Thursday, February 25, 2016

संस्कारी उद्योगपतीचे जाणे…

एका बाजूला धर्म आणि परंपरांशी पक्की सांगड आणि दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानातून प्रगतीची ओढ असलेले भंवरलाल जैन हे एक आगळे वेगळे रसायन होते. व्यावसायिक दृष्टीकोन आणि कौशल्य यांची खाण असलेल्या या उद्योजकाच्या मुळांशी मात्र गांधी विचारांची मशागत होती. त्यामुळे व्यवसायातून उद्योजक आणि उद्योजकाचे उद्योगपती झाले तरी त्यांचे व्यवहार कधी भ्रष्ट झाल्याचे समोर आले नाही. दूरदृष्टी ही आणखी एक देणगी त्यांना निसर्गत:च मिळाली होती. त्या दृष्टीने त्यांनी उजाड माळरानावर नवी सृष्टी घडवली. त्याच दूर दृष्टीने त्यांनी आपल्या कंपनीचा विस्तार देशोदेशी तर केलाच पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे भारतातल्या शेतीला पाणी बचतीची अत्यंत मोलाची देणगी त्यांनी दिली. आता पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला संजीवनी देण्यासाठी काही ठोस काम करण्याची त्यांची इच्छा होती आणि त्या दृष्टीने त्यांचे कामही सुरू होते. आपल्या आजुबाजूचा, राज्यातला , देशातला कोरडवाहू शेतकरी आत्महत्या करताना ते ऐकत तेव्हा व्यथित होत. त्यांच्यासाठी काही तरी शाश्वत उपाय देऊन जायचा निर्धार त्यांनी केला होता; पण त्यात काही ठोस घडण्यापूर्वीच ते मृत्यूशी असलेली लढाई हरले आहेत.
खरं तर हार मानणे  या माणसाच्या स्वभावात नव्हते. त्यामुळेच अनेक वेळा हृदयाने दगा देऊनही त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला होता. प्रचंड इच्छाशक्ती हेही त्याचे कारण असावे. एखादी गोष्ट करायची ठरवली आणि ती या माणसाकडून झाली नाही, असे उदाहरणच नसेल.  संकटांनी आणि टीकेनेही ते कधी खचले नाही की निराश झाले नाहीत. टीका करणाऱ्यांनी त्यांचे काम करावे, मी माझे काम करीत राहीन, असे ते म्हणत. वेळ आलीच तर आपली भूमिका समजावून सांगण्याचा संयत प्रयत्न त्यांनी काही वेळा नक्की केला; पण त्यात कुठे राग नव्हता की द्वेष. असलीच तर समजावून सांगण्याची वडिलकीची भूमिका असायची. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तरी त्याचीही प्रसिद्धी करायची गरज नाही असे ते त्यांच्याच मुलांना सांगत. या संयमाला मोठी मानसिक ताकद असावी लागते आणि ती भंवरलाल जैन यांच्यात ठासून भरलेली होती. याच मानसिक ताकदीने त्यांनी अनेक संकटांनाही धैर्याने परतावून लावले होते. ९० च्या दशकातला एक काळ असा आला होता की कोट्यवधीचे कर्ज त्यांच्यावर झाले होते. कंपनी बंद पडेल की काय, असे वाटू लागले होते. पण हा माणूस डगमगला नाही. नव्या उभारीने त्यांनी कंपनीला पुन्हा वर काढले आणि एका उच्च स्थानी नेऊन ठेवले. त्या संकटाच्या काळात ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली त्यांचे ऋण त्यांनी कायम लक्षात ठेवले. कंपनीची परिस्थिती सुधारली तेव्हा त्यांना कंपनीचे भाग देऊन एक प्रकारे मालक बनवले. अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर आणि काहींच्या तर मृत्युनंतरही त्यांच्या कुटुंबाला कंपनीतर्फे सर्व सेवा आणि वेतन सुरू असल्याची अनेक उदाहरणे आहेत.  कृतज्ञता त्यांच्या रोमारोमातच होती. म्हणूनच ज्या आप्पासाहेब पवार यांनी त्यांना आधुनिक शेतीतंत्राची दिशा दाखवली त्या अप्पासाहेब पवार यांच्या नावाने त्यांनी कृषि पुरस्कार सुरू केले. ज्या जळगाव शहरात त्यांचा व्यावसायिक विकास झाला त्या जळगावला कर्मभूमीम्हणून कधी दूर सारायचे नाही, हा त्यांचा निर्धार होता. म्हणूनच देश विदेशात उद्योग उभारूनही त्यांनी जळगावशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. वैद्यकीय  सुविधांची गरज असूनही ते मुंबईलाही राहीले नाहीत. ज्या जळगावने मला यश दिले त्या जळगावला मला विकासाचे स्त्रोत दिले पाहिजेत म्हणत त्यांनी उद्योगांचा विकास त्याच शहरात करत नेला. त्यामुळेच जळगावला एक वेगळी ओळख मिळाली हे कोणालाच नाकारता येणार नाही.
उद्योजक किंवा उद्योगपती ही त्यांची ओळख असली तरी त्यांची खरी ओळख  त्यांच्या संस्कारी असण्यात होती. जैन धर्माचे पालन करताना त्यांनी कुठे तडजोड केली नाही. तेच संस्कार त्यांनी पुढच्या पिढीवरही केले. उद्योग वाढताना कुटुंब तुटलेले अनेक घराणे समोर असताना या जैन कुटुंबाची एकसंघता मात्र आजही अभंग आहे. व्यावसायिक यशापेक्षा आणि त्याच्या समाधानापेक्षा अधिक समाधान त्यांना याच यशाचे असेल या विषयी यत्किंचितही शंका असण्याचे कारण नाही.
भंवरलाल जैन उपाख्य मोठे भाऊ यांना ज्यांनी जवळून अनुभवले ते कधीच त्यांना विसरू शकणार नाहीत. कार्य आणि कर्तृत्वाने तर त्यांना अमर केलेच आहे.

