Thursday, February 25, 2016

संस्कारी उद्योगपतीचे जाणे…

एका बाजूला धर्म आणि परंपरांशी पक्की सांगड आणि दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानातून प्रगतीची ओढ असलेले भंवरलाल जैन हे एक आगळे वेगळे रसायन होते. व्यावसायिक दृष्टीकोन आणि कौशल्य यांची खाण असलेल्या या उद्योजकाच्या मुळांशी मात्र गांधी विचारांची मशागत होती. त्यामुळे व्यवसायातून उद्योजक आणि उद्योजकाचे उद्योगपती झाले तरी त्यांचे व्यवहार कधी भ्रष्ट झाल्याचे समोर आले नाही. दूरदृष्टी ही आणखी एक देणगी त्यांना निसर्गत:च मिळाली होती. त्या दृष्टीने त्यांनी उजाड माळरानावर नवी सृष्टी घडवली. त्याच दूर दृष्टीने त्यांनी आपल्या कंपनीचा विस्तार देशोदेशी तर केलाच पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे भारतातल्या शेतीला पाणी बचतीची अत्यंत मोलाची देणगी त्यांनी दिली. आता पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला संजीवनी देण्यासाठी काही ठोस काम करण्याची त्यांची इच्छा होती आणि त्या दृष्टीने त्यांचे कामही सुरू होते. आपल्या आजुबाजूचा, राज्यातला , देशातला कोरडवाहू शेतकरी आत्महत्या करताना ते ऐकत तेव्हा व्यथित होत. त्यांच्यासाठी काही तरी शाश्वत उपाय देऊन जायचा निर्धार त्यांनी केला होता; पण त्यात काही ठोस घडण्यापूर्वीच ते मृत्यूशी असलेली लढाई हरले आहेत.
खरं तर हार मानणे  या माणसाच्या स्वभावात नव्हते. त्यामुळेच अनेक वेळा हृदयाने दगा देऊनही त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला होता. प्रचंड इच्छाशक्ती हेही त्याचे कारण असावे. एखादी गोष्ट करायची ठरवली आणि ती या माणसाकडून झाली नाही, असे उदाहरणच नसेल.  संकटांनी आणि टीकेनेही ते कधी खचले नाही की निराश झाले नाहीत. टीका करणाऱ्यांनी त्यांचे काम करावे, मी माझे काम करीत राहीन, असे ते म्हणत. वेळ आलीच तर आपली भूमिका समजावून सांगण्याचा संयत प्रयत्न त्यांनी काही वेळा नक्की केला; पण त्यात कुठे राग नव्हता की द्वेष. असलीच तर समजावून सांगण्याची वडिलकीची भूमिका असायची. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तरी त्याचीही प्रसिद्धी करायची गरज नाही असे ते त्यांच्याच मुलांना सांगत. या संयमाला मोठी मानसिक ताकद असावी लागते आणि ती भंवरलाल जैन यांच्यात ठासून भरलेली होती. याच मानसिक ताकदीने त्यांनी अनेक संकटांनाही धैर्याने परतावून लावले होते. ९० च्या दशकातला एक काळ असा आला होता की कोट्यवधीचे कर्ज त्यांच्यावर झाले होते. कंपनी बंद पडेल की काय, असे वाटू लागले होते. पण हा माणूस डगमगला नाही. नव्या उभारीने त्यांनी कंपनीला पुन्हा वर काढले आणि एका उच्च स्थानी नेऊन ठेवले. त्या संकटाच्या काळात ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली त्यांचे ऋण त्यांनी कायम लक्षात ठेवले. कंपनीची परिस्थिती सुधारली तेव्हा त्यांना कंपनीचे भाग देऊन एक प्रकारे मालक बनवले. अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर आणि काहींच्या तर मृत्युनंतरही त्यांच्या कुटुंबाला कंपनीतर्फे सर्व सेवा आणि वेतन सुरू असल्याची अनेक उदाहरणे आहेत.  कृतज्ञता त्यांच्या रोमारोमातच होती. म्हणूनच ज्या आप्पासाहेब पवार यांनी त्यांना आधुनिक शेतीतंत्राची दिशा दाखवली त्या अप्पासाहेब पवार यांच्या नावाने त्यांनी कृषि पुरस्कार सुरू केले. ज्या जळगाव शहरात त्यांचा व्यावसायिक विकास झाला त्या जळगावला कर्मभूमीम्हणून कधी दूर सारायचे नाही, हा त्यांचा निर्धार होता. म्हणूनच देश विदेशात उद्योग उभारूनही त्यांनी जळगावशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. वैद्यकीय  सुविधांची गरज असूनही ते मुंबईलाही राहीले नाहीत. ज्या जळगावने मला यश दिले त्या जळगावला मला विकासाचे स्त्रोत दिले पाहिजेत म्हणत त्यांनी उद्योगांचा विकास त्याच शहरात करत नेला. त्यामुळेच जळगावला एक वेगळी ओळख मिळाली हे कोणालाच नाकारता येणार नाही.
उद्योजक किंवा उद्योगपती ही त्यांची ओळख असली तरी त्यांची खरी ओळख  त्यांच्या संस्कारी असण्यात होती. जैन धर्माचे पालन करताना त्यांनी कुठे तडजोड केली नाही. तेच संस्कार त्यांनी पुढच्या पिढीवरही केले. उद्योग वाढताना कुटुंब तुटलेले अनेक घराणे समोर असताना या जैन कुटुंबाची एकसंघता मात्र आजही अभंग आहे. व्यावसायिक यशापेक्षा आणि त्याच्या समाधानापेक्षा अधिक समाधान त्यांना याच यशाचे असेल या विषयी यत्किंचितही शंका असण्याचे कारण नाही.
भंवरलाल जैन उपाख्य मोठे भाऊ यांना ज्यांनी जवळून अनुभवले ते कधीच त्यांना विसरू शकणार नाहीत. कार्य आणि कर्तृत्वाने तर त्यांना अमर केलेच आहे.

