Sunday, July 5, 2015

आडनावाचा शोध



आमच्या वडिलांचं आणि लहान काकांचं आडनाव पटवे आहे आणि मधल्या दोन काकांचे आडनाव नेवासकर आहे. हे असं कसं? असा प्रश्न आम्हाला नेहमीच पडायचा. त्यावेळी कोणी सांगायचं की आपलं खरं आडनाव नेवासकर हेच आहे; पण एक ओळखीचे गृहस्थ माझ्या वडिलांना शाळेत दाखल करायला घेऊन गेले अाणि त्यांनी आडनाव सांगितलंच नाही. त्यावेळी गुरूजींनी त्यांचंच आडनाव वडिलांच्या नावासमोर लिहून टाकलं. पुढे लहान काका त्याच शाळेत दाखल झाले. मोठ्या भावाचं आडनाव तेच लहान भावाचं असं म्हणत गुरूजींनी त्यांचं आडनावही पटवे लिहून टाकलं. त्यामुळे दोन भाऊ पटवे झाले आणि मधले नेवासकर राहीले.

लहानपणी ही कारणमिमांसा पटणे न पटण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही त्यावर विश्वास ठेवला. पण पुढे आडनावाची ती तर्कसंगती पटेनाशी झाली. कधी तरी त्या विषयाच्या खोलात जाऊ, असं ठरवलं आणि विषय मागे पडला. कधी कोणी तरी विचारायचं (अजूनही विचारतात ) की, पटवे हे आडनाव तर मुस्लीमांमध्ये असतं. मग तुमचं आडनाव असं कसं? आतापर्यंत आम्ही काही तरी सांगून वेळ मारून न्यायचो. आता मात्र, पटवे आडनावाचा एक पटण्यासारखा इतिहास आमच्या कानावर आलाय. तो खरा आहे का, याचा शोध सुरू केलाय.

त्याचं झालं असं की, वर्षभरापूर्वी पटवे परिवाराचा एक मेळावा भुसावळच्या सुधीर पटवे आणि शिरीष नेवासकर या चुलत-चुलत भावांनी त्यांच्याच शहरात आयोजित केला होता. ज्यांना ज्यांना शक्य झालं ते मुंबई, पुणे, धुळे, जळगाव, खंडवा, नाशिक अशा शहरांतून या मेळाव्याला हजर राहीले. त्यात एक सर्वात वयस्क असलेल्या अामच्या काकूही होत्या. सर्वात वयस्क असल्याने त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा, चार गोष्टी उपयोगाच्या सांगाव्यात, कुळधर्म, कुळाचाराबाबत नव्या पिढीतल्या सुनांच्या काही शंकांचे निरसन करावे असा आग्रह आम्ही धरला. हो-नाही म्हणत त्या तयार झाल्या आणि बोलायला लागल्या. बाेलता बोलता त्यांनी आपण मूळचे पाठक आहोत, असं सांगितलं. ही माहिती नवी हाेती. त्यामुळे त्यावर त्यांना आम्ही प्रश्न विचारायला लागलो आणि त्यांच्या बोलण्यातून पटवे आडनावाची एक वेगळीच गोष्ट समोर आली. ती अशी होती....

नेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातलं औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीजवळचं गाव. तिथे म्हाळसा-मोहनीराज मंदिर आहे. तीच आमच्या परिवाराची कुलस्वामीनी. ( त्या मंदिराबद्दल आणि त्यातल्या प्रथांबद्दल कधी तरी लिहील. कारण त्यावरही चर्चा व्हायला हवी.) तेच आमच्या परिवाराचं मूळ गाव होतं म्हणे. त्या मंदिराच्या समोरच असलेल्या दोन गल्ल्यांमध्ये समोरासमोर पाठक आणि पटवे आडनावाची कुटुंब राहात होती. पाठक हे हिंदू तर पटवे हे मुसलमान. पण अनेक पिढ्यांपासून  ते गुण्यागोविंदाने राहात असत. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असत. पण एक दिवस असा उजाडला की नेवासा गावात हिंदू-मुसलमान अशी धार्मिक दंगल सुरू झाली. दोन्ही धर्मिय एकमेकांच्या जीवावर उठले. अनेकांना भोसकून ठार करण्यात आलं तर अनेक घरं जाळली गेली. त्या दंगलीत मंदिराच्या पुजाऱ्यांपैकी असलेल्या एका पाठक कुटुुंबाला एका मुस्लीम (पटवे) कुटुंबाने आपल्या घरी नेऊन लपवून ठेवलं. तिथे ते दोन दिवस बकरीच्या दुधावर हे कुटुंब राहीलं. तिसऱ्या दिवशी पटवे परिवारातल्या एका वयस्क गृहस्थांनी एक मोटार मागवली. त्यात ते स्वत: पुढे बसले आणि पाठक परिवाराच्या सदस्यांना बुरखे घालून गाडीत बसवलं. दंगल सुरूच होती. त्यामुळे मुस्लीमांकडून गाडी अडवली गेली. त्यावेळी त्यात आपल्या परिवारातील महिला आहेत असं सांगून त्या गृहस्थांनी वेळ मारून नेली. या पाठक परिवाराला दूरच्या एका शहरात नेऊन त्यांनी सुरक्षितपणे सोडलं. निरोप घेताना पाठक परिवारातले ज्येष्ठ सदस्य त्यांना म्हणाले, '' आम्ही तुमचे उपकार कसे फेडावे, हे कळत नाही.'' त्यावर ते मुस्लीम गृहस्थ म्हणाले की, यात उपकार कसले, ही तर माणुसकी आहे. आता तुम्ही नेवासा सोडलंच आहे; पण आम्हाला विसरू नका एवढीच अपेक्षा आहे. त्यावर पाठक म्हणाले की, आम्ही तर काय, पण आमच्या अनेक पिढ्या तुमचं नाव विसरणार नाही. कारण आजपासून आम्ही आमच्या नावातच तुमचं नाव सामावून घेत आहोत. त्यानंतर ते पाठक कुटुंब आपलं आडनाव पटवे असंच लावायला लागलं.

काकूंनी हा किस्सा सांगितला आणि सगळेच आवाक झाले. हे कोणीच ऐकलं नव्हतं. तिथे उपस्थित पटवे परिवारातील एक सदस्य लगेच उभे राहीले. म्हणाले, आम्हाला माहिती आहे की आम्ही पटवे परिवारातील आहोत. म्हणूनच इथे आलोय. पण आमचं आडनाव पाठक आहे. ते कसं? असा प्रश्न आम्हालाही पडत होता. त्याचं उत्तर आता मिळालं.

पटवे आडनावाची ही कथा काहीशी पटणारी आहे. आता गरज आहे ती तिची सत्यता पडताळून पाहाण्याची. तसंच घडलं असेल तर हा काळ कोणता होता? कोणत्या वर्षी तिथे दंगल झाली होती? ते कोण गृहस्थ होते ज्यांनी इतकी माणूसकी दाखवली? असे उपकार आणि त्यांची अशी पिढयान् पिढ्या होत राहाणारी परतफेड हे सारेच इतरांनी आदर्श घ्यावा असेच नाही का?  दंगल हा माझा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे आता मी नेवासातल्या त्या दंगलीच्या शोधात काम सुरू केलं आहे. कोणाकडे काही संदर्भ असतील तर अवश्य द्या, एवढीच विनंती आहे.

पंकजाताई, आता शहाणं व्हायला हवं


प्रिय पंकजाताई मुंडे,
तुमचे पिताश्री गोपीनाथराव मुंडे यांचे धक्कादायक निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला पंचत्वात विलीन करताना तुम्ही म्हणाला होतात की मी गोपीनाथ मुंडेंचा विसर पडू देणार नाही. खरं तर अजूनही तुम्ही मधून मधून त्या वचनाची आठवण करून देतच असता समस्त महाराष्ट्रीयांना. पण सध्या तुमच्या खात्यातला जो काही कथित घोटाळा गाजतो आहे त्यामुळे महाराष्ट्र खरंच गोपीनाथरावांना विसरणार नाही, याची खात्री होत चालली आहे महाराष्ट्राची. गोपीनाथरावांच्या बाबतीत असं कधी घडलं नाही, असं म्हणत राहावं लागेल की काय सतत, असा प्रश्न पडतो आहे.