Wednesday, February 24, 2016

मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...




 खरंच, मला कळत नाहीये माझं असं काय झालंय....
म्हणजे, तसा मी बरा आहे वरवर..
पण आतून असं काय होतंय तेच समजत नाहीये.

मला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आठवतात
नंदुरबारचा शिरीषकुमारही डोळ्यापुढे दिसू लागतो
आणि भरून येते छाती देशप्रेमाच्या अदृश्य हवेने...
तीच हवा मग जेएनयूतल्या घोषणांचे दृश्य पाहून
दाब वाढवते माझ्याच धडधडणाऱ्या हृदयावरचा...
वाटतं.. कळ येतेय आता हृदयात....
हा दाब कमी करण्यासाठी बोललं पाहिजे काही तरी
किंवा लिहीलं तरी पाहिजे छाती मोकळी करणारं...

पण...
छे! शब्द कुठे दडून बसतात अचानक आणि
मी ना बालू शकत काही ना लिहू शकत...
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...

जेव्हा  आसेतू हिमाचल भारत वर्षासाठी
प्राण देणारे क्रांतीकारी डोळ्यासमोर येऊन उभे राहातात
आणि वाढवतात हृदयावरचा दाब,
तेव्हा काही वेळातच ज्ञानेश्वरही समोर येऊन ठाकतात..
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...

 काश्मीरच्या स्वातंत्र्यांच्या घोषणा देणाऱ्यांवर
टीकेची झोड उठवतात काही टीव्हीच्या पडद्यावर
तेव्हाही तीच हवा दाब वाढवायला लागते...
छाती फुटेल की काय असं वाटत असतानाच
पुन्हा ज्ञानेश्वरांची मूर्ती समोर दिसू लागते
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय..

याच साठी चढलो का आम्ही फासावर?
विचारू लागतात तेच क्रांतीकारी आणि
दिसू लागतात छातीवर गोळ्या झेलणारे सीमेवरचे तरूण सैनिक
तेव्हाही असंच होतं..
तेच ज्ञानेश्वर पुन्हा येऊन उभे राहातात समोर
आणि गाऊ लागतात आपलाच अभंग
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय..

इतिहासाच्या पुस्तकातून निघून हृदयात स्थिरावलेले क्रांतीकारी
आणि मराठीच्या पुस्तकातून डोक्यात शिरलेले ज्ञानेश्वर
दोघेही एकमेकांवर कुरघोडी करू पाहाताहेत आता
आणि माझे हृदय आणि मेंदू होताहेत रक्तबंबाळ त्यांच्या भांडणात
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...

याच साठी का दिले आम्ही प्राण? हा क्रांतीकारकांचा प्रश्न
आणि त्याला उत्तर ज्ञानेश्वरांचं...
अवघाची संसार सुखाचा करीन...असं सांगणारं..
कोण जिंकतयं, कोण हारतय...नुसतेच प्रश्न
खरंच मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...