Wednesday, February 24, 2016

मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...




 खरंच, मला कळत नाहीये माझं असं काय झालंय....
म्हणजे, तसा मी बरा आहे वरवर..
पण आतून असं काय होतंय तेच समजत नाहीये.

मला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आठवतात
नंदुरबारचा शिरीषकुमारही डोळ्यापुढे दिसू लागतो
आणि भरून येते छाती देशप्रेमाच्या अदृश्य हवेने...
तीच हवा मग जेएनयूतल्या घोषणांचे दृश्य पाहून
दाब वाढवते माझ्याच धडधडणाऱ्या हृदयावरचा...
वाटतं.. कळ येतेय आता हृदयात....
हा दाब कमी करण्यासाठी बोललं पाहिजे काही तरी
किंवा लिहीलं तरी पाहिजे छाती मोकळी करणारं...

पण...
छे! शब्द कुठे दडून बसतात अचानक आणि
मी ना बालू शकत काही ना लिहू शकत...
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...

जेव्हा  आसेतू हिमाचल भारत वर्षासाठी
प्राण देणारे क्रांतीकारी डोळ्यासमोर येऊन उभे राहातात
आणि वाढवतात हृदयावरचा दाब,
तेव्हा काही वेळातच ज्ञानेश्वरही समोर येऊन ठाकतात..
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...

 काश्मीरच्या स्वातंत्र्यांच्या घोषणा देणाऱ्यांवर
टीकेची झोड उठवतात काही टीव्हीच्या पडद्यावर
तेव्हाही तीच हवा दाब वाढवायला लागते...
छाती फुटेल की काय असं वाटत असतानाच
पुन्हा ज्ञानेश्वरांची मूर्ती समोर दिसू लागते
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय..

याच साठी चढलो का आम्ही फासावर?
विचारू लागतात तेच क्रांतीकारी आणि
दिसू लागतात छातीवर गोळ्या झेलणारे सीमेवरचे तरूण सैनिक
तेव्हाही असंच होतं..
तेच ज्ञानेश्वर पुन्हा येऊन उभे राहातात समोर
आणि गाऊ लागतात आपलाच अभंग
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय..

इतिहासाच्या पुस्तकातून निघून हृदयात स्थिरावलेले क्रांतीकारी
आणि मराठीच्या पुस्तकातून डोक्यात शिरलेले ज्ञानेश्वर
दोघेही एकमेकांवर कुरघोडी करू पाहाताहेत आता
आणि माझे हृदय आणि मेंदू होताहेत रक्तबंबाळ त्यांच्या भांडणात
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...

