Sunday, April 14, 2019

तुझं माझं जमेना अन्

निवडणुकीच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यात फिरत असताना अपसिंगे  नावाच्या गावात जगदीश पलंगे नावाचा तरूण भेटला. ३०-३२ वर्षे वयाचा असावा. त्याला सोबत घेऊन शेतकऱ्यांना भेटण्यासाठी एका दूरवरच्या शेतात गेलो. शेतात द्राक्ष लावलेले होते. द्राक्षवेलींच्या मांडवाखाली तो घेऊन आला. त्या मळ्याचा मालकही तरूण होता. गप्पा सुरू झाल्या. विषय शेतीशी संबंधितच होते. द्राक्षवेलींसाठी कसे वर्षभर काम करावे लागते हे तो तरूण मालक मला समजावून सांगत होता. मजूरांना द्यावी लागणारी मजुरी, तरीही त्यांचे कामावर न येणे, वेळेवर कामे नाही झालीत की वर्षभराचे चक्र चुकणे आणि त्यातून होणारे शेतकऱ्याचे नुकसान इत्यादि. आमच्यापासून ८, १० फुटांवर पाच, सहा मजुरांची एक टोळी छाटणीचे काम करीत होती. त्यांच्याकडे पाहून तो शेतमालक हळूच्म्णच माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला, "साहेब, या वेलींच्या खाली सावलीत काम करायला मिळतं म्हणून हे मजूर आले आहेत. नाही तर इतकी नाटकं करतात ना, वैताग येतो नुसता. खरं सांगू का, सरकारने दोन रुपयांत गहू, तांदुळ द्यायला सुरूवात केली आणि मजुरांना काम करायची गरजच नाही उरली. आधी कसे, दिवसभर काम करून अडीचशे रुपये घेऊन जायचे. त्यातून २०० रुपये खर्च केल्याशिवाय त्या दिवसाचे त्यांचे आणि कुटुंबाचे भागायचे नाही. आपसूकच दुसऱ्या दिवशी कामावर यावे लागायचे. आता अडीचशे रुपये देऊन महिनाभराचे धान्य घरात भरून घेतात. अलिकडे तर रेशनवर स्वस्तात डाळी द्यायलाही सुरुवात केली आहे. त्यामुळे पाहायलाच नको. कामाची गरजच नाही राहिली यांना. त्यामुळे अक्षरश: पाय धरावे लागतात यांचे. तरी मजूर नाही मिळत. कसे बसे मिळाले तरी येणार साडेदहा वाजेपर्यंत. मग साडेबाराला जेवणाची सुटी, मग चहाची सुटी, त्यात लघवीला जाणार, तंबाखू खाणार. साडेपाच वाजत नाही तोपर्यंत यांची सुटी होते. शेती परवडत नाही ती यामुळेच."

शेतीचं बिघडलेलं अर्थकारण नेमकं कशामुळे बिघडलं आहे हे ऐकून घेऊन आम्ही तिथून निघालो. सोबत जगदीश पलंगे होताच. चालता चालता मी म्हटलं, एकीकडे आम्ही म्हणतो बेकारी वाढली, लोकांच्या हाताला काम नाही आणि इथे तर काम करायला माणसं नाहीत अशी स्थिती आहे. त्यावर जगदीश हसला. म्हणाला, शेतकऱ्यांचे म्हणणे अगदीच चुकीचे आहे असे नाही. पण टाळी एका हाताने वाजत नाही साहेब. मजुरांना कामाची गरज असली की शेतकरीही मजुराकडून जास्तितजास्त काम काढून घेण्याचा प्रयत्न करीतच असतो. अजून कर काम जरावेळ. अजून सूर्य कललाही नाही पश्चिमेला, असं सांगून जास्तिचे काम करवून घेण्याची तक्रार मजूरही करतातच की. प्रत्येकाची बाजू असते हे मात्र खरं.

जगदीशचे म्हणणे खरे होते. प्रत्येकाला स्वत:ची एक बाजू असतेच. 'यातूनच वर्गलढा सुरू झाला,' मी म्हटले. त्यावर जगदीश क्षणभर थांबला. म्हणाला, यावर एक चांगलं सोल्युशन मी काढलं होतं. पण ते चाललं नाही.
"नेमकं काय सोल्युशन होतं?" मी विचारलं तसा जगदीश सांगू लागला...

