्षांचे कार्यालय औरंगाबादला वाल्मी (वाॅटर अॅण्ड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टीट्यूट)मध्ये  ठेवले तरच मी अध्यक्षपद घेईन. तेही मान्य केले गेले.
त्याच अध्यक्षपदावर असताना संस्थेची एक बैठक पुण्याला आयोजित केली होती. त्या बैठकीला पाकिस्तानच्या सीमी कमाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिनिधी आले होते. बैठक सुरू झाली तेव्हा सीमी कमाल नाराज दिसत होत्या. मध्यांतरात मी त्यांना त्या बाबत विचारले. त्या म्हणाल्या, हो. मी नाराज आहे. कारण आज राखी पौर्णिमा आहे आणि तुम्ही राखी न बांधताच बैठक सुरू केली आहे. पािकस्तानी अनेक बुद्धीवंत आणि नागरिक यांचा भारताकडे पाहाण्याचा सामािजक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन कसा आहे, हे कळायला ही बाब पुरेशी आहे, असे मला वाटते.

चौकट –
पाच पंतप्रधानांचा सहवास
मला केंद्रात काम करताना पाच पंतप्रधानांचा सहवास िमळाला. राजीव गांधी, नरसिंहराव, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल आणि व्ही.पी.सिंग. यात सर्वाधिक सहवास राजीव गांधी आणि नरसिंहराव यांचा होता. ते बऱ्याचदा अनौपचारीकपणे वागत. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेेवक आहे याची त्या सर्वांना पूर्ण जाणीव होती. मीही कधी माझी संघाची विचारधारा लपवली नाही. तरीही त्यांनी त्या बाबतीत कधी अडचण दाखवली नाही. काॅंग्रेसचे असूनही राजीव गांधी आणि नरसिंह राव माझ्याशी संघ या विषयावर अनेकदा बोलत. माझ्या कामावर किंवा माझ्या प्रतिमेवर मी संघाचा असण्याचा काहीही परिणाम झाल्याचे मला कधी जाणवले नाही.

(शब्दांकन- दीपक पटवे)

Sunday, August 2, 2015

दृश्यम; बरंच अदृश्य जे सहज दिसतं...




आज पुन्हा एक चित्रपट थिएटरमध्ये जाऊन कार्यालयीन सहकार्यांसह पाहाण्याचा उत्तम योग जुळून आला. ट्रेलर पाहिलं तेव्हाच चित्रपट पाहायचा निर्णय झाला होता. निर्णय होऊन प्रत्यक्ष चित्रपट पाहायला जाण्याचा प्रसंग मात्र विरळा. चित्रपट संपला तेव्हा दिग्दर्शकाने एक मस्त 'पंच' दिलेला होता प्रेक्षकांना.

मानवी मनाच्या स्मृतीपटलावर अक्षरं किंवा ध्वनीपेक्षा दृश्य अधिक खोलवर कोरलं जातं आणि तेच चटकन आठवतं ही साधी मानसशास्त्रीय संकल्पना या चित्रपटाच्या शिर्षकाच्या मुळाशी आहे. या मानसशास्त्रीय सत्याचा उपयोग या चित्रपटाचा नायक (की खलनायक हे ज्याने त्याने ठरवावं) एक खून लपवण्यासाठी कशा खुबीने करत राहातो, हे दिग्दर्शकाने उत्तमरित्या दाखवलं आहे. बाकी कथानक, दिग्दर्शन, अभिनय या विषयी मुद्दाम जास्त लिहीत नाही. कारण एक तर तो माझा प्रांत नाही आणि त्या अनुशंगाने खूप काही लिहून आलंच आहे.
बरंच अदृश्य जे सहज दिसतं.. असं जे मी शिर्षकात म्हटलं आहे त्या विषयीच आज लिहायचं आहे.

