Sunday, January 1, 2017

नियोजित कादंबरीचा आणखी एक पीस...




नऊ

चेहऱ्यावर थंड पाण्याचे सपके बसले आणि चेतन भानावर येऊ लागला. त्याने डोळे किलकिले केले तसा काळ्या चेहऱ्याचा एक बलाढ्य इसम त्याला म्हणाला,
‘उठा, उठा पत्रकार साहेब. उठून बसा. तुमच्यासाठी जेवण आणलय. ते खा.
चेतनने डोळे उघडले तेव्हा आपण कुठे आहोत हे त्याला कळालेच नाही. त्याने झोपल्या झोपल्याच वर पाहिले. ती एक झोपडी असावी हे त्याच्या लक्षात आले.अशा अनेक झोपड्यांमधून गेल्या काही दिवसांत त्याचा रहिवास झाला होता. पण शेजारी बसून आपल्याला उठा उठा म्हणणारा गुंड मात्र नवा वाटत होता आणि मराठी भाषेतून बोलत होता. त्याने त्याच्याकडे मान वळवली. जाड मिशा, अंगात पांढरा बनियन, खाकी फूल पॅन्ट, त्यावर जाड पट्टा बांधलेला आणि डाव्या हातात पाण्याची एक बाटली असलेला तो पोलिस असावा याची जाणीव चेतनला झाली. पण गेले काही दिवस कोणावरच विश्वास ठेवता येत नव्हता. ग्लानी अजून पुरती गेली नव्हती. त्यामुळे त्याचे डोळे पुन्हा मिटायला लागले तसा पाण्याचा आणखी एक सपका त्याच्या चेहऱ्यावर आला. त्यामुळे डोळे उघडण्याऐवजी त्याने आणखीनच घट्ट मिटले. चेहऱ्यावरचे पाणी पुसण्यासाठी म्हणून त्याने अापला उजवा हात चेहऱ्याकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण तेवढीही ताकद त्याच्यात नव्हती. ही बाब त्या पोलिसाच्या लक्षात आली. त्याने चेतनच्या मानेखाली हात घातला आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. आता उठून बसण्याशिवाय पर्याय नाही हे चेतनच्या लक्षात आले. त्याच्या मदतीनेच तो कसा बसा भिंतीला टेकून बसला.
‘हे दूध प्यायचं आणि अंडे खायचे. काय? समजलं का? धमकी भरल्या आवाजात त्याचे फर्मान सुटले. चेतनलाही अन्नाची आवश्यकता होतीच. दूध आणि अंडी आणली आहेत म्हटल्यावर त्याने पुन्हा हात पुढे करण्यासाठी म्हणून उचलण्याचा प्रयत्न केला पण दोन, तीन इंचापेक्षा जास्त उंच तो उचलला गेला नाही. मग त्या पोलिसानेच दुधाचा ग्लास उचलला आणि चेतनच्या तोंडाला लावला. हळू हळू ग्लासभर दूध तो पिऊन गेला. मग अंडीही त्याने चेतनला भरवली. खूप दिवसांनंतर इतके पौष्टीक आणि साॅलिड अन्न पोटात गेल्यामुळे चेतनला पोटात गडबड जाणवू लागली. आपल्याला उलटी होते की काय, असेही त्याला वाटायला  लागले. त्यामुळे तो तिथेच कलंडला आणि आडवा झाला. काही क्षणात त्याचे शरीर निद्रेच्या अधीन झाले.
काही वेळाने जाग आली तेव्हा त्याची स्थिती काहीशी सुधारली होती. आता ग्लानी फारशी जाणवत नव्हती. त्यामुळे जागृतावस्था पूर्ण होती. जाग येताच त्याने शेजारी मान वळवून पाहिले. ग्लासभर दूध आणि चार अंडी सक्तीने आपल्या पोटात ढकलणारा तो पोलिस खुर्चीत बसल्या बसल्याच झोपला होता आणि मधूनच घोरतही होता. त्याचे निरीक्षण सुरू असतानाच अचानक शेजारी कोणी तरी आल्याचा आवाज झाला. चेतनने आवाजाच्या दिशेने मान वळवली.  अर्ध्या भिंतीच्या वर काड्याच हाेत्या. त्यामुळे पलिकडचे आवाज स्पष्टपणे एेकू येत होते.
