Saturday, April 3, 2021

डाॅ. आंबेडकरांच्या धनंजय कीर लिखीत चरित्राच्या निमित्ताने...

 ‘डाॅ. आंबेडकरांनी स्वतः वाचून मान्यता दिलेले एकमेव विश्वसनीय चरित्र!’ कव्हर पेजवर अशी मोहोर असलेले बाबासाहेबांचे चरित्र वाचण्याचा जुना संकल्प नुकताच पूर्ण झाला. बाबासाहेबांविषयी वाचलेले हे काही पहिले पुस्तक नाही. त्यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाविषयी आकर्षण शालेय जीवनातच निर्माण झालेलं. वयाबरोबर त्यांच्या विषयीचे वाचन वाढत गेले तसा त्यांच्याविषयीचा आदर आणि कृतज्ञता भावही वाढत गेलेला. त्यातून अनेक पुस्तकांचा संग्रह होत गेला. त्यातली प्रसंगानुरूप वाचलीही जात होती; पण धनंजय कीर यांनी लिहिलेलं त्यांचं हे चरित्र वाचायला सुरुवात करायची हिम्मत होईना. एक तर त्याचा आकार अवाढव्य (६६५ पाने). ते तुकड्या तुकड्याने वाचण्याची इच्छा नव्हती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत एकूणच मनाची अवस्था आणि इतर काही संकल्प यामुळेही ते शक्य झालं नाही. दुसऱ्या लाटेने मात्र ते साध्य करवून दिलं. 




धनंजय कीर हे लेखक म्हणून मला परिचित आहेत ते त्यांनी लिहिलेल्या महान व्यक्तिमत्वांच्या चरित्रांमुळे. महात्मा ज्योतिराव फुले, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज हे त्यांचे चरित्र नायक. माझ्या वाचनात मात्र यापैकी एकही अजून आलेलं नव्हतं. बाबासाहेबांचे चरित्र वाचल्यानंतर मात्र, त्यांनी महात्मा गांधींच्या चरित्रात काय लिहिले आहे, हे वाचनाची मोठीच उत्सुकता लागली आहे. ते लवकरच मिळवून वाचण्याचा संकल्प हे पुस्तक वाचून संपविताना झाला आहे. त्याला कारण आहे. बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यातील संबंधांवर कीर यांनी बऱ्यापैकी सविस्तर प्रकाश टाकला आहे. तो टाकत असताना ते बाबासाहेबांचे चरित्र लिहित होते आणि त्यामुळे जे काही लिहिले आहे ते त्यांचा पक्ष कसा योग्य होता हे वाचकाच्या मनावर बिंबवण्याच्या हेतूने. स्वाभाविकच महात्मा गांधींच्या विचारांच्या मर्यादा, कृतीतील दोष आणि विरोधाभास यांच्यावर लेखकाने अतिशय स्पष्टपणे टीका टिपणी केली आहे. मात्र, महात्मा गांधींविषयीचे त्यांचे ते मत त्यांचे चरित्र लिहितानाही कायम होते का? या विषयी मला आता उत्सुकता निर्माण झाली आहे.


धनंजय कीर यांनी लिहिलेल्या बाबासाहेबांच्या या चरित्राची काही वैशिष्ट्य आहेत. एक तर ते ओघवत्या भाषेत लिहिलं गेलं आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातील घटनांची सनावळीनुसार नोंद करून त्याबरहुकूम कीर यांनी लेखन केलेलं दिसतं. त्यामुळे बाबासाहेबांचा जीवनपट एखादा सरळ सोपा चित्रपट पुढे सरकत जावा तसा सरकत जातो. मागची घटना आठवायची आणि त्यानुसार अर्थ लावायचा असा द्राविडी प्राणायाम वाचकाला करावा लागत नाही. अर्थात, अनेकवेळा शैली असेल तर तशा गिरक्याही वाचनाचा आनंद वाढवतात हे खरं; पण या चरित्राचा एकूणच वाचक डोळ्यासमोर ठेवून कीर यांनी प्रयत्नपूर्वक सोप्या शैलीत हे लिहिले असावे. अर्थात, त्यांनी लिहीलेली अन्य चरित्र वाचल्यानंतर कदाचित यावर भाष्य करता येईल; पण एकूणच अभ्यासकांपासून नवशिक्षितापर्यंत सर्वांना गुंतवून ठेवत कीर यांचे कथन पुढे सकरत जाते.(थोडक्यात काय, तर नियमित वाचनाची सवय नसणाऱ्यांनीही हा ग्रंथ वाचायची हिम्मत करायला हरकत नाही.)


धनंजय कीर यांनी आधी हे चरित्र इंग्रजीत लिहिले. Dr. Ambedkar : Life and Mission या नावाने १९५४ साली ते प्रकाशित झाले. त्या आधीच बाबासाहेबांनी ते वाचले असावे. तोपर्यंत धर्मांतर झालेले नव्हते. म्हणजे पुढचा भाग त्यांच्या निधनानंतर मराठी ग्रंथासाठी म्हणून लिहिला गेला. मी वाचली ती २०१६ साली प्रसिद्ध झालेली सातवी आवृत्ती आहे. त्यात काही संदर्भ दुरुस्त करण्यात आले असल्याचा खुलासा प्रकाशकांनी केला आहे. अभ्यासकांसाठी बाबासाहेबांशी संबंधित सनावळ त्यात स्वतंत्रपणे जोडली आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकांची बरीच मोठी यादीही त्यात समाविष्ट करण्यात आली आहे. शिवाय, काही नव्याने मिळालेली छायाचित्रेही या आवृत्तीत आहेत. त्यामुळे संशोधकांसाठी हे पुस्तक बरेच काही देऊन जाते. 