हा चित्रपट पाहिल्यावर खून कसा लपवावा याचं प्रशिक्षणच मिळतं, अशी काहींची प्रतिक्रिया येते. ज्याने काहीच वाचलेलं नाही त्याला जर कोणी तरी एक किंवा दोन ओळीत चित्रपटाची कथा सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याचा  असाच समज होण्याची शक्यता अधिक आहे. एवढंच काय, पोलिस महानिरीक्षक असलेली तब्बू देखील चित्रपट पाहून गुन्हा करण्याची शक्यता एक पोलिस अधिकारी म्हणून याच चित्रपटात व्यक्त करताना दाखवलेली आहे; पण माझी अनुभुती मात्र अगदी वेगळी होती. गुन्हेगाराने गुन्हा लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी पोलिसांची 'नजर' त्याला कशी शोधते, हे अधिक जोरकसपणे या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर बिंबवले जाते, असे मला वाटते. खदानीतल्या तलावात बुडवलेली गाडी सापडली असे सांगताना एक पोलिस अधिकारी अजय देवगणच्या हालचाली टिपतो हे दृश्य तर त्याची केवळ वरवरची झलक आहे. साळगावकर कुटुंबियांच्या जबाबातला ठामपणा, अगदीच निष्पाप वयात असतानाही न चुकता दिलेली उत्तरं आणि त्यामुळे  कोणताही पुरावा सापडत नसताना, संशयाच्या विरोधात जाणारेच साक्षी आणि पुरावे असतानाही घटनेचा आयजी असलेल्या तब्बुने लावलेला बिनचूक अंदाज माझ्या वरच्या विधानाचा प्रत्यय देताे. त्यामुळे पोलिसांना कसं मुर्ख बनवता येतं हे नाही, तर ते किती हुशार असतात हेच चित्रपट पाहाताना मनावर बिंबत जातं.

टीनएजर मुलींच्या बाबतीत समवयस्क मुलांकडून किंवा वयस्क पुरूषांकडूनही होणाऱ्या गैरवर्तनाला कशा रितीने सामोरे जायचे नाही, हेही हा चित्रपट प्रभावीपणे सांगून जातो. अर्थात, या संदर्भात प्रबोधन करणारं एक वाक्यही या चित्रपटात नाही तरीही.  तिच बाब रात्री घराबाहेर राहाणाऱ्या कर्त्या माणसांनी काय करायला नको हे अधोरखीत करण्याच्या बाबतीतही म्हणता येईल. एकुलते एक असलेल्या पाल्यांचे अती लाड काय परीणाम घडवतात, यावरही अत्यंत मार्मिक भाष्य दिग्दर्शकाने सहजपणे केले आहे. भ्रष्ट पोलिस अधिकारी दाखवताना पोलिसांतला प्रामाणिक चेहराही जाणीवपूर्वक समोर ठेवला गेला आहे.

असे असले तरी कुटुंबासाठी काहीही करण्याचे, अगदी सदोष मनुष्यवधासारख्या गंभीर घटनेचे पुरावे नष्ट करण्यापासून पोलिसांची सतत दिशाभूल करण्यापर्यंतच्या गुन्ह्याचे केलेले ग्लोरिफिकेशन मात्र असमर्थनीयच म्हणायला हवे.  यातून 'फॅमिली बाऊंडींग' दाखवले गेले आहे, असे म्हणून त्याचे समर्थन करताच येणार नाही, असे मला वाटते. अर्थात, अनपेक्षितपणे किंवा अपघाताने का असेना झालेल्या मनुष्यवधाबाबत चित्रपटाचा नायक आणि त्याचे कुटुंबीय लगेचच पोलिसांना माहिती देऊन मोकळे झाले असते तर ती चित्रपटाची कथाच नव्हती. हिंदी चित्रपटातले हिरो राॅबिनहूड दाखवण्यात हिंदी प्रेक्षकांची उत्तेजना सामावलेली असेल तर बिचारा दिग्दर्शक तरी काय करेल, नाही?

Sunday, July 5, 2015

आडनावाचा शोध



आमच्या वडिलांचं आणि लहान काकांचं आडनाव पटवे आहे आणि मधल्या दोन काकांचे आडनाव नेवासकर आहे. हे असं कसं? असा प्रश्न आम्हाला नेहमीच पडायचा. त्यावेळी कोणी सांगायचं की आपलं खरं आडनाव नेवासकर हेच आहे; पण एक ओळखीचे गृहस्थ माझ्या वडिलांना शाळेत दाखल करायला घेऊन गेले अाणि त्यांनी आडनाव सांगितलंच नाही. त्यावेळी गुरूजींनी त्यांचंच आडनाव वडिलांच्या नावासमोर लिहून टाकलं. पुढे लहान काका त्याच शाळेत दाखल झाले. मोठ्या भावाचं आडनाव तेच लहान भावाचं असं म्हणत गुरूजींनी त्यांचं आडनावही पटवे लिहून टाकलं. त्यामुळे दोन भाऊ पटवे झाले आणि मधले नेवासकर राहीले.

लहानपणी ही कारणमिमांसा पटणे न पटण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही त्यावर विश्वास ठेवला. पण पुढे आडनावाची ती तर्कसंगती पटेनाशी झाली. कधी तरी त्या विषयाच्या खोलात जाऊ, असं ठरवलं आणि विषय मागे पडला. कधी कोणी तरी विचारायचं (अजूनही विचारतात ) की, पटवे हे आडनाव तर मुस्लीमांमध्ये असतं. मग तुमचं आडनाव असं कसं? आतापर्यंत आम्ही काही तरी सांगून वेळ मारून न्यायचो. आता मात्र, पटवे आडनावाचा एक पटण्यासारखा इतिहास आमच्या कानावर आलाय. तो खरा आहे का, याचा शोध सुरू केलाय.

त्याचं झालं असं की, वर्षभरापूर्वी पटवे परिवाराचा एक मेळावा भुसावळच्या सुधीर पटवे आणि शिरीष नेवासकर या चुलत-चुलत भावांनी त्यांच्याच शहरात आयोजित केला होता. ज्यांना ज्यांना शक्य झालं ते मुंबई, पुणे, धुळे, जळगाव, खंडवा, नाशिक अशा शहरांतून या मेळाव्याला हजर राहीले. त्यात एक सर्वात वयस्क असलेल्या अामच्या काकूही होत्या. सर्वात वयस्क असल्याने त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा, चार गोष्टी उपयोगाच्या सांगाव्यात, कुळधर्म, कुळाचाराबाबत नव्या पिढीतल्या सुनांच्या काही शंकांचे निरसन करावे असा आग्रह आम्ही धरला. हो-नाही म्हणत त्या तयार झाल्या आणि बोलायला लागल्या. बाेलता बोलता त्यांनी आपण मूळचे पाठक आहोत, असं सांगितलं. ही माहिती नवी हाेती. त्यामुळे त्यावर त्यांना आम्ही प्रश्न विचारायला लागलो आणि त्यांच्या बोलण्यातून पटवे आडनावाची एक वेगळीच गोष्ट समोर आली. ती अशी होती....

नेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातलं औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीजवळचं गाव. तिथे म्हाळसा-मोहनीराज मंदिर आहे. तीच आमच्या परिवाराची कुलस्वामीनी. ( त्या मंदिराबद्दल आणि त्यातल्या प्रथांबद्दल कधी तरी लिहील. कारण त्यावरही चर्चा व्हायला हवी.) तेच आमच्या परिवाराचं मूळ गाव होतं म्हणे. त्या मंदिराच्या समोरच असलेल्या दोन गल्ल्यांमध्ये समोरासमोर पाठक आणि पटवे आडनावाची कुटुंब राहात होती. पाठक हे हिंदू तर पटवे हे मुसलमान. पण अनेक पिढ्यांपासून  ते गुण्यागोविंदाने राहात असत. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असत. पण एक दिवस असा उजाडला की नेवासा गावात हिंदू-मुसलमान अशी धार्मिक दंगल सुरू झाली. दोन्ही धर्मिय एकमेकांच्या जीवावर उठले. अनेकांना भोसकून ठार करण्यात आलं तर अनेक घरं जाळली गेली. त्या दंगलीत मंदिराच्या पुजाऱ्यांपैकी असलेल्या एका पाठक कुटुुंबाला एका मुस्लीम (पटवे) कुटुंबाने आपल्या घरी नेऊन लपवून ठेवलं. तिथे ते दोन दिवस बकरीच्या दुधावर हे कुटुंब राहीलं. तिसऱ्या दिवशी पटवे परिवारातल्या एका वयस्क गृहस्थांनी एक मोटार मागवली. त्यात ते स्वत: पुढे बसले आणि पाठक परिवाराच्या सदस्यांना बुरखे घालून गाडीत बसवलं. दंगल सुरूच होती. त्यामुळे मुस्लीमांकडून गाडी अडवली गेली. त्यावेळी त्यात आपल्या परिवारातील महिला आहेत असं सांगून त्या गृहस्थांनी वेळ मारून नेली. या पाठक परिवाराला दूरच्या एका शहरात नेऊन त्यांनी सुरक्षितपणे सोडलं. निरोप घेताना पाठक परिवारातले ज्येष्ठ सदस्य त्यांना म्हणाले, '' आम्ही तुमचे उपकार कसे फेडावे, हे कळत नाही.'' त्यावर ते मुस्लीम गृहस्थ म्हणाले की, यात उपकार कसले, ही तर माणुसकी आहे. आता तुम्ही नेवासा सोडलंच आहे; पण आम्हाला विसरू नका एवढीच अपेक्षा आहे. त्यावर पाठक म्हणाले की, आम्ही तर काय, पण आमच्या अनेक पिढ्या तुमचं नाव विसरणार नाही. कारण आजपासून आम्ही आमच्या नावातच तुमचं नाव सामावून घेत आहोत. त्यानंतर ते पाठक कुटुंब आपलं आडनाव पटवे असंच लावायला लागलं.

काकूंनी हा किस्सा सांगितला आणि सगळेच आवाक झाले. हे कोणीच ऐकलं नव्हतं. तिथे उपस्थित पटवे परिवारातील एक सदस्य लगेच उभे राहीले. म्हणाले, आम्हाला माहिती आहे की आम्ही पटवे परिवारातील आहोत. म्हणूनच इथे आलोय. पण आमचं आडनाव पाठक आहे. ते कसं? असा प्रश्न आम्हालाही पडत होता. त्याचं उत्तर आता मिळालं.

पटवे आडनावाची ही कथा काहीशी पटणारी आहे. आता गरज आहे ती तिची सत्यता पडताळून पाहाण्याची. तसंच घडलं असेल तर हा काळ कोणता होता? कोणत्या वर्षी तिथे दंगल झाली होती? ते कोण गृहस्थ होते ज्यांनी इतकी माणूसकी दाखवली? असे उपकार आणि त्यांची अशी पिढयान् पिढ्या होत राहाणारी परतफेड हे सारेच इतरांनी आदर्श घ्यावा असेच नाही का?  दंगल हा माझा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे आता मी नेवासातल्या त्या दंगलीच्या शोधात काम सुरू केलं आहे. कोणाकडे काही संदर्भ असतील तर अवश्य द्या, एवढीच विनंती आहे.

पंकजाताई, आता शहाणं व्हायला हवं


प्रिय पंकजाताई मुंडे,
तुमचे पिताश्री गोपीनाथराव मुंडे यांचे धक्कादायक निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला पंचत्वात विलीन करताना तुम्ही म्हणाला होतात की मी गोपीनाथ मुंडेंचा विसर पडू देणार नाही. खरं तर अजूनही तुम्ही मधून मधून त्या वचनाची आठवण करून देतच असता समस्त महाराष्ट्रीयांना. पण सध्या तुमच्या खात्यातला जो काही कथित घोटाळा गाजतो आहे त्यामुळे महाराष्ट्र खरंच गोपीनाथरावांना विसरणार नाही, याची खात्री होत चालली आहे महाराष्ट्राची. गोपीनाथरावांच्या बाबतीत असं कधी घडलं नाही, असं म्हणत राहावं लागेल की काय सतत, असा प्रश्न पडतो आहे.

गोपीनाथराव गेल्यानंतर पंकजाताई तुम्ही ज्या धर्याने परिस्थितीला सामोरे गेलात, ज्या कौशल्याने शोकाकूल जनसागराला तुम्ही थोपवलंत आणि ज्या चतुराईने माध्यमांनाही हाताळलंत ते पाहून तुम्ही गोपीनाथरावांपेक्षा मोठ्या व्हाल असं वाटायला लागलं होतं आम्हाला. तुमच्या व्यक्तिमत्वातून ओसंडून वाहाणारा आत्मविश्वास, तुमच्या बोलण्यातून व्यक्त होणारी राजकीय प्रगल्भता यांनी आम्हाला काहीसं चकीत केलं होतं म्हणा ना. ऐन निवडणुकीपूर्वी तुम्ही काढलेली संघर्षयात्रा, तिला मिळालेला प्रतिसाद, त्या यात्रेच्या प्रारंभी आणि समारोपाला आलेले दिग्गज नेते, त्यांनी केलेली भाषणं आणि तिथेच तुम्हीही केलेलं भाषण यामुळे तर आम्हाला खात्रीच झाली होती तुमचं राजकीय नेतृत्व प्रस्थापित होण्याची.

पंकजाताई, तुम्ही मुख्यमंत्री व्हावं, असं तुमच्या आणि त्याहीपेक्षा गोपीनाथरावांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनापासून वाटत होतं. ते शक्य नाही हे राजकीय समज असलेल्यांना कळत होतं; पण राज्याच्या मंत्रिमंडळात तुमचं स्थानही मोठं असेल याची खात्री तेव्हा वाटत होती. झालंही तसंच. तुम्हाला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचं मानलं जाणारं ग्रामीणविकास हे खातं मिळालं. गोपीनाथरावांचं सर्वात आवडतं खातं हे होतं असं त्यांनीच पत्रकारांना कधी काळी सांगितलेलं. शिवाय, महिला आणि बालविकास हे खातंही तुमच्या ओढणीत पडलं. गोपीनाथरावांच्या सहवासात तुम्ही खूप काही शिकला असाल आणि त्यामुळे ही दोन्ही महत्वाची आणि सक्षम खाती तुम्ही पेलून न्याल, असंही वाटत होतं. घरातल्या स्वच्छतागृहासाठी मंगळसुत्र विकणाऱ्या महिलेला तुम्ही नवं मंगळसुत्र घेऊन दिलंत आणि तिला महाराष्ट्रात या योजनेची ब्रॅंण्ड अॅम्बॅसेडरही बनवलंत तेव्हा तुमच्या या निर्णयाचं खरंच कौतुक वाटलं होतं आम्हाला. असाच कौतुकास्पद कारभार तुम्ही करीत राहाल, अशी खात्री होत होती आमची.

काही दिवसांपूर्वी तुम्ही औरंगाबादला भाषण केलंत. निमित्त अर्थात गोपीनाथरावांच्या स्मृतिदिनाचं होतं. हा क्षण हळवं होण्याचा होता याची पूर्ण कल्पना आहे आम्हाला. त्या दिवशी तुम्ही हळव्या झाल्या असता, प्रसंगी भावनाविवश झाल्या असत्या तरी तुमचा खंबीरपणा आम्ही नाकारला नसता पंकजाताई; पण तुम्ही त्या दिवशी तुमच्याच पक्ष नेतृत्वाबाबत जे काही बोलल्याचं प्रसिद्ध झालं आहे ते धक्का देणारं होतं. नंतर तुम्ही त्याचे खुलासेही करत होतात. ते विधान तुम्ही तुमच्या पित्याचा मोठेपणा सांगण्यासाठी बोलला असाल असं गृहीत धरून आहोत आम्ही; पण त्यांचा मोठेपणा असा इतरांच्या मजबुरीचे दाखले देऊनच दिसणारा नव्हता, हे तुम्हाला आम्ही काय सांगावं! गोपीनाथराव स्वपक्षात किती अस्वस्थ होते आणि त्यांनी पक्षनेतृत्वालाच आव्हान देण्याचं धाडस दाखवत बंडाचं निशाण कसं फडकवलं होतं हे आम्हीच काय, सारा देश जाणतो. पण तसं करण्यासाठी ते गोपीनाथ मुंडे होते हे कसं विसरता येईल? तुम्ही मात्र ते विसरलात आणि सरळ त्यांच्याच भूमिकेत चालला गेलात. हे तितकं सोपं काम नाही पंकजाताई.