‘या सर’
‘कुठे आहे?
‘या खोलीत आहे सर’
‘काही माहिती काढली की नाही अजून?
‘नाही सर. त्याच्यात शक्तीच नाही काही बोलायची अजून.
‘खायला, प्यायला द्या त्याला आणि वाढवा शक्ती. वाटल्यास एखादे स्टेराॅइडचे इंजेक्शन मागवून द्या त्याला. मला माहिती तातडीने मिळाली पाहिजे.
‘यस सर. बोलेल सर आज तो.
‘बोलेल नाही, बोललाच पाहिजे. नाही तर पोलिसी दणका दाखवा. काय करायचे ते करा. पण मला माहिती पाहिजे. समजले का?
‘यस सर.
या संवादानंतर काही क्षणांनी दूरवरून एक कार सुरू होऊन निघून गेल्याचाही आवाज चेतनने ओळखला. याचा अर्थ सरळ होता. पोलिसांचा वरिष्ठ अधिकारी इथे येऊन गेला होता. म्हणजे सध्या आपण नक्कीच पोिलसांच्या ताब्यात आहोत तर.. चेतनला जाणीव व्हायला लागली हाेती. गेले काही दिवस जिवंत राहण्यापुरतेेच पाणी आणि अन्न पोटात जात होते. त्यामुळे सतत ग्लानी आणि त्यात होणारा छळ यामुळे त्याला भान राहात नव्हते. दर दिवशी जगण्याची आशा कमी कमी होत चालली होती. आपण ती टेप कुठे आहे हे सांगितलं आणि ती या गुंडांना सापडली की ते आपल्याला जिवंत ठेवणार नाहीत याची त्याला कल्पना होती. त्यामुळे टेप कुठे आहे हे कितीही छळले तरी तो सांगत नव्हता. याचा अंत काय आणि कसा होणार आहे, याचा विचार करणेही त्याने साेडून दिले होते.
आणि आज अचानक आपण पोलिसांच्या ताब्यात आहोत, याची त्याला जाणीव होत होती. पण पोलिसांचे हे वागणेही आता त्याच्या समोर मोठे प्रश्नचिन्ह घेऊन आले होते. मराठी बोलणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात आपण आहोत याचा अर्थ त्या गुंडांपासून पोलिसांनी आपली सुटका केली आहे तर. तो विचार करायला लागला. पण मग सुटका करूनही ते आपल्याला अशा झोपडीत का घेऊन आले आहेत. आपल्याला आपल्या गावी का नाही नेले अजूनआणि तो पोलिसांचा अधिकारी जे काही म्हणत होता त्याचा अर्थ काय
झोपडीच्या दिशेने कोणी तरी येत असल्याची जाणीव चेतनला झाली म्हणून त्याने दाराच्या दिशेने मान वळवली. दार उघडले गेले तशी खूर्चीवर झोपलेल्या पोिलसाला जाग आली. तो पटकन उठून उभा राहिला. आत आलेल्या माणसाने त्याला बाहेर जायला सांगितले. जाताना दार बंद करायची सूचना करायलाही तो विसरला नाही. तो पोलिस दार बंद करून चालत लांब गेला आहे याची खात्री खोलीत शिरलेल्या माणसाने करून घेतली आणि तो त्याच खूर्चीवर येऊन बसला.
‘काय, शुद्ध आली की नाही अजून? चेतनला उद्देशून तो म्हणाला.
चेतनने नुसतीच मान हालवली.
‘चला, म्हणजे आता तुम्ही सांगू शकणार रहस्याचे उत्तर. काय?
चेतनला त्याचा रोख कळला नाही. त्याने काहीच उत्तर देता डोळे मिटले आणि मान फिरवून घेतली.
‘ओय. मी काय विचारतोय? बास झाली नाटकं, काय? असे म्हणत त्याने आपला बूट घातलेला पाय इतका पुढे केला की चेतनला वाटले आपल्याला लाथ मारून उठवण्याचाच त्याने प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याने डोळे उघडून त्या माणसाकडे पाहिले. तसा तो पुन्हा बोलायला लागला.
‘आता उठायचं आणि गप गुमानं सांगून टाकायचं. काय?
‘काय सांगायचं? काेण आहात तुम्ही?
‘इन्स्पेक्टर भांड म्हणतात मला. वेरी क्रुअेल इन्स्पेक्टर म्हणून ओळख आहे आपली. काय?
‘म्हणजे पोलिस अाहात तुम्ही..
‘ओ. मग काय सॅनिटरी इन्स्पेक्टर वाटलो की काय तुला. चल उठ.. असे म्हणत त्याने चेतनच्या हाताला धरून त्याला ओढले. थोडी तरतरी आली असली तरी चटकन उठून बसावे इतकी ताकद त्याच्यात नव्हतीच. त्यामुळे तो इन्स्पेक्टर भांड यांच्या दिशेला नुसताच ओढला गेला.  इन्स्पेक्टर वैतालगे. त्यांनी त्याला पुन्हा बूट घातलेल्या पायाने भिंतीकडे लाेटले. बुटाचा पाय छातीच्या बरगड्यांवर दाबला गेल्यामुळे त्याला तिथे वेदना झाल्या तसा तो कळवळला. चेतनसाठी हे सारे अनपेक्षित आणि धक्कादायक होते. पोलिसांच्या वेशात अपहरणकर्तेच इथे असावे, असे त्याला वाटू लागले.

Sunday, November 20, 2016



नाव न ठरलेली एक कादंबरी...

मित्रांनो, सध्या मी एक कादंबरी लिहीतो आहे. पोलिस खाते, राजकीय नेते आणि पत्रकार यांच्या वर्तणुकीवर प्रकाश पडावा अशी या कादंबरीची रचना आहे. या अजून अपूर्ण असलेल्या कादंबरीच्या आठव्या प्रकरणाची सुरूवात तुम्हाला वाचण्यासाठी म्हणून देत अाहे. कशी वाटतेय, अवश्य प्रतिक्रिया द्या....


सकाळी डाेअरबेल वाजवली तेव्हा लोणकरांना जाग आली. त्यांनी सवयीप्रमाणे आधी घड्याळ पाहिले. साडेसात वाजले होते. उठून दार उघडतात तोवर दुसऱ्यांदा बेल वाजली. त्यामुळे त्यांना रात्री अचानक आलेल्या शिरीषची आठवण झाली. आता तो नक्की नसेल, असे मनाशी म्हणत त्यांनी दार उघडलं. समोर अजय होता.
‘काय रे?’ त्यांनी विचारले. अजय काहीच न बोलता रूममध्ये आला आणि त्यानेच दरवाजा बंद करून घेतला.
‘तुमचा फोन सायलेंटवर आहे का सर?’
‘का?’
‘इन्स्पेक्टर गावितांचा माणूस आला होता आत्ता. तुम्ही फोन उचलत नाही आहात असं म्हणत होता.’
काहीही न बोलता लोणकर पलंगाजवळ गेले आणि त्यांनी फोन उचलून पाहिला. सायलेंटवर होता आणि जवळपास ७ मिस्ड काॅल्स िदसत हाेते. इन्सपेक्टर गावितांचेच असावेत असे म्हणत त्यांनी लिस्ट पाहिली. एकाच मोबाईल क्रमांकावरून ते काॅल आले होते; पण गावितांचे नव्हते. त्यांना आश्चर्य वाटले.
‘काय म्हणाला तो माणूस?’ त्यांनी अजयला विचारले.
‘तुम्ही फोन उचलत नाही आहात, असं तो म्हणाला.’
‘बस, एवढंच म्हणाला? आणि तुला कसं ओळखलं त्याने?’ लोणकरांनी अजयला विचारले.
‘मलाही नाही कळालं ते... म्हणजे अचानक माझ्याजवळ आला आणि म्हणाला तुम्ही संपादक साहेबांबरोबर आहात ना? मी हो म्हटलं. मग म्हणाला मी इन्सपेक्टर गावित साहेबांचा माणूस आहे. तुमचे साहेब फोन उचलत नाहीयेत. जाऊन सांगा त्यांना.’
‘पोलिस डिपार्टमेंटमधलाच असेल ना? म्हणजे युनिफाॅर्ममध्ये होता की..’
‘नाही. पोलिस नव्हता तो.’
‘नव्हता? तुला कसं माहिती?’
‘सर, पाच फूट उंचीचा असेल तो. केसही मोठे होते त्याचे. असा माणूस पोलिस कसा असेल?’
अजयचा तर्क बरोबर होता. लोणकरांनी तो नंबर डायल केला. दोन रिंग नंतर लगेच पलिकडून प्रतिसाद आला.
‘हॅलो. साहेब बोलताय ना?’
‘तुम्ही कोण?’
‘ओ साहेब, ऐका. तुमच्यासाठी महत्वाचा निरोप आहे. तुमचा माणूस पोलिसांच्या ताब्यात आलाय.’
‘काय! चेतन पोलिसांना मिळाला?’लोणकरांना आनंदाचा धक्काच बसला होता. त्यांचे हे वाक्य ऐकून अजयही उसळला. अभावितपणे तो लोणकरांच्या जवळ सरकला. पण पलिकडून बोलणाऱ्याला लोणकरांचे मध्येच बोलणे आवडले नाही.
‘साहेब, ओरडू नका. तो पोलिसांना सापडलाय; पण गावित साहेब ते तुम्हाला सांगायचे नाहीत. सर्व पोलिसांनाही त्यांनी तुमचा माणूस सापडल्याची माहिती तुमच्यापर्यंत जाऊ द्यायची नाही असे सक्त आदेश दिले आहेत. म्हटलं तुम्हाला सांगून द्यावं.’
‘तुम्ही कोण आहात? तुम्ही तर गावितांकडूनच बोलताय ना?’ लोणकरांना नेमकं कोण ही माहिती देतयं हे समजत नव्हतं.
‘मी तुमचा सदीच्छावाला आहे असं समजा. बाकी माहिती तुम्ही काढून घ्या’ पलिकडून एवढंच वाक्य आलं आणि फोन बंद झाला. सदिच्छावाला हा शब्द त्यांना खटकला.
‘चेतनसर मिळाले सर?’ अजयने फोन बंद झाल्याचे लक्षात येताच लोणकरांकडे आपली उत्सुकता व्यक्त केली.
‘मला कळत नाहीये, चेतन सापडला म्हणतोय आणि इन्सपेक्टर गावितांनी ही माहिती माझ्यापासून दडवून ठेवायला सांगितली आहे असेही म्हणतोय आणि तरी मला फोन करून सांगताये. काय खरं आहे काय माहिती...’ स्वत:शीच बोलावे तसे लोणकर बोलत होते.
सोफ्यावर बसत त्यांनी अजयला टीव्ही लावायला सांगितले आणि त्यांनी इन्सपेक्टर गावितांचा फोन डायल केला. अजयने न्यूज चॅनल लावले होते. त्यावर सकाळच्या बातम्या सुरू होत्या. गावितांचा फोन बराचवेळ कोणी घेतलाच नाही. अगदी शेवटच्या क्षणी तो उचलला गेला. पलिकडून आवाज आला,
‘जयहिंद. हेड काॅन्स्टेबल नाईक बोलतोय.’
‘हा गावित साहेबांचा फोन आहे ना ?’ लोणकरांनी थेटच प्रश्न केला.
‘आपण कोण बोलताय?’ नाईकांनी तिकडून विचारले.