पाच किलोमीटर परिसरात ऐकू जाईल, असा एक सायरन मी सुरू केला होता. मजुरांनी काम सुरू करायच्या वेळी, जेवायची सुटी करायच्या वेळी, जेवणानंतर काम सुरू करायच्या वेळी आणि काम संपवायच्या वेळी हा सायरन वाजवला जायचा. ती वेळ मजुरांनीही पाळायची आणि शेतकऱ्यांनीही, अशी कल्पना होती. त्यासाठी आमच्या संस्थेकडे शेतमजुरांनी त्यांच्या कामाच्या वैशिष्ट्यासह नोंदणी करायची होती. ज्या शेतकऱ्याला ज्या पद्धतीच्या कामासाठी मजूर लागतील त्याची मागणी त्या शेतकऱ्याने आमच्याकडे करायची. त्यावर उपलब्ध शेतमजुरांचे नंबर त्यांना दिले जायचे. त्यांनी त्या मजुराला फोन करायचा किंवा एसेमेस करायचा. तो मजूर वेळेवर शेतात हजर होईल, अशी ही कल्पना होती. पुढे हे काम तालुका पातळीवर करायचे आणि त्याचे हब सेंटर तुळजापूरला ठेवायचे, असेही मी ठरवले होते. पण  ते सक्सेस झाले नाही. ही पद्धत मजुरांनाही नको होती आणि शेतकऱ्यांनाही. त्यामुळे लवकरच ही सेवा बंद पडली.

किती छान कल्पना होती ही! पण शेतकऱ्यांना त्यासाठी एका मजुरामागे दोन रुपये एवढे अल्प शुल्कही भरायचे नव्हते. शेतमजुरांनाही असे वेळ बांधून काम करायला नको होते. त्यामुळे पहिले पाढे ..पुन्हा सुरू झाले आहेत. आजही शेतकरी मजुरांच्या नावाने आणि मजूर शेतकऱ्यांच्या नावाने ओरडतो आहे. अशाने सुधारणा कशी होणार? यामुळेच कदाचित कम्युनिस्ट पक्ष आपल्याकडे टीकाव धरु शकला नसेल, नाही का?

Sunday, April 7, 2019

मोदींनी काँग्रेस ऐवजी शरद पवारांवर का टीका केली? Why Modi Targeted Sharad Pawar in Wardha?

०१९ च्या निवडणुकीसाठीची नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातली पहिली सभा झाली ती वर्धात. त्या सभेत मोदींनी काँग्रेस आणि राहूल गांधी यांच्या विषयी चकार शब्दही काढला नाही. ते बाेलले शरद पवारांविषयी. याचा अर्थ त्यांना काँंग्रेसला दुर्लक्षून मारायचे होते, काँग्रेस लढतीतच नाही असा संदेश द्यायचा होता असे विश्लेषण करण्यात येते आहे.
वस्तुस्थिती काय आहे, हे जरा तपासून पाहू. 


यंदाच्या निवडणुकीत मोदींना बहुमत नाही मिळाले तर कोणाला मिळण्याची शक्यता आहे? कदाचित कोणालाच नाही. पण अशा अवस्थेत भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष कोणता असू शकतो? डीएमके? माकप? भाकप? मायावतींचा बसप? सपा? तृणमुल काँग्रेस की महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेस? अर्थात, यापैकी कोणीही नाही. कारण यापैकी कोणत्याही पक्षाकडून देशातल्या सर्व राज्यात निवडणूक लढवली जाण्याची शक्यात नाही. सर्व राज्यात निवडणूक् लढवू शकणारा भाजप नंतरचा एकमेव पक्ष आहे काँग्रेस. असे असताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसकडे दुर्लक्ष करून त्या पक्षाला मारायचे ठरवले तरी तो मरणार आहे का? आणि समजा ती शक्यता असती तर मोदींनी महाराष्ट्र वगळता अन्यत्रही काँग्रेस संदर्भात तेच धोरण ठेवले असते. पण तसे ते करीत नाहीत. महाराष्ट्राच्या बाहेर होणाऱ्या सभांमध्ये त्यांनी काँग्रेस अाणि राहूल गांधी यांच्यावर सडकून टीका केलेली आहेच. मग ते महाराष्ट्रातच काँग्रेस विषयी का नसतील बोलले?