याच साठी का दिले आम्ही प्राण? हा क्रांतीकारकांचा प्रश्न
आणि त्याला उत्तर ज्ञानेश्वरांचं...
अवघाची संसार सुखाचा करीन...असं सांगणारं..
कोण जिंकतयं, कोण हारतय...नुसतेच प्रश्न
खरंच मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...

Sunday, November 29, 2015

तुझे आहे तुजपाशी....



तुझे आहे तुजपाशी परि तू जागा भुललाशी... हे वाक्य आठवण्याचं कारण नुकतीच केलेली तीन दिवसांची ट्रीप. खरं तर आम्ही या दिवाळीत केरळला जायचं ठरवत होतो; पण सुटी मिळण्याची चिन्हे स्पष्ट नसल्याने त्या बुकींगची रिस्क घेतली नाही. मग मुंबईहून आलेल्या पाहुण्यांसमवेत कुठे जायचं हा प्रश्न समोर आल्यावर काही मित्रांशी, सहकार्यांशी चर्चा केली आणि एक तीन दिवसांची ट्रीप आखली. या तीन दिवसांत आम्ही होतो औरंगाबादला लागून असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात. आपल्या अवती भोवती काय काय आहे आणि आपल्याला त्याची असायला हवी तशी कल्पनाच नव्हती याची जाणीव या तीन दिवसांत सतत होत राहीली. संदीप खरेच्या एका गाण्यातलं वाक्य आहे....दूरचं पाहाता पाहाता जवळ पाहायचंच राहीलं...तसच काही तरी वाटत होतं. तुम्हालाही तसं वाटू द्यायचं नसेल तर एक वेळ तुम्हीही अशी ट्रीप अवश्य अनुभवा. या ट्रीपचे अनुभव त्यासाठीच शेअर करतो आहे. आवडले तर प्रतिक्रीया तर द्याच, पण अवश्य ट्रीपलाही जा.

.. तर आमची ट्रीप सुरू झाली औरंगाबादहून सकाळी ७.२५ वाजता. पहिला टप्पा होता कायगावचा. म्हणजे अहमदनगर रस्त्यावर मराठवाड्याची हद्द संपते ते गाव. प्रवरा आणि गोदेच्या संगमाचं गाव. नगरकडे जाताना आपल्या डाव्या हाताला एक रस्ता जातो तो रामेश्वर मंदिराकडे. खरं तर एका दैनिकात माहिती आलेली असल्याने आमच्या मुंबइंच्या पाहुण्यांना टोके गावात असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर पाहायचं होतं. पण आम्ही घुसलो कायगावला. म्हणजे नदीच्या अलिकडच्या गावाला. त्या मंदिराचाच फोटा इंटरनेटवर सिद्धश्वर मंदिराचा म्हणून आम्हाला आढळला ही वेगळी गोष्ट. प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्षाने पावन झालेलं हे ठिकाण आहे, असं सांगण्यात येतं. उत्तम दगडी कोरीव काम हे त्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. ज्यांना अशा वास्तू पाहाण्यात, अभ्यासण्यात रस आहे त्यांनी अवश्य या मंदिराला भेट द्यायला हवी.
हे आहे रामेश्वर मंदिर.
मंदिराच्या सभामंडपाचा एक कोपरा बाहेरच्या बाजूने.
प्रवेशद्वाराच्या खांबावरची नक्षी.
त्यानंतर आम्ही सिद्धेश्वर मंदिरात जायचा निर्णय रद्द केला. कारण ते मंदिरही असच आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. हा थांबा नियोजित कार्यक्रमात नसल्याने पुढे वेळ जाईल, असे वाटले म्हणून आम्ही पुढे निघालो. पुढे देवगडलाही आम्हाला जाता आलं असतं. ते दत्ताचं मंदिर आहे. अत्यंत उत्तम देवस्थान. राहायची आणि जेवणाची कमी किमतीत उत्तम सोयही इथे होते. देखणं आणि प्रसन्न ठिकाण म्हणून तुम्ही अवश्य तुमच्या ट्रीपमध्ये या ठिकाणाचा समावेश करावा अशी आमची शिफारस राहील.
नेवासे फाट्याहून आम्ही नेवासे गावाकडे वळालो. तिथे अर्थातच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहीली तो जगप्रसिद्ध खांब आहे आणि म्हाळसा माेहिनीराज मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणांबद्दल बऱ्यापैकी माहिती असल्याने ती इथे नोंदवत नाही. दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही संगमनेरकडे प्रवासाला सुरूवात केली. संगमनेरला उत्तम व्हेज जेवण केल्यावर आम्ही पेमगिरीकडे निघालो. संगमनेर तालुक्यातले हे गाव म्हणजे महावटवृक्षाचे गाव. आडवळणाला असलेला हा महावटवृक्ष मोठ्या क्षेत्रात पसरलेला आहे. त्या बद्दल तिथे माहिती देणारे फलक असायला हवे असे वाटत होते. पण एकही फलक नाही. ती गरज काही प्रमाणात तिथेच एक छोटे हाॅटेल सुरू केलेले व्ही.बी. कोल्हे भागवतात. त्यांच्या मोबाइंलमध्ये या वृक्षाबद्दलची एक आख्यायिका आहे. दंतकथेसारखी असल्याने जिज्ञासूंची भूक त्याने भागत नाही. पण काही तरी ऐकायला मिळाल्याचे तेवढेच समाधान.  खालचा व्हीडीओ पहा. तुम्हाला या वटवृक्षाची थोडी कल्पना यायला हरकत नाही.