‘मी त्यांचा मित्र बोलतोय. मला त्यांच्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे. त्यांना द्या ना फोन’
‘आपलं नाव कळू शकेल का सर? ’
‘मी पाटील बोलतोय मुंबईहून’ लोणकरांनी खोटंच सांगितलं.
‘सर, गावित सर कामात अाहे. ते आता फोन घेऊ शकत नाही.’
‘हॅलो, पण आता कुठे आहेत ते?’ लोणकरांनी गावितांना भेटायला जायची तयारी त्या क्षणी केली.
‘मी सांगू शकत नाही. जयहिंद’ असे म्हणून हेडकाॅन्स्टेबल नाईकांनी फोन कट केला. लोणकरांची अस्वस्थता वाढू लागली होती. त्यांनी अजयला पोलिस ठाण्यात जाऊन गावित तिथे आहेत का, याची माहिती काढायला सांगितले. अजय जाताच त्यांनी तोंड धुतले आणि काऊंटरवर फोन करून चहाची आॅर्डर दिली.
टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये दम नव्हता. या प्रकरणाचा काही मागमूसही त्या बातम्यांमध्ये नव्हता. अजयच्या फोनची वाट पाहाण्याशिवाय पर्याय नव्हता.
चेतन सापडला असेल तर गावित आपल्यापासून का लपवताय? उलट सर्वात आधी त्यांनी आपल्याला फोन करून माहिती द्यायला हवी होती. या शोधकार्यात आपलीच तर त्यांना सर्वात मोठी मदत झाली होती. अजयला त्याचा जुना िमत्र भेटला काय, त्याने त्याच्याकडे आलेल्या किडनॅपर टोळीच्या माणसाविषयी अजयला हिंट दिली काय, आपण गावितांना ती माहिती देण्यासाठी अजयला विश्वासात घेतले काय आणि चेतनपर्यंत पोहोचणे गािवतांना शक्य झाले काय.  सारे एकाच सुत्रात बांधले गेले आहे; पण गावित आता आपल्यापासूनच माहिती का लपवित असतील? की तो फोन फसवा होता आणि चेतन सापडलेलाच नाही पोलिसांना? पण मग अशी खोटी माहिती देण्यामागे त्या व्यक्तीचा तरी काय हेतू असू शकतो? खोटी माहिती देऊन काय मिळणार आहे त्याला?
लोणकरांचे विचारचक्र चहा घेऊन आलेल्या माणसामुळे थांबले. त्यांनी परत जाताना त्याला दार बंद करून घ्यायला सांगितले.  चहाचे दोन घोट पोटात गेल्यावर त्यांना सिगारेटची आठवण झाली. टीपाॅयवर त्यांनी पाकीट शोधले. ते खाली पडले होते. शेवटची सिगारेट त्यात होती. चहाचे घोट घेताना आणि सिगारेटचा धूर हवेत सोडताना त्यांचे विचारचक्र पुन्हा सुरू झाले. काही वेळात फोनची रिंग वाजली. अजयचाच फोन होता. त्यांनी घाईनेच फोन घेतला.
‘हं बोल अजय’
‘सर, गावित साहेब इथेच होते पोलिस स्टेशनात’
‘होते म्हणजे?’
‘आता ते डीएसपी साहेबांबरोबर कुठे तरी गेले आहेत घाईघाईने’
‘एसपी इथे आले आहेत?’
‘हो सर. दोन, तीन गाड्या होत्या पोलिस अधिकाऱ्यांच्या’
‘बरं, चेतनविषयी कोणी काही सांगतयं का, जरा प्रयत्न करून बघ’
‘केला सर मी प्रयत्न. पण मला हाकलून दिलं एका हवलदाराने. म्हटला जास्त चौकशा करशील तर आत टाकीन.’
‘थोडा वेळ तिथेच थांब. बाहेरून काही माहिती मिळतेय का ते बघ. तिथल्या हालचाली टीप. मी बोलवल्यावर इकडे ये’ लोणकरांनी अजयला सूचना दिल्या आणि फोन बंद केला.