महाराष्ट्रातील राजकीय स्थिती त्यासाठी लक्षात घ्यावी लागेल. मागच्या म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर विजय मिळाला. त्यामुळेच गुजराथ, राजस्थान या राज्यांप्रमाणे आपले संपूर्ण राज्य भाजपमय होण्याऐवजी सहा जागा विरोधी पक्षांकडे गेल्या आणि भाजप ४२ जागांपुरता मर्यादित राहिला. खरे तर त्याच वेळी राज्यात संदेश गेला होता की, इथे भाजपविरोधात त्यातल्या त्यात कोण ताकदवान असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँॅग्रेस नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर तसाही काँग्रेस पक्ष इथे मरणप्रायच आहे. समजा यावेळी मोदी सरकार विरोधात अॅण्टी इन्कम्बन्सी असेल आणि मागच्या वेळच्या तुलनेत विरोधी पक्षांच्या जागा वाढणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अधिक वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जो अधिक बलवान शत्रू, त्याच्यावर लक्ष केंद्रीत करायचे, अशी ही स्टॅटीजी असू शकते. आपण देशभरातील मोदी विरोधकांना एकत्र करण्यात पुढाकार घेतला म्हणून मोदींनी आपल्यावर वैयक्तिक टीका केली, असे शरद पवार म्हणत असले तरी वास्तव महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. समजा शिवसेना-भाजप युती झाली नसती तर मोदींनी टीका कोणावर केली असती? अर्थातच, शिवसेनेवर. मग त्यांनी भाषणात अप्रत्यक्षपणेही शरद पवार यांचा उल्लेख केला नसता हे नक्की. जसे तामीळनाडूत गेल्यानंतर ते डाव्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष देण्याऐवजी आक्रमण करतात ते ममता बॅनर्जींवर.

राजकीय फंडा :  शत्रुशी लढताना त्याला मदत करणाऱ्या राजांना, देशांना एकेकटे गाठून नामोहरम केले तर मुख्य शत्रुची ताकद आपोआपच कमी होते आणि त्याच्यावर युद्धात मात करणे सोपे जाते. 

Sunday, March 3, 2019

सिस्टर्स Nurses/Sisters


(नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून माझी आई औरंगाबादमधल्या युनायटेड सिग्मा रुग्णालयात दाखल होती. साधारण महिनाभर तिच्या सोबतीने रुग्णालयात काढला. त्या महिनाभरातल्या एका सकाळी तुकड्या तुकड्याने केलेल्या या नोंदी.)

सकाळी ६ वाजताच रुग्णालय जागं व्हायला लागतं. जानेवारी महिना असल्याने रुग्णालयाबाहेर अजून अंधारच असतो. त्यामुळे घड्याळ पाहिलं नाही तर सकाळ झाली हे कळायला सिस्टरच्या राऊंडशिवाय दुसरा पर्याय नसतो. तिच्या त्या हसतमुख फेरीनेच खरं तर रुग्णालय जागं होतं. पूर्वी असं जागं करायला वासुदेव यायचा. त्याच्या हातातल्या चिपळ्या आणि गाण्याचा खणखणीत आवाज ही आमच्या लहानपणी प्रसन्न करणारी लहर असायची. मधली खूप वर्षे या प्रसन्न लहरीला मुकायला झालं होतं. पण अलिकडे असाच भल्या सकाळी (त्या वेळेला पहाट म्हणता येणार नाही ) एक रामदासी येतो. अर्थात, आठवड्यातून एखाद्या दिवशीच. खणखणीत आवाजात त्याच्या तोंडून मनाचे श्लोक ऐकताना तोच जुना आनंद आणि प्रसन्नपणा अनुभवता येतो. रुग्णालयातली सिस्टर मला त्या वासुदेवासारखी वाटते. अंथरुणातून उठवताना मन प्रसन्न करणारा वासुदेव.

