पंकजाताई, आता शहाणं व्हायला हवं
प्रिय पंकजाताई मुंडे,
तुमचे पिताश्री गोपीनाथराव मुंडे यांचे धक्कादायक निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला पंचत्वात विलीन करताना तुम्ही म्हणाला होतात की मी गोपीनाथ मुंडेंचा विसर पडू देणार नाही. खरं तर अजूनही तुम्ही मधून मधून त्या वचनाची आठवण करून देतच असता समस्त महाराष्ट्रीयांना. पण सध्या तुमच्या खात्यातला जो काही कथित घोटाळा गाजतो आहे त्यामुळे महाराष्ट्र खरंच गोपीनाथरावांना विसरणार नाही, याची खात्री होत चालली आहे महाराष्ट्राची. गोपीनाथरावांच्या बाबतीत असं कधी घडलं नाही, असं म्हणत राहावं लागेल की काय सतत, असा प्रश्न पडतो आहे.
गोपीनाथराव गेल्यानंतर पंकजाताई तुम्ही ज्या धर्याने परिस्थितीला सामोरे गेलात, ज्या कौशल्याने शोकाकूल जनसागराला तुम्ही थोपवलंत आणि ज्या चतुराईने माध्यमांनाही हाताळलंत ते पाहून तुम्ही गोपीनाथरावांपेक्षा मोठ्या व्हाल असं वाटायला लागलं होतं आम्हाला. तुमच्या व्यक्तिमत्वातून ओसंडून वाहाणारा आत्मविश्वास, तुमच्या बोलण्यातून व्यक्त होणारी राजकीय प्रगल्भता यांनी आम्हाला काहीसं चकीत केलं होतं म्हणा ना. ऐन निवडणुकीपूर्वी तुम्ही काढलेली संघर्षयात्रा, तिला मिळालेला प्रतिसाद, त्या यात्रेच्या प्रारंभी आणि समारोपाला आलेले दिग्गज नेते, त्यांनी केलेली भाषणं आणि तिथेच तुम्हीही केलेलं भाषण यामुळे तर आम्हाला खात्रीच झाली होती तुमचं राजकीय नेतृत्व प्रस्थापित होण्याची.
पंकजाताई, तुम्ही मुख्यमंत्री व्हावं, असं तुमच्या आणि त्याहीपेक्षा गोपीनाथरावांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनापासून वाटत होतं. ते शक्य नाही हे राजकीय समज असलेल्यांना कळत होतं; पण राज्याच्या मंत्रिमंडळात तुमचं स्थानही मोठं असेल याची खात्री तेव्हा वाटत होती. झालंही तसंच. तुम्हाला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचं मानलं जाणारं ग्रामीणविकास हे खातं मिळालं. गोपीनाथरावांचं सर्वात आवडतं खातं हे होतं असं त्यांनीच पत्रकारांना कधी काळी सांगितलेलं. शिवाय, महिला आणि बालविकास हे खातंही तुमच्या ओढणीत पडलं. गोपीनाथरावांच्या सहवासात तुम्ही खूप काही शिकला असाल आणि त्यामुळे ही दोन्ही महत्वाची आणि सक्षम खाती तुम्ही पेलून न्याल, असंही वाटत होतं. घरातल्या स्वच्छतागृहासाठी मंगळसुत्र विकणाऱ्या महिलेला तुम्ही नवं मंगळसुत्र घेऊन दिलंत आणि तिला महाराष्ट्रात या योजनेची ब्रॅंण्ड अॅम्बॅसेडरही बनवलंत तेव्हा तुमच्या या निर्णयाचं खरंच कौतुक वाटलं होतं आम्हाला. असाच कौतुकास्पद कारभार तुम्ही करीत राहाल, अशी खात्री होत होती आमची.