गोपीनाथराव गेल्यानंतर पंकजाताई तुम्ही ज्या धर्याने परिस्थितीला सामोरे गेलात, ज्या कौशल्याने शोकाकूल जनसागराला तुम्ही थोपवलंत आणि ज्या चतुराईने माध्यमांनाही हाताळलंत ते पाहून तुम्ही गोपीनाथरावांपेक्षा मोठ्या व्हाल असं वाटायला लागलं होतं आम्हाला. तुमच्या व्यक्तिमत्वातून ओसंडून वाहाणारा आत्मविश्वास, तुमच्या बोलण्यातून व्यक्त होणारी राजकीय प्रगल्भता यांनी आम्हाला काहीसं चकीत केलं होतं म्हणा ना. ऐन निवडणुकीपूर्वी तुम्ही काढलेली संघर्षयात्रा, तिला मिळालेला प्रतिसाद, त्या यात्रेच्या प्रारंभी आणि समारोपाला आलेले दिग्गज नेते, त्यांनी केलेली भाषणं आणि तिथेच तुम्हीही केलेलं भाषण यामुळे तर आम्हाला खात्रीच झाली होती तुमचं राजकीय नेतृत्व प्रस्थापित होण्याची.

पंकजाताई, तुम्ही मुख्यमंत्री व्हावं, असं तुमच्या आणि त्याहीपेक्षा गोपीनाथरावांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनापासून वाटत होतं. ते शक्य नाही हे राजकीय समज असलेल्यांना कळत होतं; पण राज्याच्या मंत्रिमंडळात तुमचं स्थानही मोठं असेल याची खात्री तेव्हा वाटत होती. झालंही तसंच. तुम्हाला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचं मानलं जाणारं ग्रामीणविकास हे खातं मिळालं. गोपीनाथरावांचं सर्वात आवडतं खातं हे होतं असं त्यांनीच पत्रकारांना कधी काळी सांगितलेलं. शिवाय, महिला आणि बालविकास हे खातंही तुमच्या ओढणीत पडलं. गोपीनाथरावांच्या सहवासात तुम्ही खूप काही शिकला असाल आणि त्यामुळे ही दोन्ही महत्वाची आणि सक्षम खाती तुम्ही पेलून न्याल, असंही वाटत होतं. घरातल्या स्वच्छतागृहासाठी मंगळसुत्र विकणाऱ्या महिलेला तुम्ही नवं मंगळसुत्र घेऊन दिलंत आणि तिला महाराष्ट्रात या योजनेची ब्रॅंण्ड अॅम्बॅसेडरही बनवलंत तेव्हा तुमच्या या निर्णयाचं खरंच कौतुक वाटलं होतं आम्हाला. असाच कौतुकास्पद कारभार तुम्ही करीत राहाल, अशी खात्री होत होती आमची.

काही दिवसांपूर्वी तुम्ही औरंगाबादला भाषण केलंत. निमित्त अर्थात गोपीनाथरावांच्या स्मृतिदिनाचं होतं. हा क्षण हळवं होण्याचा होता याची पूर्ण कल्पना आहे आम्हाला. त्या दिवशी तुम्ही हळव्या झाल्या असता, प्रसंगी भावनाविवश झाल्या असत्या तरी तुमचा खंबीरपणा आम्ही नाकारला नसता पंकजाताई; पण तुम्ही त्या दिवशी तुमच्याच पक्ष नेतृत्वाबाबत जे काही बोलल्याचं प्रसिद्ध झालं आहे ते धक्का देणारं होतं. नंतर तुम्ही त्याचे खुलासेही करत होतात. ते विधान तुम्ही तुमच्या पित्याचा मोठेपणा सांगण्यासाठी बोलला असाल असं गृहीत धरून आहोत आम्ही; पण त्यांचा मोठेपणा असा इतरांच्या मजबुरीचे दाखले देऊनच दिसणारा नव्हता, हे तुम्हाला आम्ही काय सांगावं! गोपीनाथराव स्वपक्षात किती अस्वस्थ होते आणि त्यांनी पक्षनेतृत्वालाच आव्हान देण्याचं धाडस दाखवत बंडाचं निशाण कसं फडकवलं होतं हे आम्हीच काय, सारा देश जाणतो. पण तसं करण्यासाठी ते गोपीनाथ मुंडे होते हे कसं विसरता येईल? तुम्ही मात्र ते विसरलात आणि सरळ त्यांच्याच भूमिकेत चालला गेलात. हे तितकं सोपं काम नाही पंकजाताई.