रुग्णालय ही खरं तर प्रसन्न वाटावी अशी जागा नाही. ज्या रुग्णासोबत आपण थांबलेले असू त्याला रात्री व्यवस्थित झाेप लागली तर आपल्याला लागणार. आपला रुग्ण व्यवस्थित झोपला तरी शेजारचा झोपेलच याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत सकाळी सहा वाजता येणारी (खरं तर आणली जाणारी ) जाग त्राग्याची, अनैच्छीकच असण्याची शक्यता जास्त. पण हसतमुखाने वावरणाऱ्या या सिस्टर्स तो त्रागा कुठल्या कुठे गायब करतात.

२०-२२ वर्षे वयाच्या, पाच फूट किंवा त्यापेक्षाही कमी उंचीच्या (मोजका अपवाद) या अत्यंत सर्वसामान्य दिसणाऱ्या मुली. त्यातल्या बहुतांश तर सावळ्याच. केरळी असण्याची ती एक दृश्य खूण. आपापसात बोलतात त्या वेळी त्यांच्या उच्चारांनी, बोलण्याच्या लकबीने आपल्याला गंमत वाटते. त्यातल्या काही अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आलेल्या तर काहींना दोन-चार महिनेच झालेले. या कालावधीनुसार त्यांच्या हिन्दी बोलण्यातला प्रवाहीपणा, उच्चार अधिक सफाईदार होत गेलेला. एकमेकींशी आपल्या मातृभाषेतच बोलणाऱ्या या केरळच्या मुली रुग्णांशी, त्यांच्या सोबत्यांशी आपल्या खास शैलीत हिन्दी बोलण्याचा प्रयत्न करतात. 'मावशी', 'मामा' हे रुग्णालयातले परवलीचे शब्द मराठी असूनही त्यांच्या तोंडून मराठी माणसाइतकेच स्पष्टपणे बाहेर पडतात. एरवी कोणी रुग्ण किंवा नातेवाईक त्यांच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी मात्र त्यांचा अवघडलेपणा पाहाण्यासारखा असतो. त्यांच्या त्या अवघडलेपणाला, गोंधळाला गमतीचा विषय बनवून त्यांची टिंगल करणारेही रुग्ण आणि त्यांचे सोबती इथे भेटतात. त्यावेळी दुसरी केरळी सिस्टर तिच्या मदतीला धावून येते आणि दोघी मग मल्याळम भाषेत काही तरी बोलत एकमेकींकडे पाहात हसतात. आता या दोघी या मराठी माणसांची आपल्या भाषेत खिल्ली उडवताहेत, हे आपल्याला कळतं.


आपल्या घरापासून, गावापासून कोसो दूर आलेल्या या मुली. अनेक महिने त्या तिकडे फिरकलेल्याही नसतात. अलिकडे त्यांच्याकडे रुग्ण किंवा रुग्णांचे सोबती हमखास विचारणा करताना दिसतात ती केरळला येऊन गेलेल्या पुराची.
"हां. बहुत बडा बाड आया। बट हमारा घर सेफ", एक सिस्टर अशाच एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली.
"व्हेन देअर वाॅज हेवी रेन, यू वाॅज हिअर ओर देअर?"
" नही। मै इधर था।" ती म्हणाली आणि निघून गेली.
मधून मधून होणारी अशी प्रश्नोत्तरे काही दिवसांसाठी रुग्णालयात थांबलेल्या माझ्यासारख्याला सवयीची होत गेलेली. या मुलींंना तर महिनोन् महिने प्रत्येक खोलीत या प्रश्नांना सामोरे जावे लागत असेल. त्या प्रत्येक वेळी त्यांना घराची, घरच्यांची आठवण येत असेल का? की याचीही त्यांनी सवय करून घेतली असेल?

