Thursday, December 3, 2020

नामदेवच्या ‘काळोखातल्या कविता’

 पत्रकारीतेने मला साहित्यापासून थोडं दूर नेऊन ठेवलंय, असं आता वाटू लागलंय. ते दिवस आज मला प्रकर्षाने आठवताहेत जेव्हा एखादी साहित्याकृती हाती पडली की, केव्हा एकदा ती वाचून पूर्ण करतो असे व्हायचे आणि लगोलग त्याचे रसग्रहण करण्यासाठी कागद आणि पेन समोर ओढले जायचे. छापण्यासाठीच असे नाही; बऱ्याचदा पुन:प्रत्ययासाठी ते केले जायचे. पण आज किती वर्षे झालीत एखाद्या कथा, कविता संग्रहावर लिहून तेही आठवेनासं झालंय. इतरांच्या जगण्याचेच विषय थेट समोर येऊन उभे राहातात आणि मग त्यांच्यासाठीच संगणकाच्या की पॅडवर बोटं नाचायला लागतात. अर्थात, तेही एक वेगळं ‘साहित्य’च आहे आमच्यासाठी, नाही का? 





हे सारं आठवण्याचं कारण एका संवेदनशील तरुणाचा कविता संग्रह आहे. नामदेव कोळी त्याचं नाव आणि ‘काळोखातल्या कविता’ हा कविता संग्रह. याच कविता संग्रहाच्या शेवटी प्रस्तावनेच्या स्वरुपात त्यावर दीर्घ लेख छापलेला आहे. पण खरं सांगायचं तर तो माझ्याकडून दीड पानाच्या वर वाचला गेला नाही. कवितेचा अर्थ इतर कोणी समजावून सांगू नये, असं मला वाटतं. तो ज्याचा त्याने समजून घ्यावा. कविता वाचताना जे एक चित्र, दृष्य डोळ्यासमोर उभं राहातं ना, त्यातले रंग, चेहरे आणि भावनाही आपल्या स्वत:च्या असाव्यात. तसं असेल तर मिळणारी अनुभूती खरा आनंद देते. दुसऱ्यांच्या डोळ्यांनी ते पहाताना उगाच अंधत्वाची जाणीव व्हायला लागते आणि ते नकोसं होतं. भलेही त्यांच्या चित्रातले रंग अधिक गहिरे, अधिक गडद असतील, चेहरे स्पष्ट आणि आकर्षक असतील आणि भावना अधिक खोलवरच्या असतील तरी. मला त्या चित्रांपेक्षा आपल्या डोळ्यातलीच चित्र अधिक भावतात. असो.


नामदेवचा हा कविता संग्रह वाचल्यानंतर जे काही व्यक्त व्हावंस वाटतंय ते आकलन नाही आणि विवेचनही नाही. ती अनुभूती आहे. पुनरूक्तीचा आनंद घेण्याचा एक प्रयत्न आहे. स्वानंदासाठीची धडपड आहे असंही म्हणता येईल. खूप वर्षांनी ती करावीशी वाटतेय. का वाटतेय ? नीट सांगता येणार नाही. कदाचित नामदेवच्या कवितांमध्ये त्यासाठीची ऊर्जा दडलेली असेल. कदाचित त्याच्या अनुभूतीशी माझ्या अनुभूतीचं नातं अधिक घट्ट जुळलं असेल. जे लहानपणी, अगदी तारूण्यातल्या अर्ध्या आयुष्यापर्यंत जगलो ते अनुभव या कवितांनी पुन्हा नव्याने दिले असतील. काहीही कारण असू शकेल. पण या कवितांनी माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे असं वाटतंय. म्हणूनच पुन्हा पुन्हा मी त्या वाचतोय. 


अर्ध्या आयुष्यापर्यंत जे अनुभव घेतले त्या अनुभवांचे रंग मला नामदेवच्या कवितांमध्ये दिसले. त्या रंगातला एक ठळक रंग म्हणजे काळोख. अंधार. कधी तो किर्रर्र असेल तर कधी त्यात एखादी उजेडाची तिरीप असेल. कधी डोळे मिटल्यामुळे आलेले अंधारलेपण असेल तर कधी दिवसा उजेडी परिस्थितीच्या धक्क्याने डोळ्यांपुढे आलेली अंधारी असेल. काळोखाची ही रुपंही जेव्हा कविता बनतातना, तेव्हा सरसरून काटा येतो अंगावर. 