इतर बाबींचं राहू द्या बाजूला. सध्या गाजत असलेल्या कथित २०६ कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांबाबत बोलू आज आपण. एनडीटीव्ही पासून टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीपर्यंत सर्वांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. अर्थात त्यांनी विषय केला म्हणून तो मोठा होत नाही हे मान्य आहे आम्हाला. पण म्हणून त्याचे गांभीर्यही कमी होत नाहीना.हे सारं ठेकेदारांची लाॅबी तोडली म्हणून झालं, असं तुम्ही म्हणता आहात. तसं असेल आणि तुम्ही खरंच ठेकेदारांची लाॅबी तोडायला निघाला असाल तर तुमचं अभिनंदन! पण केवळ तसं बोलून होणार नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. या लाॅबीत कोण कोण आहेत आणि त्यांनी तुमच्यावर कसा दबाव आणला होता, हे तुम्ही तितक्याच धारिष्ट्याने जगजाहीर कराल तरच सर्वसामान्य जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल. माध्यमं भलेही तुमच्या या म्हणण्यावर सोयिस्कर विश्वास ठेवतील; पण सामान्य जनता नाही. ही जनता लगेच बोलत नाही. बहुतांशी बोलतच नाही; पण करून दाखवते. परिस्थिती आता बदलली आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. आताचे फाॅलोअर्स डोळ्याला पट्टी बांधून नेत्यांच्या मागे पळत नाहीत, याची जाणीव त्यांनी भल्याभल्यांना करून दिली आहे. तुमच्यासारख्या तरूण, उच्चशिक्षित आणि धाडसी राजकारण्यांसाठी खरं तर आधीच्या घटनांनी पुढच्यांना ठेच पोहोचवली आहे. त्यातून तुमच्या पिढीने शहाणं व्हायला हवं. कदाचित या घटनेतून तुम्ही ते शिकला असालही.

विरोधकांना, टीकाकारांना दुर्लक्ष करून मारायचं असतं असं व्यावहारिक तत्वज्ञान सांगितलं जातं. मला वाटतं ते अपूर्ण आहे. केवळ दुर्लक्ष केल्याने टीकाकार, विरोधक मरतात असं होत नाही. ते मरतात त्या टीकेला त्याच पद्धतीने उत्तर देण्याऐवजी कृतीतून स्वत:ला सिद्ध केल्याने. ते सिद्ध करणं फार महत्वाचं असतं. पुढच्या काळात तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावं लागेल. सोप्या शब्दात सांगायचं तर भुताच्या हाती कोलीत मिळणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल आणि कृतीशिलता आणि पारदर्शकता यातून स्वत:ची प्रतिमाही तयार करावी लागेल. हे सोपं नाही. अनेक वर्षांपासून मंत्रालयात ठाण मांडून बसलेल्या आणि सर्व खाच खळगे आणि पळवाटा माहिती असलेल्यांच्या हाती प्रशासन आहे. त्यातले प्रामाणिक माणसं शोधून काढावे लागतील. त्यांच्यावर जबाबदारी सोपवावी लागेल. त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि तरीही स्वत:ला दक्ष राहावे लागेल. लोकानुनयाचे नाही; पण लोककल्याणाचे निर्णय घ्यावे लागतील.

पंकजाताई, तुम्ही धाडसी, हुशार, प्रामाणिक आणि तरीही चाणाक्ष आहात असं तुमच्याशी बोलताना जाणवतं. ते सारं कृतीतूनही उतरेल अशी अपेक्षा बाळगतो.

कळावे.

एक सामान्य नागरिक.