आमच्याच खोलीतल्या रुग्णाच्या नातलगाने एकदा दुपारी सिस्टरसाठी असलेली काॅलबेल दाबली. काही सेकंदात सिस्टर हजर झाली.
"सोयी थी क्या?" नातेवाईक महिलेने विचारले.
"मै? सोयी? कैसा पाॅसिबल?"
"नही। तुम्हारी आंखे ऐसी दिख रही है।"
"हाँ। आँखे?" एवढंच ती सिस्टर म्हणाली.
रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा दरारा पाहाता भर दुपारी या मुलींना झोपण्याची प्राज्ञा असण्याची कणभरही शक्यता नाही. मग डोळे काय सांगत होते? वाॅशरूममध्ये जाऊन रडता तर येते ना, एवढेच ते सांगत असावेत.

एकदा रात्री आमच्या शेजारच्या रुग्णाच्या नातलगाने काॅलबेल दाबल्यावर नेहमीची सिस्टर येण्याऐवजी वेगळीच महिला संपलेल्या सलाईनची नळी काढायला आली. अर्ध्यातासाने आमच्या रुग्णाची सलाईन संपली तेव्हा ती सिस्टर आली. शेजारच्या नातलग महिलेने विचारले, "आहे का तू? मला वाटलं घरी गेली."
"घरी सकाळी जाणार. मी नाईटला आहे"
"मघाशी दुसरीच बाई आलथी सलाईन काढाले. म्हनून म्हनलं, तू गेली की काय.."
"ते मला एना उलटी होत होती. तब्बेत बरी नाही ना माझी," मराठी असलेली ती सिस्टर म्हणाली.
"तब्बेत बरी नाही? मग जा की घरी. आराम कर जरा," त्या बाई काळजीने म्हणाल्या तशी ती २०-२२ वर्षांची मुलगी नुसतीच हासली. कशावर? त्या बाईंच्या बोलण्यावर? स्वत:वर? की परिस्थितीवर?

हासत राहाणं हा या मुलींच्या नोकरीचा भाग असावा का? नक्कीच असणार. रुग्णाचं अर्ध औषध तर त्यांचं हासतमुख असणंच असतं. काही दिवस रुग्णाचा सोबती म्हणून रुग्णालयात राहाणाऱ्या मी एकाही सिस्टरला रुग्णाजवळ येताना रागीट, त्रस्त किंवा चिंतीत चेहऱ्याची पाहिले नाही. हासतमुख हा त्यांच्या युनिफाॅर्मचाच भाग असावा जणू.

या सिस्टर मुलींपैकी केरळी मुली आणि मराठी मुली यातही थोडा फरक जाणवत राहातो. मराठी मुलींचा 'मराठी बाणा' मधून मधून अनुभवायला येत राहातो. फार नाही तरी, प्रतिउत्तर देतानाची भाषा, टोन आणि आवाज यात हा बाणा डोकावल्याशिवाय राहात नाही. मल्याळम भाषा बोलणाऱ्या मुली आणि मराठी बोलणाऱ्या मुली यांचं सख्यही फारसं अनुभवायला येत नाही. हे सख्य स्वभाषिकांशी मात्र, घट्ट असलेलं मला दिसत राहिलं.

डाॅक्टरांच्या राऊंडच्या वेळी डाॅक्टर आणि पेशंट दोघेही मराठी असतील तर त्यांच्यातला संवाद या केरळी मुलींना समजत नाही. मराठीत संवाद करताना डाॅक्टर अचानक काही सूचना मराठीतून देतात आणि या मुलींना ते कळत नाही. अशावेळी उडणारा या मुलींचा गोंधळ सावरायला डाॅक्टरांसोबत आलेले आरएमओ पुढे येतात आणि यांची सुटका करतात.

हाॅस्पिटलमधले रुग्ण, त्यांचे आजार, त्यांच्या वेदना, त्यामुळे आपल्याला होणारा त्रास हे सारे खरेच असते. तरीही आजुबाजूला वावरणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कृतीतून, हालचालींमधून ज्या काही कथा सांगत असतात त्याही शब्दांशिवाय आपल्याला ऐकू येऊ लागल्या तर रुग्णालयात मोठा काळ घालवणेही सुसह्य व्हायला लागते हे मी या निमित्ताने अनुभवले आहे. 