कविता तेव्हाही होती

आजही आहे

रात्रीला घट्ट बिलगलेल्या 

काळोखासारखी 


इथे काळोखाची कविता बनली आहे की कवितेवर स्वार झालाय काळोख ? पुन्हा तेच. कविता वाचताना आणि वेचताना जे वाटेल तेच खरं. कविता जन्म घेईपर्यंत कवीची असते. नंतर ती वाचणाऱ्याची होते. त्यामुळे कवितेचा अर्थ कवीने नाही सांगू. तो वाचणाऱ्याला दिसू द्यावा. नामदेवच्या या कवितांमध्ये अशा दिसणाऱ्या आणि दाखवणाऱ्या जागा जागोजागी सापडल्या मला. त्या जागांवर थोडं थांबून डाेळे आणि मन तेवढं उघडायचं, बस्स. कधी थरथरून काटा येतो अंगावर तर कधी आवंठा. कधी आपणच पाहू लागतो आपल्याकडे मागे वळून. मग आत्मपरीक्षणाचीही एक लहर येऊन जाते, समुद्राच्या काठावर एखादी मोठी लाट येऊन पुन्हा समुद्राशी एकरूप होऊन जावी तशी. 


बापानं थेट म्हातारपणीही

माझ्यासाठी गावातली 

गुरं-ढोरं राखली


मी ऐन तारुण्यातही

भटकतोय बेलगाम 

घोड्यासारखा.


२००६ साली नामदेवने ही कविता लिहीली. त्यावेळी तो अगदीच तारुण्यात असेल. शिक्षण आणि नोकरीच्या मागे लागलेला. भटकत राहिलेला आणि काहीसा भरकटलेला. त्या भरकटलेपणाची बाेचणी अशी कधी तरी कविता बनून आली असेल कागदावर. ज्यांच्या आयुष्यात असा काळ येऊन गेलाय त्यांच्यासाठी या ओळी काय देऊन जातात हे त्यांनाच कळावं. नामदेवने दिलंय तेवढंच शब्दरूप खूप आहे त्यासाठी.


काळोखाच्या या कवितांमध्ये काळोखापेक्षाही अधिक दिसते आणि पानोपानी भेटते ती नामदेवची माय. खरं तर ती काही जगावेगळी आई नाही. इतरांची असते तशीच दिसते या कवितांमध्ये. तीच गरीबी, तोच मायेचा समुद्र, तीच तगमग, तीच असहायता. तरीही नामदेव तिच्या भावनांना चितारतो तेव्हा ते चित्र अधिक भावतं. एका कवितेत तो म्हणतो, 


दिवसभर राबून

मध्यरात्री तुटक्या खाटेवर

माय घेते विश्रांती कण्हत कण्हत

तिचं मन मात्र निघून जातं हळुवार

सरणापर्यंत

सुखाचं मरण शोधत.


आपण कधीच कसा विचार नाही केला आईच्या मनाचा, असा प्रश्न टोचला मनाला ही कविता संपली तेव्हा. म्हणूनच कविताही भिडली मनाला. हाच अनुभव दिला त्याच्या ‘मायनं कविता लिहीली असती तर’ या कवितेने. तो म्हणतो,


नियतीवर लिहायची असेल कदाचित तिला कविता.


मायचा राग संसाराची कुतरओढ ज्या नवऱ्यामुळे होते तिच्यावर नसतो. अकारण छळणाऱ्या सासू, नणंदांवर नसतो. तिला हा नियतीचाच खेळ वाटत असतो. म्हणून जाच देऊनही सासरची मंडळी आणि बऱ्याचदा पुढची पिढीही तिच्या रोशाचे बळी कधी ठरत नाहीत. पण त्याची साधी जाणीवही आपल्याला कधीच कशी होत नाही? असा प्रश्न तुमच्या संवेदनशील असलेल्या मनाला बोचल्याशिवाय राहात नाही. 


नामदेवच्या या संग्रहात त्याच्या वडिलांवरही कविता आहेत. तेही इतरांचे वडील असतात तसेच आहेत. पण त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात शिरू शकतो तो नामदेव. एक कविता वयाने मोठ्या असलेल्या पण अकाली मृत्यू आलेल्या बहिणीवरही आहे. गावातल्या अकाली प्रौढत्व आलेल्या गावच्या ‘परकरी पोरीं’चे चित्रही त्याने कवितेतून चितारले आहे. सुखाचा उजेड क्वचितच कुठे असेल. पण म्हणूनच मनाच्या खोल गाभाऱ्यात या कविता पोहचू शकत असाव्यात. 


कविता संग्रह वाचताना जे काही वाटलं ते असं होतं. त्या निमित्ताने रसग्रहणाचा आनंद खूप वर्षानी घेता आला. पुन्हा इतका मोठा गॅप पडू नये असा प्रयत्न करायला हवा असं स्वत:लाच बजावतोय. पण त्यासाठी आधी असा एखादा नामदेवही भेटायला हवा ना. पाहू या भेटतोय का ते.