काही दिवसांपूर्वी तुम्ही औरंगाबादला भाषण केलंत. निमित्त अर्थात गोपीनाथरावांच्या स्मृतिदिनाचं होतं. हा क्षण हळवं होण्याचा होता याची पूर्ण कल्पना आहे आम्हाला. त्या दिवशी तुम्ही हळव्या झाल्या असता, प्रसंगी भावनाविवश झाल्या असत्या तरी तुमचा खंबीरपणा आम्ही नाकारला नसता पंकजाताई; पण तुम्ही त्या दिवशी तुमच्याच पक्ष नेतृत्वाबाबत जे काही बोलल्याचं प्रसिद्ध झालं आहे ते धक्का देणारं होतं. नंतर तुम्ही त्याचे खुलासेही करत होतात. ते विधान तुम्ही तुमच्या पित्याचा मोठेपणा सांगण्यासाठी बोलला असाल असं गृहीत धरून आहोत आम्ही; पण त्यांचा मोठेपणा असा इतरांच्या मजबुरीचे दाखले देऊनच दिसणारा नव्हता, हे तुम्हाला आम्ही काय सांगावं! गोपीनाथराव स्वपक्षात किती अस्वस्थ होते आणि त्यांनी पक्षनेतृत्वालाच आव्हान देण्याचं धाडस दाखवत बंडाचं निशाण कसं फडकवलं होतं हे आम्हीच काय, सारा देश जाणतो. पण तसं करण्यासाठी ते गोपीनाथ मुंडे होते हे कसं विसरता येईल? तुम्ही मात्र ते विसरलात आणि सरळ त्यांच्याच भूमिकेत चालला गेलात. हे तितकं सोपं काम नाही पंकजाताई.
इतर बाबींचं राहू द्या बाजूला. सध्या गाजत असलेल्या कथित २०६ कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांबाबत बोलू आज आपण. एनडीटीव्ही पासून टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीपर्यंत सर्वांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. अर्थात त्यांनी विषय केला म्हणून तो मोठा होत नाही हे मान्य आहे आम्हाला. पण म्हणून त्याचे गांभीर्यही कमी होत नाहीना.हे सारं ठेकेदारांची लाॅबी तोडली म्हणून झालं, असं तुम्ही म्हणता आहात. तसं असेल आणि तुम्ही खरंच ठेकेदारांची लाॅबी तोडायला निघाला असाल तर तुमचं अभिनंदन! पण केवळ तसं बोलून होणार नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. या लाॅबीत कोण कोण आहेत आणि त्यांनी तुमच्यावर कसा दबाव आणला होता, हे तुम्ही तितक्याच धारिष्ट्याने जगजाहीर कराल तरच सर्वसामान्य जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल. माध्यमं भलेही तुमच्या या म्हणण्यावर सोयिस्कर विश्वास ठेवतील; पण सामान्य जनता नाही. ही जनता लगेच बोलत नाही. बहुतांशी बोलतच नाही; पण करून दाखवते. परिस्थिती आता बदलली आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. आताचे फाॅलोअर्स डोळ्याला पट्टी बांधून नेत्यांच्या मागे पळत नाहीत, याची जाणीव त्यांनी भल्याभल्यांना करून दिली आहे. तुमच्यासारख्या तरूण, उच्चशिक्षित आणि धाडसी राजकारण्यांसाठी खरं तर आधीच्या घटनांनी पुढच्यांना ठेच पोहोचवली आहे. त्यातून तुमच्या पिढीने शहाणं व्हायला हवं. कदाचित या घटनेतून तुम्ही ते शिकला असालही.
विरोधकांना, टीकाकारांना दुर्लक्ष करून मारायचं असतं असं व्यावहारिक तत्वज्ञान सांगितलं जातं. मला वाटतं ते अपूर्ण आहे. केवळ दुर्लक्ष केल्याने टीकाकार, विरोधक मरतात असं होत नाही. ते मरतात त्या टीकेला त्याच पद्धतीने उत्तर देण्याऐवजी कृतीतून स्वत:ला सिद्ध केल्याने. ते सिद्ध करणं फार महत्वाचं असतं. पुढच्या काळात तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावं लागेल. सोप्या शब्दात सांगायचं तर भुताच्या हाती कोलीत मिळणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल आणि कृतीशिलता आणि पारदर्शकता यातून स्वत:ची प्रतिमाही तयार करावी लागेल. हे सोपं नाही. अनेक वर्षांपासून मंत्रालयात ठाण मांडून बसलेल्या आणि सर्व खाच खळगे आणि पळवाटा माहिती असलेल्यांच्या हाती प्रशासन आहे. त्यातले प्रामाणिक माणसं शोधून काढावे लागतील. त्यांच्यावर जबाबदारी सोपवावी लागेल. त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि तरीही स्वत:ला दक्ष राहावे लागेल. लोकानुनयाचे नाही; पण लोककल्याणाचे निर्णय घ्यावे लागतील.
पंकजाताई, तुम्ही धाडसी, हुशार, प्रामाणिक आणि तरीही चाणाक्ष आहात असं तुमच्याशी बोलताना जाणवतं. ते सारं कृतीतूनही उतरेल अशी अपेक्षा बाळगतो.
कळावे.
एक सामान्य नागरिक.
No comments:
Post a Comment