Saturday, January 26, 2019

प्रियंका गांधी (आणि) काँग्रेसचे भवितव्य Priyanka Gandhi (And) Future of Congress Party

प्रियंका हेच आता काँग्रेस पक्षाचे भवितव्य आहे आणि त्या काँग्रेस पक्षाला तारून नेतील, अशी भविष्यवाणी अनेक राजकीय निरीक्षक, विश्लेषक करू लागले आहेत. याचा दुसरा अर्थ राहूल गांधी यांच्यात पक्षाला तारून नेण्याची क्षमता नव्हती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष २०१९ च्या निवडणुकीत यश मिळवू शकला नसता, असा घ्यायचा का? तसे नसेल तर प्रियंकाच्या आगमनामुळे अती प्रभावित होऊन हे विश्लेषक विश्लेषण करीत आहेत, असे म्हणावे लागेल.





प्रियंका यांचे व्यक्तिमत्व आहेच मुळी प्रभावित करणारे. एक तर त्या थेट इंदिरा गांधी यांच्या सारख्या दिसतात. बोलतातही तशाच. त्याचा परिणाम त्यांना पाहाणाऱ्या, ऐकणाऱ्यावर होतो. विशेषत: ज्यांनी इंदिरा गांधी यांना पाहिले आणि ऐकले आहे त्यांच्यावर तर हा प्रभाव चटकन पडतो. मतदारांवरही हा प्रभाव पडेल आणि त्याचा फायदा काँग्रेसला होईल, अशी अटकळ या विश्लेषकांची असते. त्यामुळे अती उत्साहात प्रियंकांना ते काँग्रेसचे तारणहार ठरवताना दिसतात. प्रियंकांनी पक्षात सक्रीय व्हावे, नेतृत्व करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून पक्ष कार्यकर्त्यांकडून होत होती. स्वाभाविकच, त्यांच्या सक्रीय होण्याच्या हर्षोल्हासित प्रतिक्रीया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. त्यामुळे प्रियंका पक्षासाठी ऊर्जा ठरतील, असा या निरीक्षकांचा होरा आहे. याच उत्साहात काही मंडळी त्यांना नरेंद्र मोदींसमोरचा तुल्यबळ ‘चेहरा’ देखील ठरवित आहेत. हे सारे पूर्णपणे चुकीचे आहे का? तर तसेही नाही. पण त्यांना थेट पक्षाच्या तारणहार ठरविण्याआधी आणखी काही बाबींचा विचार करण्याची गरज मात्र आहे.

कोणत्या आहेत या बाबी? सर्वात पहिली बाब म्हणजे प्रियंकांना जरी काँग्रेसच्या महासचिव करण्यात आले असले तरी त्यांना ठरवून दिलेले कार्यक्षेत्र आहे उत्तर प्रदेशातील पूर्व प्रांत. सोप्या भाषेत सांगायचे तर अर्धा उत्तर प्रदेश. उर्वरित अर्धा उत्तर प्रदेश दिला आहे ज्योतिरादित्य शिंदे (सिंदिया) यांच्याकडे. म्हणजे खुद्द राहूल गांधी यांनीच प्रियंका यांना ज्योतिरादित्य यांच्या रांगेत बसवले आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांच्यावर अर्ध्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला यश मिळवून देण्यापुरतीच जबाबदारी आहे हे लक्षात घ्यावे लागेल. याचा आणखी एक अर्थ काढता येतो. सोनिया आणि राहूल हे प्रियंकाच्या प्रभावाची चाचणी घेण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांना प्रियंकाच्या क्षमता आणि मर्यादा जितक्या माहिती असतील तितक्या त्या अन्य कोणाला माहिती असण्याची शक्यता नाही. तारणहार ठरविणाऱ्या राजकीय विश्लेषकांना तर नाहीच नाही. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला तारण्याचे किंवा मारण्याचे जे काही श्रेय जायचे असेल ते राहूल यांच्याच खात्यात टाकावे लागणार आहे. प्रियंकांना त्यासाठी घोड्यावर बसलेले पाहाणे हा राजकीय विश्लेषकांना होणारा भास आहे.