पारंब्यांचे झाड, त्याच्या पुन्हा पारंब्याा आणि त्यांचे पुन्हा झाड अशा प्रकारे हा वटवृक्ष महावटवृत्र झाला आहे. त्याचे मोजमाप, इतिहास वैज्ञाानिक पद्धतीने शोधण्याचे काम, त्याचे संवर्धन याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ती जबाबदारी सध्या कोणाकडे आहे याचा काहीही थांगपत्ता तिथे गेलेल्यांना लागत नाही.
या झाडाच्या विस्तारीत फांद्या आणि लोंबणाऱ्या पारंब्या मुलांना आणि आपल्यालाही आनंद देण्याचे काम इमाने इतबारे करतात. पहा काही फोटो.
या महावटवृक्षाच्या सानिध्यात काही वेळ घालवल्यावर आमचा प्रवास भंडारदराकडे सुरू झाला.  रात्री ८ वाजेच्या सुमाराला आम्ही तिथल्या विश्रामगृहात पाहोचलो. तिथून जवळच समाधान नावाचे हाॅटेल आहे. घरगुती पण स्वच्छ, टापटीपेचे आणि उत्तम अन्नाचा दर्जा राखणारे राजूभाऊ पवार यांना त्यासाठी आम्ही बिलाच्या रकमेबरोबरच मनापासून धन्यवादही दिले. त्यांच्याकडे राहाण्याची देखील सोय आहे असे त्यांनी सांगितले. त्यांचे संपर्क क्रमांक  9421961196, 8698765252 असे आहेत.
भंडारदरा विश्रामगृहातून निघाल्यावर बाहेर असलेला रस्ता हा रिंगरोड आहे. काॅलनी बसस्टाॅपासून डाव्या बाजुला थोड्या अंतरावर एक रस्ता वरच्या दिशेने जातो. त्या रस्त्याने निघालो की आपण सर्व प्रेक्षणीय स्थळांना जाऊन पुन्हा या बसस्टाॅपजवळ पोहोचतो. साधारण तीन तास त्यासाठी  लागतात.
पहिले ठिकाण आहे रतनगड. तिथे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्यामंदिरातील पिंड वेगळ्याच आकाराची आहे आणि ती बहुतांश काळ पाण्यात असते. फोटो पहा.
मंदिराच्या आतील दगडी काम अत्यंत देखणे आणि रेखीव आहे. त्याची ही झलक.

चारही बाजूने उच डोंगर आणि मध्ये हे मंदिर. अत्यंत रमणीय असा हा नजारा होता. या मंदिराकडे जाताना सृष्टीचे जे सौंदर्य दृष्टीस पडले ते अद्वितीय असेच होते. पहा फोटो.