इतर बाबींचं राहू द्या बाजूला. सध्या गाजत असलेल्या कथित २०६ कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांबाबत बोलू आज आपण. एनडीटीव्ही पासून टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीपर्यंत सर्वांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. अर्थात त्यांनी विषय केला म्हणून तो मोठा होत नाही हे मान्य आहे आम्हाला. पण म्हणून त्याचे गांभीर्यही कमी होत नाहीना.हे सारं ठेकेदारांची लाॅबी तोडली म्हणून झालं, असं तुम्ही म्हणता आहात. तसं असेल आणि तुम्ही खरंच ठेकेदारांची लाॅबी तोडायला निघाला असाल तर तुमचं अभिनंदन! पण केवळ तसं बोलून होणार नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. या लाॅबीत कोण कोण आहेत आणि त्यांनी तुमच्यावर कसा दबाव आणला होता, हे तुम्ही तितक्याच धारिष्ट्याने जगजाहीर कराल तरच सर्वसामान्य जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल. माध्यमं भलेही तुमच्या या म्हणण्यावर सोयिस्कर विश्वास ठेवतील; पण सामान्य जनता नाही. ही जनता लगेच बोलत नाही. बहुतांशी बोलतच नाही; पण करून दाखवते. परिस्थिती आता बदलली आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. आताचे फाॅलोअर्स डोळ्याला पट्टी बांधून नेत्यांच्या मागे पळत नाहीत, याची जाणीव त्यांनी भल्याभल्यांना करून दिली आहे. तुमच्यासारख्या तरूण, उच्चशिक्षित आणि धाडसी राजकारण्यांसाठी खरं तर आधीच्या घटनांनी पुढच्यांना ठेच पोहोचवली आहे. त्यातून तुमच्या पिढीने शहाणं व्हायला हवं. कदाचित या घटनेतून तुम्ही ते शिकला असालही.

विरोधकांना, टीकाकारांना दुर्लक्ष करून मारायचं असतं असं व्यावहारिक तत्वज्ञान सांगितलं जातं. मला वाटतं ते अपूर्ण आहे. केवळ दुर्लक्ष केल्याने टीकाकार, विरोधक मरतात असं होत नाही. ते मरतात त्या टीकेला त्याच पद्धतीने उत्तर देण्याऐवजी कृतीतून स्वत:ला सिद्ध केल्याने. ते सिद्ध करणं फार महत्वाचं असतं. पुढच्या काळात तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावं लागेल. सोप्या शब्दात सांगायचं तर भुताच्या हाती कोलीत मिळणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल आणि कृतीशिलता आणि पारदर्शकता यातून स्वत:ची प्रतिमाही तयार करावी लागेल. हे सोपं नाही. अनेक वर्षांपासून मंत्रालयात ठाण मांडून बसलेल्या आणि सर्व खाच खळगे आणि पळवाटा माहिती असलेल्यांच्या हाती प्रशासन आहे. त्यातले प्रामाणिक माणसं शोधून काढावे लागतील. त्यांच्यावर जबाबदारी सोपवावी लागेल. त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि तरीही स्वत:ला दक्ष राहावे लागेल. लोकानुनयाचे नाही; पण लोककल्याणाचे निर्णय घ्यावे लागतील.

पंकजाताई, तुम्ही धाडसी, हुशार, प्रामाणिक आणि तरीही चाणाक्ष आहात असं तुमच्याशी बोलताना जाणवतं. ते सारं कृतीतूनही उतरेल अशी अपेक्षा बाळगतो.

कळावे.

एक सामान्य नागरिक.