सोनिया आणि राहूल यांनी प्रियंका यांना सध्या अर्ध्या उत्तर प्रदेशापुरतेच मर्यादित ठेवले असले तरी प्रियंकांसमोरचे आव्हान काही लहान नाही. त्यामुळे आई आणि भावाने त्यांना अगदीच ‘अंडर इस्टिमेट’ केले आहे, असेही समजण्याचे कारण नाही. साधारण महाराष्ट्रासारख्या राज्याइतके हे कार्यक्षेत्र आहे. एकूण उत्तर प्रदेशाचा आवाका आहेच असा अवाढव्य. या राज्यात लोकसभेच्या ७१ (महाराष्ट्रात ४८) तर विधानसभेच्या ४०३ (महाराष्ट्रात २८८) जागा आहेत. यापैकी काँग्रेसकडे सध्या लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या अवघ्या ७ जागा आहेत. यावरून या महाकाय राज्यात काँग्रेस समोरचे आव्हान किती मोठे आहे याची कल्पना यावी. प्रियंकांच्या बाबतीत विचार करायचा तर हे आव्हान आणखी मोठे होत जाते. कारण उत्तर प्रदेशाचा विचार केला तर पश्चिम उत्तर प्रदेशच्या तुलनेत पूर्व प्रांतात काँग्रेसला माेठे आव्हान असते. कारण हा प्रांत आहे यादवांच्या प्रभावाखालचा. त्यामुळे इथे सर्वात प्रभावी असतो समाजवादी पक्ष. प्रियंकांकडे हाच प्रांत सोपवण्यात आला आहे. पश्चिमी प्रांतात जाट बहूल लोकसंख्या आहे. त्यामुळे इथे काँग्रेस आणि भाजपला तुलनेने सोपे वातावरण असते. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचे लक्ष देखील याच प्रांताकडे अधिक असते. म्हणजे या दृष्टीने विचार केला तर काँग्रेस, भाजपा आणि बसपा यांचे मतदार साधारण एकाच प्रांतातले आहेत. मायावतींनी काँग्रेसला नाकारण्याचे तेही एक कारण आहे. पण हा मुद्दा नंतर सविस्तर पाहू. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर पूर्व उत्तर प्रदेश प्रांताची जबाबदारी स्वीकारलेल्या प्रियंकांसमोरचे आव्हान बऱ्यापैकी मोठे आहे, याची कल्पना येऊ शकते. हे आव्हान त्या कसे पेलतात, यावर त्यांच्या नेतृत्वाचे विश्लेषण अवलंबून असायला हवे. उगाच २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे ओझे त्यांच्या डोक्यावर थोपवणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल.

