Saturday, January 26, 2019

प्रियंका गांधी (आणि) काँग्रेसचे भवितव्य Priyanka Gandhi (And) Future of Congress Party

प्रियंका हेच आता काँग्रेस पक्षाचे भवितव्य आहे आणि त्या काँग्रेस पक्षाला तारून नेतील, अशी भविष्यवाणी अनेक राजकीय निरीक्षक, विश्लेषक करू लागले आहेत. याचा दुसरा अर्थ राहूल गांधी यांच्यात पक्षाला तारून नेण्याची क्षमता नव्हती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष २०१९ च्या निवडणुकीत यश मिळवू शकला नसता, असा घ्यायचा का? तसे नसेल तर प्रियंकाच्या आगमनामुळे अती प्रभावित होऊन हे विश्लेषक विश्लेषण करीत आहेत, असे म्हणावे लागेल.





प्रियंका यांचे व्यक्तिमत्व आहेच मुळी प्रभावित करणारे. एक तर त्या थेट इंदिरा गांधी यांच्या सारख्या दिसतात. बोलतातही तशाच. त्याचा परिणाम त्यांना पाहाणाऱ्या, ऐकणाऱ्यावर होतो. विशेषत: ज्यांनी इंदिरा गांधी यांना पाहिले आणि ऐकले आहे त्यांच्यावर तर हा प्रभाव चटकन पडतो. मतदारांवरही हा प्रभाव पडेल आणि त्याचा फायदा काँग्रेसला होईल, अशी अटकळ या विश्लेषकांची असते. त्यामुळे अती उत्साहात प्रियंकांना ते काँग्रेसचे तारणहार ठरवताना दिसतात. प्रियंकांनी पक्षात सक्रीय व्हावे, नेतृत्व करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून पक्ष कार्यकर्त्यांकडून होत होती. स्वाभाविकच, त्यांच्या सक्रीय होण्याच्या हर्षोल्हासित प्रतिक्रीया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. त्यामुळे प्रियंका पक्षासाठी ऊर्जा ठरतील, असा या निरीक्षकांचा होरा आहे. याच उत्साहात काही मंडळी त्यांना नरेंद्र मोदींसमोरचा तुल्यबळ ‘चेहरा’ देखील ठरवित आहेत. हे सारे पूर्णपणे चुकीचे आहे का? तर तसेही नाही. पण त्यांना थेट पक्षाच्या तारणहार ठरविण्याआधी आणखी काही बाबींचा विचार करण्याची गरज मात्र आहे.

कोणत्या आहेत या बाबी? सर्वात पहिली बाब म्हणजे प्रियंकांना जरी काँग्रेसच्या महासचिव करण्यात आले असले तरी त्यांना ठरवून दिलेले कार्यक्षेत्र आहे उत्तर प्रदेशातील पूर्व प्रांत. सोप्या भाषेत सांगायचे तर अर्धा उत्तर प्रदेश. उर्वरित अर्धा उत्तर प्रदेश दिला आहे ज्योतिरादित्य शिंदे (सिंदिया) यांच्याकडे. म्हणजे खुद्द राहूल गांधी यांनीच प्रियंका यांना ज्योतिरादित्य यांच्या रांगेत बसवले आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांच्यावर अर्ध्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला यश मिळवून देण्यापुरतीच जबाबदारी आहे हे लक्षात घ्यावे लागेल. याचा आणखी एक अर्थ काढता येतो. सोनिया आणि राहूल हे प्रियंकाच्या प्रभावाची चाचणी घेण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांना प्रियंकाच्या क्षमता आणि मर्यादा जितक्या माहिती असतील तितक्या त्या अन्य कोणाला माहिती असण्याची शक्यता नाही. तारणहार ठरविणाऱ्या राजकीय विश्लेषकांना तर नाहीच नाही. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला तारण्याचे किंवा मारण्याचे जे काही श्रेय जायचे असेल ते राहूल यांच्याच खात्यात टाकावे लागणार आहे. प्रियंकांना त्यासाठी घोड्यावर बसलेले पाहाणे हा राजकीय विश्लेषकांना होणारा भास आहे.