रस्त्यातच एक उंच मचाण लागले. त्यावर चढून आजूबाजूचे जे काही दृश्य पाहायला मिळते तेही अप्रतिम. आमच्या समवेत ८४ वर्षे वयाचे पद्माकर जहागिरदार हे सौ. मुक्ताचे मामाही होते. तेही अत्यंत उत्साहाने या मचाणावर चढले.
नंतर आम्ही गेलो ती आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची दरी अशी जिची ख्याती आहे त्या सांदण व्हॅलीकडे. जाताना काही किमी अंतर पायीच जावे लागते. घनदाट जंगल म्हणजे काय हे आम्हाला तिथे अनुभवायला आले. पाहा फोटो.
सांदण दरी अत्यंत खाेल आहे. तिथे खाली खाली जाताना वरचे उंच कडे अंगावर कोसळतील की काय अशी भीती वाटत राहाते. तिथे दगडांतून वाहाणारे पाणी म्हणजे अमृतच. आम्ही सर्वांनी मनसोक्त ते जलपान करून घेतले. या दरीकडे जातानाही ना रस्ते दाखवणारे फलक आहेत ना काही सूचना. त्या तिथे उभारण्याची गरज पदोपदी जाणवत होती. तिथे पर्यटन विभागाने मुक्कामाचीही सोय केली आहे असे आम्हाला सांगण्यात आले., पण आम्हाला तशी काही व्यवस्था तिथे आढळून आली नाही. दरीत खाली जाण्याचा आनंद मात्र अफलातूनच. धोका नसताना तिथे अवश्य जायला हवे.
या दरीचा आनंद घेतल्यानंतर आम्ही कोकणकडा पाहायला गेलो. घाटधरला तो आहे मात्र, फलक सहजपणे दिसत नसल्याने आम्ही गावात निघून गेलो. विचारल्यावर परत काही किमी उलटे येऊन आम्ही कोकणकड्याकडे वरच्या बाजूला गेलाे. एका केटी वेअरचे दरवाजे ही माहितीसाठी वळण्याची खूण म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही. उंच कड्यावर तिथे व्ह्यू पाॅइंट केला आहे. खाली धरण आणि सुंदर रस्ता तर बाजूला उंचच उंच डोंगर दिसतात.
तिथून पुढे हा रस्ता शेंडी गावाकडे येतो. शेंडी गावातून घोटीकडे जाणाऱ्या रस्त्याने गेल्यानंतर कळसूबाई या डोंगरमाथ्याचा पायथा लागतो. तिथे देवीचे एक पुरातन मंदिरही आहे. आमच्या गाडीचा टेन्शन राॅड अचानक तुटल्यामुळे तिकडे आम्हाला जाता आले नाही. त्याच रात्री निघून आम्ही शिर्डीत पाहोचलो.
शिर्डीला साईबाबांचे दर्शन तर झालेच पण नवनाथ दिघे यांच्या ओळखीमुळे आम्हाला साई प्रसादालयाचे स्वयंपाकगृहही पाहाता आले. हे स्वयंपाकगृह सोलर एनर्जिवर चालवले जाते. एकाचवेळी प्रत्येकी ४० किलो तांदळाचा भात बनवणारे प्रेशर कुकर आणि एका तासात प्रत्येकी ४ हजार पोळ्या बनवणारे रोटी मेकर्स, भांडी स्वच्छ करणारे यंत्र हे आमच्या कुटुंबियांना जास्त आवडले. तिथली स्वच्छता आणि यंत्रणा मनात भरणारी आहे.
शिर्डीला आम्ही वेट एन जाॅय नावाच्या वाॅटरपार्कचाही अानंद घेतला. आतापर्यंत महाराष्ट्रातले बरेच वाॅटरपार्क पाहिले आणि अनुभवले आहेत. त्यात मला व्यवस्थेच्या, सोयी सुविधांच्या दृष्टीने हा वाॅटरपार्क अत्यंत चांगला वाटला.
रात्री आम्ही औरंगाबादला परतलो.
जमलं तर तुम्ही अवश्य अशा ट्रीपचा अानंद घ्या.