नरेंद्र मोदींना म्हणजेच भाजपला रोखण्यासाठी राहूल गांधी यांनी खेळलेली ही खेळी आहे, हा काँग्रेसचा सर्वात मोठा आणि शेवटचा पत्ता आहे, असेही म्हटले जाते आहे. पण तसे ते नाही हे काँग्रेसची उत्तर प्रदेशातील स्थिती, तिथे झालेले सपा-बसपाचे गठबंधन आणि प्रियंकांकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी या बाबी पाहाता लक्षात येते. काँग्रेसला उत्तर प्रदेशात दोन पेक्षा जितक्या जास्त जागा मिळतील तितका काँग्रेसचा फायदाच आहे, हे उघड आहे. पण परिस्थिती उलटही होऊ शकते. म्हणजे  कशी? आज सपा आणि बसपाची युती झाली आहे. त्यांनी या युतीतून काँग्रेसला बाहेर ठेवले आहे. हे संकेत आधीपासूनच मिळत होते. विशेषत: मायावती काँग्रेस विषयी जाहीरपणे जे काही बोलत होत्या त्यावरून त्या काँग्रेसला सोबत घेणार नाहीत, ही शक्यता वाटत होतीच. तसे झाले आणि काँग्रेस सर्व जागा लढवायला, विशेषत: राज्यभर पसरायला मोकळी झाली. याचा परिणाम असा होणार आहे की, जिथे सपाचे उमेदवार असतील तिथेही काँग्रेसचा उमेदवार असेल आणि जिथे बसपाचे उमेदवार असतील तिथेही काँग्रेसचा उमेदवार असेल. त्या प्रत्येक मतदारसंघात भाजपचाही उमेदवार असेल. म्हणजे लढत तिरंगी होण्याची शक्यताच जास्त आहे. या लढतीत प्रियंका गांधी प्रभावी ठरल्या तर त्या सपा-बसपा युतीच्या उमेदवारांची मते काँग्रेसकडे वळवतील. म्हणजे प्रियंका सक्रीय होण्यापूर्वी काँग्रेसची जी मापं मायावती आणि अखिलेश यादव यांनी काढली असतील, ती मापं प्रियंकांच्या येण्यामुळे बदलतील. परिणामी ‘धर्मनिरपेक्ष’ म्हटल्या जाणाऱ्या मतांमध्ये विभागणी होण्याचीच शक्यता आता वाढली आहे. तसे झाले तर ज्या मोदींना रोखण्यासाठी प्रियंकाअस्त्र  असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते आहे, त्या मोदींनाच या अस्त्राचा फायदा होऊ शकतो. सपा-बसपाने काँग्रेसला सोबत घेतले असते तर कदाचित हे घडलेही नसते. म्हणजे कदाचित प्रियंका मैदानात अशा उतरल्याही नसत्या आणि मतविभाजन होऊन मोदींना फायदा झालाही नसता. या लढाईत प्रियंका कोणाच्या विरोधातच उतरल्या असतील तर त्या मायावतींच्या विरोधात उतरल्या असण्याची शक्यता अधिक आहे. त्याला कारणही आहे. काँग्रेसला २०१९ च्या निवडणुकीनंतर सर्वाधिक धोका दिसतो आहे तो मायावतींकडूनच. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मायावतींनी ऐनवेळी काँग्रेसबरोबर युती करायला नकार देऊन काँग्रेसची अडचण केली होती. आताही काँग्रेसप्रणीत महायुतीत येण्याचे त्यांनी टाळले आहे. अखिलेश यादवही मायावतींबरोबर वाहात गेले आहेत. पंतप्रधान होण्याच्या स्वप्नाने मायावतींना पछाडले आहे. त्यामुळे काँग्रेसला वगळून ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अजित सिंग आणि इतर काही पक्षांना एकत्र करून तिसरी आघाडी बनवायची आणि पंतप्रधान व्हायचे, असे मायावती यांचे प्रयत्न सुरू आहेत. हा उघड उघड काँग्रेसच्या स्वप्नांना सुरुंग आहे. तो सुरुंग उडण्याआधीच निष्क्रीय करायचा असेल तर मायावतींना रोखण्यासाठी प्रियंकाचे अस्त्र चालवावे लागेल, असे गणित राहूल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केलेले दिसते. त्यामुळे प्रियंका आल्यामुळे भाजप नव्हे, बसपा हादरली असण्याचीच शक्यता अधिक आहे. राहिला नेरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपचा प्रश्न, तर तो आधीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निकाली काढला आहे. या योगींना कार्यरत आणि बोलत ठेवले तरी मोदी विरोधात उत्तर प्रदेशात तरी फार काही करीत बसण्याची गरज काँग्रेसला भासणार नाही.

आता थोडं प्रियंकांच्या प्रभावाविषयी. त्या बहुतांशी इंदिरा गांधींसारख्या दिसतात आणि म्हणून मतदारांना त्या आकर्षित करतील या गृहितकाला काही अर्थ नाही. कारण इंदिरा गांधींनी ज्यांच्यावर प्रभाव पाडला होता, त्या पिढीपेक्षा नवी पिढी मतदार म्हणून अधिक आहे. शिवाय, केवळ सारखे दिसण्याने आजचा मतदार भुलतो, असेही नाही. तसे असते तर आज बाळासाहेबांसारखेच दिसणाऱ्या, बोलणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षाचा विधान सभेत केवळ एकच आमदार नसता. या पिढीला प्रियंका आकर्षित करू शकतील त्या केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे. एक तर त्या तरूण आहेत. भाषण शैलीवर इंदिरा गांधींचा प्रभाव असला तरी त्याला एक वेगळा लहेजा आहे. त्याचाही परिणाम मतदारांवर होऊ शकतो. पण आधी म्हटल्याप्रमाणे प्रियंका जितक्या प्रभावी ठरतील, तितक्या त्या सपा-बसपा आघाडीला त्रासदायक तर मोदींच्या भाजपला फायदेशीर ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.