सोनिया आणि राहूल यांनी प्रियंका यांना सध्या अर्ध्या उत्तर प्रदेशापुरतेच मर्यादित ठेवले असले तरी प्रियंकांसमोरचे आव्हान काही लहान नाही. त्यामुळे आई आणि भावाने त्यांना अगदीच ‘अंडर इस्टिमेट’ केले आहे, असेही समजण्याचे कारण नाही. साधारण महाराष्ट्रासारख्या राज्याइतके हे कार्यक्षेत्र आहे. एकूण उत्तर प्रदेशाचा आवाका आहेच असा अवाढव्य. या राज्यात लोकसभेच्या ७१ (महाराष्ट्रात ४८) तर विधानसभेच्या ४०३ (महाराष्ट्रात २८८) जागा आहेत. यापैकी काँग्रेसकडे सध्या लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या अवघ्या ७ जागा आहेत. यावरून या महाकाय राज्यात काँग्रेस समोरचे आव्हान किती मोठे आहे याची कल्पना यावी. प्रियंकांच्या बाबतीत विचार करायचा तर हे आव्हान आणखी मोठे होत जाते. कारण उत्तर प्रदेशाचा विचार केला तर पश्चिम उत्तर प्रदेशच्या तुलनेत पूर्व प्रांतात काँग्रेसला माेठे आव्हान असते. कारण हा प्रांत आहे यादवांच्या प्रभावाखालचा. त्यामुळे इथे सर्वात प्रभावी असतो समाजवादी पक्ष. प्रियंकांकडे हाच प्रांत सोपवण्यात आला आहे. पश्चिमी प्रांतात जाट बहूल लोकसंख्या आहे. त्यामुळे इथे काँग्रेस आणि भाजपला तुलनेने सोपे वातावरण असते. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचे लक्ष देखील याच प्रांताकडे अधिक असते. म्हणजे या दृष्टीने विचार केला तर काँग्रेस, भाजपा आणि बसपा यांचे मतदार साधारण एकाच प्रांतातले आहेत. मायावतींनी काँग्रेसला नाकारण्याचे तेही एक कारण आहे. पण हा मुद्दा नंतर सविस्तर पाहू. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर पूर्व उत्तर प्रदेश प्रांताची जबाबदारी स्वीकारलेल्या प्रियंकांसमोरचे आव्हान बऱ्यापैकी मोठे आहे, याची कल्पना येऊ शकते. हे आव्हान त्या कसे पेलतात, यावर त्यांच्या नेतृत्वाचे विश्लेषण अवलंबून असायला हवे. उगाच २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे ओझे त्यांच्या डोक्यावर थोपवणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल.

नरेंद्र मोदींना म्हणजेच भाजपला रोखण्यासाठी राहूल गांधी यांनी खेळलेली ही खेळी आहे, हा काँग्रेसचा सर्वात मोठा आणि शेवटचा पत्ता आहे, असेही म्हटले जाते आहे. पण तसे ते नाही हे काँग्रेसची उत्तर प्रदेशातील स्थिती, तिथे झालेले सपा-बसपाचे गठबंधन आणि प्रियंकांकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी या बाबी पाहाता लक्षात येते. काँग्रेसला उत्तर प्रदेशात दोन पेक्षा जितक्या जास्त जागा मिळतील तितका काँग्रेसचा फायदाच आहे, हे उघड आहे. पण परिस्थिती उलटही होऊ शकते. म्हणजे  कशी? आज सपा आणि बसपाची युती झाली आहे. त्यांनी या युतीतून काँग्रेसला बाहेर ठेवले आहे. हे संकेत आधीपासूनच मिळत होते. विशेषत: मायावती काँग्रेस विषयी जाहीरपणे जे काही बोलत होत्या त्यावरून त्या काँग्रेसला सोबत घेणार नाहीत, ही शक्यता वाटत होतीच. तसे झाले आणि काँग्रेस सर्व जागा लढवायला, विशेषत: राज्यभर पसरायला मोकळी झाली. याचा परिणाम असा होणार आहे की, जिथे सपाचे उमेदवार असतील तिथेही काँग्रेसचा उमेदवार असेल आणि जिथे बसपाचे उमेदवार असतील तिथेही काँग्रेसचा उमेदवार असेल. त्या प्रत्येक मतदारसंघात भाजपचाही उमेदवार असेल. म्हणजे लढत तिरंगी होण्याची शक्यताच जास्त आहे. या लढतीत प्रियंका गांधी प्रभावी ठरल्या तर त्या सपा-बसपा युतीच्या उमेदवारांची मते काँग्रेसकडे वळवतील. म्हणजे प्रियंका सक्रीय होण्यापूर्वी काँग्रेसची जी मापं मायावती आणि अखिलेश यादव यांनी काढली असतील, ती मापं प्रियंकांच्या येण्यामुळे बदलतील. परिणामी ‘धर्मनिरपेक्ष’ म्हटल्या जाणाऱ्या मतांमध्ये विभागणी होण्याचीच शक्यता आता वाढली आहे. तसे झाले तर ज्या मोदींना रोखण्यासाठी प्रियंकाअस्त्र  असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते आहे, त्या मोदींनाच या अस्त्राचा फायदा होऊ शकतो. सपा-बसपाने काँग्रेसला सोबत घेतले असते तर कदाचित हे घडलेही नसते. म्हणजे कदाचित प्रियंका मैदानात अशा उतरल्याही नसत्या आणि मतविभाजन होऊन मोदींना फायदा झालाही नसता. या लढाईत प्रियंका कोणाच्या विरोधातच उतरल्या असतील तर त्या मायावतींच्या विरोधात उतरल्या असण्याची शक्यता अधिक आहे. त्याला कारणही आहे. काँग्रेसला २०१९ च्या निवडणुकीनंतर सर्वाधिक धोका दिसतो आहे तो मायावतींकडूनच. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मायावतींनी ऐनवेळी काँग्रेसबरोबर युती करायला नकार देऊन काँग्रेसची अडचण केली होती. आताही काँग्रेसप्रणीत महायुतीत येण्याचे त्यांनी टाळले आहे. अखिलेश यादवही मायावतींबरोबर वाहात गेले आहेत. पंतप्रधान होण्याच्या स्वप्नाने मायावतींना पछाडले आहे. त्यामुळे काँग्रेसला वगळून ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अजित सिंग आणि इतर काही पक्षांना एकत्र करून तिसरी आघाडी बनवायची आणि पंतप्रधान व्हायचे, असे मायावती यांचे प्रयत्न सुरू आहेत. हा उघड उघड काँग्रेसच्या स्वप्नांना सुरुंग आहे. तो सुरुंग उडण्याआधीच निष्क्रीय करायचा असेल तर मायावतींना रोखण्यासाठी प्रियंकाचे अस्त्र चालवावे लागेल, असे गणित राहूल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केलेले दिसते. त्यामुळे प्रियंका आल्यामुळे भाजप नव्हे, बसपा हादरली असण्याचीच शक्यता अधिक आहे. राहिला नेरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपचा प्रश्न, तर तो आधीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निकाली काढला आहे. या योगींना कार्यरत आणि बोलत ठेवले तरी मोदी विरोधात उत्तर प्रदेशात तरी फार काही करीत बसण्याची गरज काँग्रेसला भासणार नाही.

आता थोडं प्रियंकांच्या प्रभावाविषयी. त्या बहुतांशी इंदिरा गांधींसारख्या दिसतात आणि म्हणून मतदारांना त्या आकर्षित करतील या गृहितकाला काही अर्थ नाही. कारण इंदिरा गांधींनी ज्यांच्यावर प्रभाव पाडला होता, त्या पिढीपेक्षा नवी पिढी मतदार म्हणून अधिक आहे. शिवाय, केवळ सारखे दिसण्याने आजचा मतदार भुलतो, असेही नाही. तसे असते तर आज बाळासाहेबांसारखेच दिसणाऱ्या, बोलणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षाचा विधान सभेत केवळ एकच आमदार नसता. या पिढीला प्रियंका आकर्षित करू शकतील त्या केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे. एक तर त्या तरूण आहेत. भाषण शैलीवर इंदिरा गांधींचा प्रभाव असला तरी त्याला एक वेगळा लहेजा आहे. त्याचाही परिणाम मतदारांवर होऊ शकतो. पण आधी म्हटल्याप्रमाणे प्रियंका जितक्या प्रभावी ठरतील, तितक्या त्या सपा-बसपा आघाडीला त्रासदायक तर मोदींच्या भाजपला फायदेशीर ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.



Sunday, February 12, 2017

नियोजित कादंबरीचा मधला एक तुकडा पुन्हा तुमच्या अभिप्रायासाठी


लोणकर आंघोळ करून आले तोपर्यंत दीपक जाधवचा फोन येऊन गेला होता. त्यांनी लगेचच दीपकला काॅल लावला.
‘गुड माॅर्निंग सर. दीपक बोलतोय.’
‘गुड माॅर्निंग. बोला.’
‘सर, चेतनचा तपास लागला?’
‘कोणी सांगितलं?’
‘काही दैनिकात बातम्या आल्या आहेत तशा म्हणून विचारलं.’
‘काय बातम्या आल्या आहेत?’
‘चेतनचा ठावठिकाणा पोिलसांना लागला असून लवकरच पोिलस त्याच्यापर्यंत पोहोचणार आहेत, अशी मािहती नंदुरबार पोिलसांच्या हवाल्याने िदली आहे बहुतेक दैनिकांनी.’ दीपकने सांगितले.
‘नंदुरबार पोिलस? त्यांना कोणी सांगितलं की त्याला नंदुरबार जिल्ह्यात नेण्यात आलं आहे म्हणून?’ लोणकरांना प्रश्न पडला.
‘सर, आपल्या आॅफिसमधून माहिती लीक झाली आहे. तुम्ही नंदुरबारला गेला आहात, असंही एका दैनिकाने छापलंय सर.’
‘अशी कशी माहिती लीक होते आॅफिसातून?’लोणकरांच्या बोलण्यातून ते वैतागले आहेत हे स्पष्ट जाणवत होतं.
‘सर, पण काही आशा िदसताहेत का चेतनचा तपास लागण्याच्या? इकडे सगळे टेन्शनमध्ये आहेत. चेतनच्या आई-वडिलांना समजावणेही कठीण होत चालले आहे. शिवाय..’
‘शिवाय काय?’
‘हेच. इतर दैनिकाचे लोकं िफतवतात त्यांना. त्यामुळे आगीत तेल पडतं.’
‘इतर दैनिकाचे काय, आपल्या दैनिकातलेही काही आहेत त्यात. मला समजलंय सगळं.’ लोणकरांच्या या विधानाने जाधवांना काहीसा धक्का बसला.
‘पण त्याच्या आई वडिलांना काही तरी सांगावं लागेल सर आज. म्हणून फोन लावला खरं तर. कारण आज आपण काहीच बातमी छापलेली नाही, याचंही भांडवल केलं जाईल तिथे.’ दीपक जाधव त्यांची चिंता व्यक्त करीत होते. त्यांना लगेचच चेतनच्या घरी जायचे होते.
‘होऊ द्या भांडवल.मी स्वत: लक्ष घालून आहे आणि सर्व यंत्रणा प्रामाणिकपणे शोध घेते आहे, एवढच त्यांना सांगा.’ लोणकर आपल्या भूमिकेवर ठाम होते.
ज्या अर्थी नंदुरबार पोिलसांच्या हवाल्याने बातमी छापली आहे त्या अर्थी ती नंदुरबार आवृत्तीलाही छापली असणार, असा त्यांचा होरा होता. कपडे करून ते खाली आले. अजय तयार होऊन बसला होता आणि वर येण्याच्याच तयारीत होता. त्यालाही त्यांनी सोबत घेतलं. आधी नास्ता केला आणि नंतर ते पेपर स्टाॅलवर गेले. तिथे आपल्याला कोणी ओळखणार नाही याची त्यांना खात्री होती.उपलब्ध सर्वच दैनिके उचलून त्यांनी स्टाॅलवर पैसे िदले आणि लाॅजवर आले. अपेक्षेप्रमाणे काही दैनिकांनी नंदुरबार आवृत्तीत बातमी घेतली होती.