मला आवडलेलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या संदर्भात आणि वेगवेगळ्या प्रश्नांवरचे बाबासाहेबांचे विचार या पुस्तकात एकत्रितपणे कळतात. त्यात प्रसंगानुरूप होत गेलेले बदलही समोर येतात. शिवाय, जसजसे बाबासाहेब पुस्तके लिहीत गेले तसतसे ते संदर्भ तर पुस्तकात येतातच, शिवाय त्या पुस्तकात नेमके कोणते विचार व्यक्त करण्यात आले आहेत, याचाही धावता संदर्भ लेखकाने आवर्जून दिला आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या पुस्तकांचाही परिचय वाचकाला होत जातो. त्यामुळे हे चरित्र वाचून संपते तेव्हा खूप काही मिळाल्याची अनुभूती वाचकाला येते. 

राज्यसभा टीव्हीने संविधानाच्या निर्मितीवर १० भागांची एक डाॅक्युमेंटरी बनवली आहे. त्यात ज्यावेळी स्वातंत्र्य मिळणार होते त्यावेळी बनवायच्या मंत्रिमंडळात डाॅ. आंबेडकरांना घ्यावे, असा आग्रह महात्मा गांधी यांनी नेहरू आणि सरदार पटेल यांच्याकडे धरला होता असे एक दृश्य दाखवण्यात आले होते. तो संदर्भ या पुस्तकात सापडला नाही. आपण काँग्रेसच्या विरोधात असूनही आपल्याला मंत्रिमंडळात कसे घेतले या विषयी बाबासाहेबांनाही आश्चर्य वाटत होते असा संदर्भ चरित्रात येतो. याचा अर्थ एक तर नेहरूंनी त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचा निर्णय आपला आहे असे सांगितले असावे किंवा गांधींविषयी असलेल्या एकूणच रागातून डाॅ. आंबेडकरांनी त्यावर विश्वास ठेवला नसावा, अशीही शक्यता आहे. 


धर्मांतराच्या आधी डाॅ. आंबेडकरांना त्यांचे ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हे पुस्तक प्रकाशित करायचे होते; ते त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकले नाही. त्या पुस्तकात बाबासाहेबांनी मांडलेला बौद्ध धर्म हा गौतम बुद्धाने सांगितलेला मूळ धम्म नाही, अशी टीका बुद्धीस्ट तज्ञांनी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर केली. त्यासाठी त्यांनी बाबासाहेबांना दोषही दिले; पण त्या संदर्भात स्पष्टीकरण द्यायला किंवा आपले म्हणणे नीटपणे मांडायला बाबासाहेब नव्हते. त्यामुळे त्यांनी सांगितलेला धम्म हा बुद्धाचा धम्म नाही तर आंबेडकरांचा धम्म आहे असे म्हणणाऱ्यांचा प्रतिवाद झाला नाही. ग्रंथ त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झाला असता तर हे सर्व होऊ शकले असते. या ग्रंथाच्या अनुशंगाने आणखी एक बाब धनंजय कीर यांनी समोर आणली आहे. या ग्रंथासाठी बाबासाहेबांनी उपोद्घात लिहून ठेवला होता. तो मात्र ग्रंथ प्रकाशित झाला त्यावेळी त्यात समाविष्ट करण्यात आलेला नव्हता. असे का झाले असावे, याचे उत्तर धनंजय कीर यांना सापडलेले नाही; पण हे प्रकरण वाचत असताना वाचकाला मात्र ते सहज सापडते. त्यासाठी तो ग्रंथ वाचायला हवा. 


या देशातल्या या प्रकांड पंडिताला, कायदेतज्ञाला, संसदपटूला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभाव पाडू शकणाऱ्या मुस्सद्याला आपली बहुतांश ताकद एका समाज घटकाला किमान मानवी संधी मिळवून देण्यासाठी खर्च करावी लागली. तशी वेळ तत्कालिन व्यवस्थेने, ब्राह्मणशाहीने त्यांच्यावर आणली नसती तर ही महान विभूती देशाच्या स्वातंत्र्य आणि उत्थानासाठी पूर्णांशाने कामी आली असती. तसे झाले असते तर आज भारताचे चित्र कदाचित खूप पुढचे राहीले असते. ती वेळ त्या व्यवस्थेने आणली नसती तर अस्पृशांचीही ताकद, बुद्धीमत्ता आणि शौर्य देशाच्या उत्थानाच्या कामी त्याच वेळी आले असते आणि आजचा भारत खूप वेगळा आणि प्रगत राहिला असता असे मला सतत वाटत आले आहे. धनंजय कीर यांनी लिहिलेले हे चरित्र वाचल्यानंतर ती भावना अधिक दृढ झाली आहे. 


1 comment: