Sunday, February 27, 2022

नवाब मलिकांची अटक अन् भाजपची चाल

 

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना ज्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात ईडीने आता अटक केली आहे ते प्रकरण दोन दशकांपूर्वीचे आहे. त्यामुळे मलिक फार बोलत होते हेच त्यांच्या अटकेचे खरे कारण आहे; जमीनीचे प्रकरण तर निमित्त आहे, अशी टीका राज्यातली राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्तेतले तिचे मित्रपक्ष करीत आहेत. त्या टीकेत तथ्य नाही, असे नाही. काही प्रमाणात तेही खरे आहेच; पण त्याहीपेक्षा वेगळा विचार भाजपच्या नेत्यांनी मलिक यांच्या अटकेचे निर्देश ईडीला देऊन केलेला दिसतो. त्याकडे अजून कोणाचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. 


मुंबई महापालिकेत शिवसेनेचे प्राण आहेत. तिथूनच या पक्षाला आर्थिक ताकद मिळत आली आहे हे उघड आहे. त्यामुळे इथून शिवसेनेची सत्ता घालवायचीच याकडे भाजपच्या नेत्यांनी सध्या लक्ष केंद्रीत केलेले दिसते. गेल्या किमान तीन दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. आता गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्रीपदही शिवसेनेकडे आहे. त्याअर्थाने राज्यातही शिवसेनेची सत्ता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे हे सरकार फार दिवस टिकणार नाही आणि पुन्हा आपल्याला सत्तेत येता येईल, असे भाजपच्या नेत्यांना वाटत होते; पण तसे काही घडले नाही. यापुढेही तसे काही घडेल असे दिसत नाहीये. मधल्या काळात सत्ताधारी आमदारांना फोडून सरकार पाडण्याचे प्रयत्नही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी करून पाहिले; पण केंद्रातील नेतृत्वानेच त्यांना त्यासाठी साथ दिली नाही. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या भाजप नेत्यांना मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा झेंडा खाली उतरवून शिवसेनेला धडा शिकवायची खुमखुमी आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांच्या अटकेकडे पाहिले पाहिजे.


जर ‘गुन्हा’ २०-२२ वर्षांपूर्वीचा आहे तर मग मलिक यांच्यावर कारवाई करायला इतकी वर्षे का लागलीत? हा सर्वसामान्यांनाही पडलेला प्रश्न आहे. त्याचे उत्तर मलिक यांच्या अलिकडच्या नित्याच्या पत्रकार परिषदांमध्ये जसे आहे तसेच ते महापालिका निवडणुकीच्या राजकारणातही आहे. आत्ताच अटक केली गेली, कारण आता महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यात मलिक यांच्या अटकेचा भाजपला काय आणि कसा फायदा होऊ शकतो, हे बारकाईने समजून घ्यावे लागेल. 


महाआघाडी एकत्र लढली तर भाजपचे मोठे नुकसान होते, हे आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेबरोबर युती करायला तयार होईल, यात शंका नाही. कारण एकतर या महानगरात या दोन पक्षांची सद्दी फारशी राहिलेली नाही हे महापालिकेच्या गेल्या अनेक निवडणुकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर राहून झाला तर या दोन्ही पक्षांना फायदाच होणार आहे. प्रश्न आहे तो शिवसेनेचा. मागच्या निवडणुकीत सेना स्वतंत्रपणे लढूनही सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे. शिवाय, शिवसेनेची मुंबईत लढत कधीच या दोन पक्षांशी नसते. कारण त्यांचे आणि शिवसेनेचे मतदार अगदीच भिन्न आहेत. त्यांच्यामुळे मतविभाजनाचा धोकाही नसतो. त्यामुळे दोन्ही काँग्रेसशी महापालिका निवडणुकीत आघाडी करून शिवसेनेला काहीही फायदा होणार नाही. झाले तर नुकसानच होणार आहे, नुकसान असे की, जिथे शिवसेनेचे कार्यकर्ते थोड्या मतांनी पराभूत झाले आहेत तिथे यंदा ते पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढायला सज्ज असतील. ते मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी सोडले तर शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज होण्याचीच शक्यता आहे. शिवाय, मुंबईच्या मतदारांना दोन्ही काँग्रेसबरोबर गेलेली शिवसेना कितपत रुचेल हाही प्रश्नच आहे. पण राज्यातले सरकार टिकवण्यासाठी आणि सत्ता स्थापायला नगरसेवकांची संख्या कमी पडली तर उपयोग व्हावा यासाठी शिवसेना या दोन पक्षांबरोबर जायला तयार झाली तरी आश्चर्य वाटायला नको. ही परिस्थिती लक्षात घेऊन नवाब मलिक यांच्यावरील कारवाईची वेळ भाजपने साधली आहे.



नवाब मलिक यांच्या या अटकेने काय साध्य होईल? तर ध्रुवीकरणाला मदत. भाजपचा नेहमीच ध्रुवीकरणावर भर असतो. अन्य कोणत्या मुद्यांनी सत्ता मिळत नाहीये असे लक्षात आले की भाजपवाले हिंदूत्वाचा आाणि देशप्रेमाचा मुद्दा पुढे करतात. नवाब मलिक हे मुस्लीम आहेत आणि त्यांचा संबंध या प्रकरणाच्या निमित्ताने थेट देशद्रोही दाऊदच्या कुटुंबाशी जोडला गेला आहे. दाऊदने घडवून आणलेले बाॅम्बस्फाेट ही मुंबईकरांची दुखरी नस आहे, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे धर्माने मुस्लीम असलेल्या नवाब मलिक यांचा दाऊदशी आलेला हा संबंध हिंदूत्ववादी विचारांच्या मतांना एका ध्रुवावर एकत्रित करायला फार मोठा मुद्दा मुंबईत तरी बनणार आहे. आजपर्यंत अशा मुद्यांवरच मुंबईत शिवसेना मोठी होत राहीली आहे. पण तिच शिवसेना आज नवाब मलिकांना साथ देते आहे हे दाखवण्याची संधी भाजपची मंडळी साधतील आणि शिवसेनेची मते आपल्याकडे वळवतील, असे चित्र आजच दिसू लागले आहे. 


हा झाला थेट मतांचा फायदा. आणखी एक राजकिय गणित यामागे असू शकते. राष्ट्रीय पक्ष आणि हिंदूत्ववादी मोदींना पराभूत करू शकणारा एकमेव पक्ष म्हणून  मुस्लीम मते काँग्रेसकडे आकर्षित होत आली आहेत. मागच्या काही वर्षांत ओवेसींच्या एमआयएम पक्षाने मुस्लींम मतांवर गारूड करण्याचा प्रयत्नही महाराष्ट्रात केला आहे. पण त्या पक्षाचा फायदा भाजपलाच होतो हे मुस्लीम मतदारांच्या लक्षात यायला लागले आहे, असे म्हणतात. ते खरे असेल तर काँग्रेसच मजबूत होणार. भाजपला काँग्रेसला कोणत्याही पातळीवर संजीवनी मिळायला नको आहे. त्यामुळे मुस्लीम मतांना काँग्रेसकडून इतरत्र वळवायचे असेल तर एकतर एमआयएम किंवा समविचारी अन्य पक्ष हवा. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवाब मलिकांच्या निमित्ताने घेऊ शकेल आणि तेच भाजपच्या फायद्याचे ठरणारे आहे. भाजपला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढलेला कधीही परवडणारे आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही.






No comments:

Post a Comment