‘चेतनचा तपास लागला आहे. लवकरच आम्ही तो पोिलसांच्या संरक्षणात असेल. त्याला पळवून नेणाऱ्यांनाही आम्ही ताब्यात घेतलेले असेल असा आम्हाला विश्वास आहे.’ असे सांगणारा नंदुरबार एसपींचा कोट एका दैनिकाने छापला होता.ही भाषा तर मराठे यांची पहिल्या दिवशीही होती. त्यावरून दैनिकांनी तारे तोडलेले होते हे लोणकरांच्या लक्षात आले. इतर स्थानिक बातम्या वाचण्यात लोणकरांना काहीही रस नव्हता. त्यांनी सर्व पेपर्स गोळा करून तो गठ्ठा टेबलवर ठेवला.
शिरीषने केलेल्या अपघाताविषयी काही तपशील उपलब्ध होतो का, या विषयी त्यांना कमालीची उत्सुकता होती.त्या संदर्भात दीपक जाधवांना माहिती काढायला सांगायचे राहून गेले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा दीपकला फोन लावला.
‘दीपक बोलतोय सर’ फोन घेत दीपक जाधव म्हणाले.
‘दीपक, अहो तो आमदार शेट्येला अपघात करणारा चालक पोलिसांच्या ताब्यात आहे ना?’
‘हो सर. अटक केली आहे पोिलसांनी त्याला.’
‘नेमका कसा पकडला गेला तो? पळून जात होता ना तो?’
‘असं पोलिस म्हणताहेत. पण आपल्या माहितीनुसार तोच पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.’
‘अच्छा. मग तो जखमी कसा झाला? त्याच्या डोक्याला लागल्याचं टीव्हीवर पाहिलं मी.’ लोणकर सावधपणे बोलत होते.
‘ते नाही माहिती सर. पण तो ट्रक तिथे कोणीच नसताना जमावाने जाळला, असं कसं झालं, हा प्रश्न मला पडला आहे. आमदाराच्या कार्यकर्त्यांना आणि पोिलसांनाही कळायच्या आधीच ट्रक पेटला होता, असं तिथे आधी पोहोचलेल्यांचं म्हणणं आहे. ते एक कोडंच आहे. बहुतेक ट्रकमध्ये काही ज्वलनशील पदार्थ असावेत, असा संशय आहे मला.’ दीपक चांगले रिपोर्टर आहेत, असे लोणकरांचे मत झाले.
‘आणखी काय माहिती मिळतेय त्या ट्रक चालकाबद्दल?’ लोणकरांनी विचारलं खरं; पण आपण जरा जास्तच उत्सुकता दाखवत आहोत त्या ट्रकचालकाबद्दल, असा संशय तर दीपक जाधवला येणार नाही ना, अशी शंकाही त्यांना आली. त्यामुळे लगेचच त्यांनी पुष्टी जोडण्याचा प्रयत्न केला. ‘काय आहे दीपक, या घटनांच्या मािलकेतला कोणताही दुवा आपल्याला चेतनपर्यंत पाेहोचवू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे आपण फारच चौकस राहिलं पािहजे. नाही का?’
‘हाे सर.’ दीपक म्हणाले. ‘मी आणि सुहासने बऱ्यापैकी माहिती गोळा केली आहे’
‘सुहास कोण?’
‘आपला िरपोर्टर आहे सर. चेतनच्या सुटीच्या दिवशी हाच क्राईम रिपोर्टींग करतो आपल्याकडे.’
‘अच्छा अच्छा. तो?’ लोणकरांना हाॅटेलमध्ये सावंत बरोबर बसून आपल्याला सावध करणारा हाच मुलगा आहे, याची आठवण झाली. ‘काय माहिती मिळाली आणखी ?’
‘सर, या ट्रक चालकाकडे लायसन्सही नाही ट्रक चालवण्याचे. त्याच्याकडे स्वत:ची ओखळ देणारा काहीही पुरावा आढळला नाही. त्याची बॅग ट्रकमध्येच जळून गेली, असं तो पोिलसांना सांगतोय.’
‘ट्रक कुठून चोरला त्याने?’
‘मुंबईतून चोरला होता, असं तो म्हणतोय. सांताक्रूझच्या झोपडपट्टीत तो राहातो. एका झोपडपट्टी दादाला पैसे द्यायचे होते. म्हणून ट्रक चोरला होता. तो ट्रक आपल्या भागात कुठे तरी भंगारवाला आहे चोरीचे ट्रक डिसमेंटल करून विकणारा, त्याला तो हा ट्रक विकणार होता, असंही सांगतोय.’
‘ज्याचा ट्रक चोरला त्याने काही चोरीची िफर्याद िदली असेल ना?’ लोणकरांना उत्स्तुकता होती शिरीषचा प्लान समजून घेण्याची.
‘हो सर. िरकामा ट्रक चोरीस गेल्याची फिर्यात सानपाडा पोलिस ठाण्यात दाखल आहे.’
‘बऱ्यापैकी माहिती काढलीत तुम्ही.’ लोणकारांनी समाधान व्यक्त केलं.
‘थॅक्यू सर. आणखी काही मािहती मिळाली तर कळवतो.’ दीपक जाधव म्हणाले. लोणकरांचा िनरोप घेऊन त्यांनी फोन कट केला.

शिरीषचा हा काही तरी वेगळा प्लान असावा, अशी दाट शंका लोणकरांना येत होती. कारण दीपक म्हणतो त्याप्रमाणे अपघात केल्यानंतर तिथे काेणीही नसताना त्याला तिथून पळून जाणे सहज शक्य होते. पळून गेला असता तरी आमदाराला रोखण्याचे काम फत्ते झालेच होते. तरीही त्याने ट्रक जाळला आणि स्वत:च पोलिस ठाण्यात हजर झाला. याचा अर्थ त्याला पोिलसांच्या सहवासात राहायचं आहे. त्यांच्याकडून काही तरी माहिती मिळवण्याचा त्याचा प्लान िदसतो. अर्थात, काहीही असला तरी आता तो आपल्याशी संपर्क साधू शकणार नाही आणि त्यामुळे त्याने काहीही मािहती िमळवली तरी त्याचा आपल्याला थांग लागणार नाही, या जाणीवेने लोणकरांची अस्वस्थता वाढवली. पोलिस ठाण्यात जाऊन त्याला भेटायला हवे. िकंवा न्यायालयाच्या आवारात भेटण्याचा प्रयत्न करायला हवा, अशा विचारापर्यंत ते आले. त्यासाठी त्यांना तातडीने परत िफरायला हवे होते. त्यासाठी दुपारी इन्स्पेक्टर गावीतांना फोन लावून अंदाज घ्यायचा असा िनर्णय त्यांनी घेतला.